जितेंद्र आव्हाड  
Latest

जितेंद्र आव्हाड : बीडीडी चाळींना सेनाप्रमुख, शरद पवार, राजीव गांधींचे नाव

Arun Patil

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : यापुढे वरळीतील बीडीडी चाळीचे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नगर, नायगाव येथील बीडीडी चाळीला शरद पवार नगर आणि ना. म. जोशी बीडीडी चाळीला राजीव गांधी नगर नाव देण्यात आले असल्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी विधानसभेत केली, तर गोरेगाव येथील पुनर्विकास होत असलेल्या पत्राचाळीला यापुढे सिद्धार्थ नगर नावाने ओळखले जाईल, असेही त्यांनी जाहीर केले.

मुंबईतील कामाठीपुरा, बीडीडी चाळ येथील इमारती 100 वर्षांहून अधिक जुन्या आहेत. बीडीडी चाळीचा पुनर्विकास कार्यान्वित झालेला आहे. त्यामुळे कामाठीपुरा येथे पुढील तीन महिन्यांत विकास प्रकल्प सुरू होईल, अशी घोषणा जितेंद्र आव्हाड यांनी केली.

मुंबईतील 50 वर्षांपेक्षा जास्त जुन्या झालेल्या इमारतीचा पुनर्विकास, रखडलेले एसआरए प्रकल्प, मुंबईबाहेर एसआरए योजना लागू करणे,म्हाडाच्या जागांवर आलेले अतिक्रमण हटवणे, धारावी व बीडीडी चाळींचा पुनर्विकास या आणि अशा अनेक विषयांवर झालेल्या चर्चेला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी उत्तर दिले.

परळमधील टाटा कॅन्सर हॉस्पिटलमधील रुग्णांच्या नातेवाइकांसाठी बॉम्बे डाईंग येथील इमारतीमधील 100 खोल्या कॅन्सरचे उपचार घेणार्‍यांच्या नातेवाइकांसाठी दिल्या आहेत. तळीये गावात अतिवृष्टी झाली. त्यावेळीच तळीये गावाचा पुनर्विकास म्हाडा करेल, असे जाहीर केले होते. जून 2022 पर्यंत म्हाडा तळीये गावातील लोकांना 600 फुटांचे घर देणार आहे. मुंबईतील जिजामातानगर येथे विद्यार्थ्यांसाठी राहण्यासाठी एक नवे वसतिगृह बांधण्याचा निर्णय म्हाडाने घेतलेला आहे. 19 मजल्यांची एक इमारत बांधण्यात येत आहे. ताडदेव येथे 32 कोटी खर्च करून 928 महिला राहू शकतील अशी इमारत बांधण्यात येत आहे. तसेच पालघर येथे 20 एकरची जागा मिळाल्यास तिथे एक चांगले वृद्धाश्रम बांधण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

लिलावती हॉस्पिटलशेजारी असलेल्या भूखंडावर जागतिक दर्जाचे पशुवैद्यकीय हॉस्पिटल बांधण्यात येईल. तर जोगेश्वरी पश्चिम येथे म्हाडाच्या भूखंडावर मुंबईकरांसाठी एक जागतिक दर्जाचे हॉस्पिटल बांधण्यात येणार आहे. तसेच म्हाडा कार्यालयाच्या वांद्रे येथील इमारतीचा पुनर्विकास करून आधुनिक दर्जाची इमारत बांधली जाणार आहे, असेही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

मुंबईतील म्हाडाच्या जागा हडप करणार्‍या बिल्डरांविरोधात महाविकास आघाडी सरकार कठोर कारवाई करण्याचे सूतोवाच जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केले. यासाठी जॉनी जोझेफ यांची समिती गठीत केली आहे. बिल्डरांनी घशात घातलेला म्हाडाचा भूखंड ताब्यात घेतला जाईल असेही ते म्हणाले.

गाव तिथे म्हाडा हा प्रकल्प सुरु होत असून शंकरराव गडाख यांच्या मतदारसंमघात पहिला पथदर्शी प्रकल्प होत असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर केले.

मुंबईत 600 एसआरए प्रकल्प रखडले आहेत, याच प्रकल्पाना अभय योजना राबविण्यात येणार आहे. ही योजना यशस्वी झाली तर हजारो गरीबांना घरे मिळतील. ज्या बिल्डरांनी एसआरएच्या जागेवर विक्रीसाठीची इमारत बांधून पळ काढलेला आहे आणि झोपडीधारकांना संक्रमण शिबिरात ठेवले आहे अशा बिल्डरांवर 420 कलमातंर्गत गुन्हा दाखल करण्याचे सूतोवाच आव्हाड यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT