मुंबई : पुढारी वृत्तसेवा गेल्या काही महिन्यापासून सीएनजीच्या दरात वाढ झाल्याने टॅक्सी, रिक्षा संघटनांनी परिवहन विभागाकडे भाडेवाढीची मागणी केली आहे. खटुआ समितीनुसार भाडेवाढीची चाचपणी परिवहन विभागाने सुरु केली आहे. मुंबई रिक्षा मेन्स युनियनसह अन्य काही संघटनांनी केलेल्या मागणीत इंधन दरवाढ झाल्याने चालकांना एका किलोमीटर मागे 1.31 रुपये अतिरिक्त खर्च येत असल्याचे सांगितले. त्यामुळे खटुआ समितीनुसार किमान दोन ते तीन रुपयांची भाडेवाढीची मागणी केल्याचे रिक्षा मेन्स युनियनचे सरचिटणीस तंबी कुरियन यांनी सांगितले. तर टॅक्सीच्या भाडेदरात 5 रुपयांची मागणी केल्याचे मुंबई टॅक्सी मेन्स युनियनचे ए. एल. क्वाड्रोज यांनी सांगितले.
मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. मार्च 2021 ला टॅक्सीचे भाडे 22 रुपये झाले होते. तर मुंबईतील काही रिक्षा संघटनांनीही परिवहन विभागाकडे भाडेवाढीची मागणी केली आहे. मुंबईत टॅक्सींची संख्या 18 हजारांपर्यंत, तर मुंबई महानगरात रिक्षांची संख्या तीन लाखांहून अधिक आहे. रिक्षा, टॅक्सी संघटनांनी भाडेवाढीची मागणी केली आहे. खटुआ समितीनुसार मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत यावर निर्णय होईल, अशी माहिती परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी दिली.
सीएनजीचा दर 25 ऑगस्ट 2021 ला प्रति किलोग्रॅम 51 रुपये 98 पैसे होता. सध्या सध्या तो 76 रुपये झाला आहे. त्यामुळे रिक्षा आणि टॅक्सीचालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. रिक्षाचे सध्याचे किमान भाडे 21 रुपये आहे. त्यात किमान दोन ते तीन रुपयांची वाढ अपेक्षित आहे. असे झाल्यास रिक्षाचे भाडे 23 ते 24 रुपये होईल. टॅक्सीचे सध्याचे भाडे 25 रुपये असून किमान पाच रुपये वाढ मिळाल्यास किमान भाडे 30 रुपये होईल.
हेही वाचा