Latest

जालना : वाळूमाफियाने वाळूने भरलेला टिप्परच अधिकाऱ्यांच्या गाडीवर केला पलटी

Arun Patil

जाफराबाद; पुढारी वृत्तसेवा : नळणी येथून पिंपळगाव कड मार्गे माहोऱ्याकडे अवैधरित्या विनापरवाना वाळूवाहतूक करणाऱ्या टिप्परला मंडल अधिकारी व तलाठी यांनी अडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी मुजोर वाळूमाफियाने भरलेला वाळूचा टिप्परच अधिकाऱ्यांच्या गाडीवर पलटी केला. या अपघातात मंडल आधिकारी अविनाश देवकर यांच्या डोक्याला जबर मार लागल्याची घटना बुधवारी (दि.१२) रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, भोकरदन तालुक्यातील नळणी येथून अवैधरित्या वाळू वाहतूक होत असल्याची माहिती तलाठी व मंडल आधिकारी यांना मिळाली होती. त्या अनुषंगाने बुधवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास मंडल आधिकारी अविनाश देवकर व ए. पी. देशपांडे यांची महसुलच्या गस्ती पथकावर नियुक्ती असल्याने ते गस्तीवर होते. त्यांना नळणी येथून पिंपळगाव कडमार्गे माहोऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्याने एक टिप्पर वाळू वाहतुकीचे भरून जाताना दिसले.

भास्करराव शिंगणे विद्यालयाजवळ चौकशी केली व ते टिप्पर थांबविले. सदरील टिप्पर (क्रमांक एम.एच. २८ ए.बी. ७२७६) मध्ये अवैधरित्या विना परवाना वाळू होत असल्याचे त्यांना दिसले. त्यामुळे तो टिप्पर चालक व टिप्पर ताब्यात घेतल्यानंतर सदरील टिप्पर चालक यांनी त्यांच्या १२ ते १३ मित्रांना फोन करून बोलवून त्या ठिकाणी टिप्पर सोडून द्या, यासाठी हुज्जत घालू लागले.

मात्र तलाठी व मंडल आधिकारी यांनी ताब्यात घेतेलेले टिप्पर सोडून देण्यास नकार दिल्याने प्रदीप लहाने व संदीप लहाने यांच्यासह १० ते १२ वाळू माफीयांनी त्यांना धमकावून, शिवीगाळ करून त्यांना बाजूला केले. तसेच त्या ठिकाणाहून टिप्पर घेवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मंडल आधिकारी यांनी त्यांच्या पथकासह त्या टिप्परचा पाठलाग त्यांचा खासगी चारचाकी (क्रमांक एम.एच. २१ बि.एफ. ७५२५) ने सुरू केला.

तलाठी व मंडल आधिकारी पाठलाग करत असलेल्या गाडीवर जीवे मारण्याच्या हेतूने टिप्पर पलटी करुन वाळू टाकण्यात आली. त्यात मंडल आधिकारी यांच्या गाडीचा अपघात होवून मंडल आधिकारी अविनाश देवकर यांच्या डोक्याला जबर मार लागला व गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची रीतसर फिर्याद अविनाश देवकर यांनी दिली आहे.

देवकर यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांना जाफराबाद येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. टिप्पर चालक व इतर सर्व १२ ते १३ वाळू माफीयांनी घटनास्थळवरून पळ काढला. प्रदीप लहाने, संदीप लहाने व त्यांच्यासह इतर वाळू वाहतूक करणाऱ्या १२ ते १३ जणाविरुद्ध मंडल आधिकारी अविनाश देवकर यांच्या फिर्याादिवरून नुसार जाफराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक प्रल्हाद मदन हे करीत आहे. अशा घटना सतत घडत असल्याने महसूल प्रशासनात कमालीचे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अवैध वाळू वाहतूक रोखण्याचे आव्हान जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, तहसिलदार व पोलिस निरीक्षक यांच्यासमोर निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT