कोल्हापूर, राजेंद्र जोशी : जगातील विविध ऊस उत्पादक देशांमध्ये उसाच्या उत्पादनातील घट आणि इथेनॉलकडे साखर वळविण्याचा मोठा कल यामुळे जागतिक बाजारात कच्च्या साखरेचे भाव हंगामाअखेरपर्यंत सरासरीच्या दोन टक्के अधिक राहतील, असे अंदाज फिच सोल्यूशन या आंतरराष्ट्रीय स्तरावरील अर्थशास्त्राचा अभ्यास करणार्या संस्थेने काढले आहे. अर्थशास्त्राच्या विविध अंगांमध्ये संशोधन करणार्या या संस्थेने अहवाल नुकताच जाहीर केला. यात जागतिक बाजारपेठेत कच्च्या साखरेचे सरासरी भाव प्रतिपौंड 18.6 सेंटवरून 19 सेंटवर (3375 रुपये प्रतिटन) कायम राहतील. साखरेच्या या चढ्या भावाचा परिणाम महागाई वाढण्यामध्ये परिवर्तीत होणार असल्याने कमकुवत अर्थव्यवस्था असलेल्या देशांना महागाईवर नियंत्रण करताना तारेवरची कसरत करावी लागेल, असे या संस्थेचे म्हणणे आहे. युरोपात कीटकनाशकांवर बंदी आणल्यामुळे उसाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे.
याखेरीज हवामानातील बदलही उसाचे उत्पादन कमी करण्यास कारणीभूत ठरले असून भारतासारख्या जगातील दुसर्या क्रमांकाचे साखरेचे उत्पादन घेणार्या देशात इथेनॉल निर्मितीकडे साखर वळविण्याचा वाढता कलही जागतिक बाजारात साखर पुरवठ्याच्या बाजूमध्ये अडचणी निर्माण करत असल्याचे स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर जगातील साखरेच्या मागणीमध्ये होणारी वाढ आणि चीनमध्ये झीरो कोरोना संकल्पना अनुसरल्यापासून तेथे साखरेची वाढलेली मागणी पाहता मागणी आणि पुरवठ्यातील अंतराने साखरेचे भाव चढे राहतील, असे यामागील गृहितक आहे.
जागतिक बाजारात कच्च्या साखरेचे भाव प्रतिपौंड 19 सेंटपर्यंत वाढण्याचे संकेत असले, तरी ब—ाझीलमध्ये यंदा साखरेचे उत्पादन समाधानकारक आहे. इथेनॉलकडे साखर वळवूनही ब—ाझीलमध्ये साखरेचे उत्पादन 381 लाख मेट्रिक टन नोंदविले जाईल, असा अंदाज आहे. या उच्चांकी उत्पादनामुळे कच्च्या साखरेचे भाव प्रतिपौंड 20 सेंटपुढे जाणार नाहीत, असे फिच सोल्यूशनचे म्हणणे आहे.
प्रतिटन 3400 रुपये भाव मिळू शकेल
फिच सोल्यूशनच्या अंदाजानुसार येणारी कच्च्या साखरेची किंमत ही बंदरावरील (एफओबी) किंमत आहे. यामधून सरासरी प्रतिटन 200 रुपयांची वाहतूक वजा केली, तर कच्च्या साखरेला प्रतिटन निव्वळ 3200 रुपयांच्या दरम्यान दर मिळू शकतो. भारतीय साखरेला मात्र जगात थोडे वेगळे स्थान आहे. भारतातून निर्यात होणार्या कच्च्या साखरेला अन्य देशांतून जागतिक बाजारात दाखल होणार्या साखरेपेक्षा थोडा अधिक प्रीमियम दर मिळतो. हा दरातील फरक प्रतिटन सरासरी 200 रुपये धरला, तर भारतीय कच्च्या साखरेला प्रतिटन 3400 रुपये भाव मिळू शकेल, असा अर्थ काढता येणे शक्य आहे.