Latest

‘जयप्रभा’ची जागा शासनाने ताब्यात घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू : डॉ. प्रतापसिंह जाधव

Arun Patil

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : जयप्रभा स्टुडिओची जागा शासनाने ताब्यात घेऊन तिचा चित्रीकरणासाठी वापर करावा, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्याची ग्वाही दै. 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी सर्वपक्षीय कृती समिती व अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या शिष्टमंडळाला सोमवारी दिली. कोल्हापुरातील टोलचा प्रश्‍न जसा दै. 'पुढारी'च्या माध्यमातून सोडवण्यात आला, त्याप्रमाणे जयप्रभा स्टुडिओ प्रकरणातही लक्ष घालून हा प्रश्‍न मार्गी लावावा, अशी विनंती शिष्टमंडळाने डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

यावेळी बाबा पार्टे यांनी जयप्रभा स्टुडिओ जागेचा वापर चित्रीकरणासाठी झाला पाहिजे. या मागणीसाठी गेल्या नऊ दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे; पण अजून शासनस्तरावर कोणताही निर्णय होत नाही. जयप्रभा स्टुडिओचा प्रश्‍न हा कलाप्रेमींचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. लवकरच याप्रश्‍नी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेण्याचे आश्‍वासन दिले आहे. या बैठकीचे नेतृत्व डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी करावे, अशी विनंती केली.

बाबा इंदुलकर यांनीही कोल्हापूरचे अनेक प्रश्‍न केवळ दै. 'पुढारी'ने घेतलेल्या निर्भीड भूमिकेमुळे सुटले आहेत. जयप्रभा स्टुडिओप्रकरणी लक्ष घालून हा प्रश्‍न सोडवण्याची विनंती केली. महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर यांनी चित्रीकरणासाठी स्टुडिओ जागेचा वापर व्हावा, याचा निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले.

यावेळी डॉ. प्रतापसिंह जाधव म्हणाले, कोल्हापूर ही चित्रपटसृष्टीची जननी आहे. कोल्हापूरला चित्रपटसृष्टीचा मोठा इतिहास आहे. त्यामुळेच कोल्हापुरात चित्रनगरी व्हावी, यासाठी आपण तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्याशी चर्चा केल्यानंतर चित्रनगरीला मोरेवाडीत जागा मिळाली. जयप्रभा स्टुडिओ वास्तूचा हेरिटेज यादीत समावेश असल्याने या वास्तूला कोणताही धोका निर्माण होणार नाही.जयप्रभा स्टुडिओ हा कोल्हापूरच्या अस्मितेचा विषय आहे.

कलाप्रेमी जनतेच्या भावनांची दखल घेऊन शासनाने हा स्टुडिओ ताब्यात घेऊन चित्रीकरण कारण्यासाठी त्याचा वापर करावा. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांच्याशी चर्चा करून हा प्रश्‍न तत्काळ सोडवण्यास सांगू, अशी ग्वाही डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी दिली.

यावेळी दिलीप देसाई, आनंद काळे, स्वप्निल राजशेखर आदींनी जयप्रभा स्टुडिओबद्दल आपल्या भावना व्यक्‍त केल्या. या शिष्टमंडळात बाळा जाधव, सतीश बिडकर, मिलिंद अष्टेकर, अशोक भंडारे, अरुण चोपदार, महेश पन्हाळकर, अर्जुन नलवडे, अमर मोरे, दुर्गेश लिंग्रस व समिती सदस्यांचा समावेश होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT