पुणे ; पुढारी वृत्तसेवा : शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) अपात्र ठरलेल्या 550 ते 600 विद्यार्थ्यांची यादी संशयित सौरभ महेश त्रिपाठीने इतर साथीदारांच्या मदतीने तयार केल्याची माहिती सहायक सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी बुधवारी न्यायालयासमोर दिली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. जे. डोलारे यांनी त्याला 30 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
2018 मध्ये निघालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या जाहिरातीनुसार 15 जुलै 2018 रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती. तिचा निकाल 12 ऑक्टोबर 2018 मध्ये लागला. ही सर्व परीक्षा घेण्याची जबाबदारी जी. ए. सॉफ्टवेअरकडे होती. अश्विनकुमार महाराष्ट्रासाठी व्यवस्थापक म्हणून काम पाहत होता.
त्याच्यावर परीक्षेचे आयोजन व निकाल संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याची जबाबदारी होती. त्याचाच फायदा घेऊन जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीचा व्यवस्थापक अश्विनकुमारने सुखदेव डेरे, तुकाराम सुपे, प्रीतिश देशमुख, अभिषेक सावरीकर, सौरभ त्रिपाठी, संतोष हरकळ व अंकुश हरकळ यांच्याशी संगनमत करून गैरव्यवहार केल्याचे तपासात समोर आले आहे.
दरम्यान, सौरभ त्रिपाठीचा (वय 39, सध्या रा. बेलमोर्क इस्टेट, बाणेर, मूळ रा. ली रेसिडेन्सी गाझियाबाद) या प्रकरणात सहभाग निष्पन्न झाल्यानंतर सायबर पोलिसांनी त्याला लखनौ येथून अटक केली.