जळगाव ; पुढारी वृत्तसेवा : पैसा कमावण्यासाठी अनेक जण वेगवेगळे फंडे वापरत असतात. काही जण सरळ मार्गाने तर अनेक जण अवैध मार्गाने पैशाच्या पाठीमागे लागलेले दिसून येतात. यात तरुणाई मात्र, सोशल मीडिया व ऑनलाइन व्हिडिओच्या माध्यमातून नवनवीन कल्पना शिकून कमी वेळेत श्रीमंत होण्यासाठी काहीही करण्यासाठी धजावत असते. असाच काहीसा प्रकार उघडकीस आला आहे. युवकाने एका वेबसाईटवरील ऑनलाइन व्हिडिओ पाहून बनावट नोटा तयार केल्या असून त्या बाजारातही खपविल्या आहेत. मात्र, हा फंडा त्याचा पोलिसांनी हाणून पाडत त्याला गजाआड केले.
एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखा प्रकार जामनेर तालुक्यातील पहूर येथे घडला आहे. पहूर बसस्थानकावर पोलिसांचे पथक गस्तीवर होते. यावेळी मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयित उमेश चुडामन राजपूत (22, रा, हिंगणे बुद्रुक, ता.जामनेर) यास ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली. त्याच्याजवळ दोनशेच्या तीन नोटा मिळून आल्या. त्यापैकी एक नोट संशयास्पद वाटल्याने त्यास विचारपूस केली असता, त्याने प्रथम उडवाउडवीचे उत्तर दिले. त्यानंतर पोलिसी खाक्या बसताच त्याने स्वत:च्या घरी हिंगणे बु. येथे यू-ट्युबवर पाहून रंगीत प्रिंटर व मोबाइलच्या सहाय्याने 200 रुपयेच्या नकली नोटा तयार करून मार्केटमध्ये दिल्याची माहिती दिली.
पोलिसांनी हिंगणे बु. येथील घराची झडती घेतली असता, त्याच्या घरात प्रिंटर, 200 रुपयेच्या 46 बनावट नोटा व नोटा बनवण्यासाठी लागणारे कोरे कागद असे साहित्य मिळून आले.