मुंबई ; पुढारी डेस्क : आशिया खंडातील पहीले कला महाविद्यालय असलेल्या जेजे स्कूल ऑफ आर्टसचे रूपांतर राज्यस्तरीय कला विद्यापीठात करण्यास तीव्र विरोध होऊ लागला असून, या ऐतिहासिक महाविद्यालयाला अभिमत कला विद्यापीठाचा दर्जा द्या, अशी मागणी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्गमित्रांनीच केली आहे.
उद्धव हे जेजे कला महाविद्यालयाचेच विद्यार्थी असल्यामुळे आपल्या वर्गमित्रांचे म्हणणे ते किती ऐकतात याकडे महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशभरातील कला विश्वाचे लक्ष लागून आहे.
अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळवण्यासाठी उच्च व तंत्रिशिक्षण विभागाने युजीसी अर्थात विद्यापीठ अनुदान आयोगाकडे पाच महिन्यांपुर्वी प्रस्ताव पाठवला होता. आयोगाच्या तज्ज्ञ समितीपुढे दोनवेळा सादरीकरण, कागदपत्रांची छाननी, त्रुटींची पुर्तता असे सोपस्कार पुर्ण झाल्यानंतर अखेरीस आयोगाने संस्थेला अभिमत विद्यापीठ सुरु करण्यास सर्शत परवानगी दिली.
मात्र, तांत्रिक बाबी आणि आयोगाने घातलेल्या अटींची पुर्तता करण्यासाठी तीन वर्षांची मुदत दिली. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने या संस्थेचे रुपांतर राज्यस्तरीय विद्यापीठात करण्याचा निर्णय घेतला. अभिमत विद्यापीठाच्या दर्जासाठी मोठ्या प्रमाणावर वेळ आणि पैसा खर्च केल्यानंतर राज्य सरकारने युर्टन घेतल्याचा आरोप माजी विद्यार्थ्यांनी केला आहे.
1857 साली सुरु करण्यात आलेल्या जेजे स्कुल ऑफ आर्ट्स या कला महाविद्यालयाला तब्बल 165 वर्षांची गौरवशाली परंपरा आहे. या महाविद्यालयाने भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके, रंगरेषांवर हुकुमत असणारे एम एफ हुसैन, अकबर पदमसी, व्ही. एस गायतोंडे, प्रसिद्ध अभिनेते अमोल पालेकर यांसारखे प्रतिभावंत विद्यार्थी घडवले. अशा या कलामहाविद्यालयाला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळायलाच हवा, त्यासाठी याच कला महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी या नात्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी उध्दव ठाकरे यांचे वर्गमित्र असलेल्या जेजेच्या माजी विद्यार्थ्यांनी केली आहे.
युजीसीच्या नियमांचे पालन करण्यास सरकार तयार होते. परंतु, आता राज्य सरकारने पुन्हा युटर्न घेतल्याचे उध्दव ठाकरे यांचे वर्गमित्र आणि कम्युनिकेशन डीझाईन प्रॅ्रक्टीशनर सुनील महाडीक यांनी सांगितले. गेल्या दोन दशकांत जेजे कला महाविद्यालयाचा दर्जा घसरल्याचे महाडीक यांनी म्हटले आहे.
* ऑनलाईन याचिका
जेजे कला महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी म्हणून जेजेला केवळ मुख्यमंत्रीच गतवैभव प्राप्त करुन देऊ शकतात. त्यामुळे त्यांच्या नजरेस काही गोष्टी आणून देणे गरजेचे असल्याचे माजी विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. जेजे कला महाविद्यालयाला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळावा यासाठी 2500 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन याचिका दाखल केली आहे.
* माजी विद्यार्थी म्हणतात:
* जेजे कला महाविद्यालयाच्या तुलनेत सृष्टी इन्स्टिट्युट ऑफ आर्ट डीझाईन आणि नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ डीझाईन ही दोन महाविद्यालये अतिशय उत्तम कामगिरी करत असल्याचे ठाकरे यांचे क्लासमेट डीझायनर मंतोष लाल म्हणाले. अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यास जेजे महाविद्यालयही पुढे जाईल.
* गेल्या काही वर्षांपासून या विद्यापीठाचा दर्जा ढासळू लागला असून 15 वर्षांपासून कंत्राटी तत्वावर याठिकाणी शिक्षकांना नियुक्त करण्यात आले आहे.
* कलेवर निस्सीम प्रेम नसलेल्यांच्या हाती जेजेची धुरा जाऊ नये.