कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील अरेरावी आणि 'हम करे सो' कायदा यापुढे खपवून घेणार नाही, असा सज्जड इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना नाव न घेता दिला. ते पत्रकारांशी बोलत होते.
राज्यसभा निवडणुकीत मुख्यमंत्री अपक्ष आमदारांना दम भरत होते. विकास निधीची ऑफर देत होते. मात्र हे सर्व झुगारून महाविकास आघाडीसोबत असणारी 11 मते भाजपला मिळाली. 24 वर्षांनंतर झालेल्या राज्यसभा निवडणुकीत भाजपचे तीनही उमेदवार विजयी झाल्याचे ते म्हणाले.
अरेरावी, दादागिरी वाढली
2019 नंतर जिल्ह्यात आकाश ठेंगणे वाटणार्यांचा 2014 मध्ये एकही आमदार नव्हता. त्यावेळी भाजपचे दोन व शिवसेनेचे सहा असे युतीचे आठ तर राष्ट्रवादीचे दोन आमदार होते. जिल्हा परिषद अध्यक्ष, पाच नगरपालिका, दोन नगरपंचायत अध्यक्ष भाजपचे होते. 2014 ते 2019 मध्ये कोणताही परफॉर्मन्स नसताना 2019 मध्ये काँग्रेसचे तीन आणि राष्ट्रवादीचे
दोन आमदार निवडून
आल्यानंतर पालकमंत्री व ग्रामविकास मंत्र्यांना जिल्ह्यात भाजप खदडून काढू, असे वाटू लागले. त्यांना शिवसेनेची साथ मिळाली, असे सांगून पाटील म्हणाले की, त्यामध्ये जि. प. अध्यक्ष बदलला. सत्ता गेल्याचे दुख नाही. मात्र जिल्ह्यातील दोन्ही नेत्यांची प्रचंड अरेरावी, दादागिरी, खोट्या केसेस दाखल करणे आणि विकासकामे थांबविणे असे प्रकार केले.
कार्यकर्त्यांना व व्यापार्यांना दिलेला त्रास खपवून घेणार नाही
जिल्ह्यात कोणत्याही कार्यकर्त्याला किंवा व्यापार्याला यापुढे त्रास दिलेला खपवून घेणार नाही. राज्यात तुमची सत्ता असली तरी केंद्रात आम्ही सत्तेत आहोत. धनंजय महाडिक यांनी दरमहा एक केंद्रीय मंत्री कोल्हापुरात आणले पाहिजेत. राज्यातील आठ मंत्री केंद्रात आहेत. यापुढे एकतर्फी कारभार चालणार नाही. थांबलेल्या विकासकामांवर लक्ष केंद्रित करून विविध प्रश्नांवर संघर्ष केला पाहिजे, असेही पाटील म्हणाले.
विधान परिषदेच्या पाच जागांवर भाजप विजयी होईल. तो महाविकास आघाडीचा नैतिक पराभव असेल. त्यानंतर आघाडीत भांडणे वाढतील. माणसं तुटतील. मात्र सरकार पडणार नाही. यावेळी धनंजय महाडिक, प्रकाश आवाडे, राहुल चिकोडे उपस्थित होते.