कोल्हापूर ; सचिन टिपकुर्ले : जयप्रभा स्टुडिओ प्रश्नी सांस्कृतिक मंत्र्यांसोबत आठ दिवसांत बैठक घेण्याचे आश्वासन वीस दिवसांपूर्वी दिले गेले होते; पण वीस दिवस उलटले, तरीही यावर चर्चा झालेली नाही. लोकप्रतिनिधींनी केवळ निवेदन स्वीकारत आश्वासनांची पाने पुसली. त्यामुळे आंदोलकांमधून संताप व्यक्त होत आहे.
जयप्रभा स्टुडिओ जागेची विक्री झाल्यानंतर कोल्हापुरात आंदोलन सुरू झाले. जागेच्या मोबदल्यात जागा दिल्यास स्टुडिओची जागा हस्तांतरित करण्याची तयारी संबंधित कंपनीने दाखवली; पण महापालिका आयुक्त कादंबरी बलकवडे यांनी सध्या महापालिका सभागृह अस्तित्वात नसल्याने सदर जागा संपादित करण्याचा निर्णय प्रशासन घेऊ शकत नाही. जागेचा मोबदला देणे किंवा विकास करणे शक्य नाही. त्यामुळे शासनानेही जागा ताब्यात घेऊन विकसित करावी, याबाबतचा प्रस्ताव नगरविकास खात्याला पाठवू, असे सांगितले.
आंदोलकांची एकच भूमिका आहे की, जयप्रभा स्टुडिओ वाचला पाहिजे. यासाठी त्यांनी पालकमंत्री सतेज पाटील, सांस्कृतिक राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना निवेदन दिले. कोल्हापूर चित्रनगरीने ही जागा ताब्यात घ्यावी अन्यथा महामंडळ स्टुडिओ चालवण्यास सक्षम आहे, अशी तयारीही दर्शवली.
याबाबत दोन्ही मंत्र्यांनी सांस्कृतिकमंत्री अमित देशमुख यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे सांगितले.
तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार : यमकर
सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे.सर्व मंत्रिमंडळ एकत्र आहे.जयप्रभा स्टुडिओ जागेबाबत चर्चा करण्याची संधी आहे.नेत्यांनी आश्वासन दिले त्याचे पालन करावे. अनेक संस्था संघटनांचा आम्हाला पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे जोपर्यंत स्टुडिओ जागेचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवणार, असा निर्धार महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर यांनी व्यक्त केला.
आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा
कोल्हापूर : जयप्रभा स्टुडिओ चित्रीकरणासाठी कायमस्वरूपी खुला व्हावा, या मागणीसाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने सुरू असलेल्या साखळी उपोषणाला विविध संस्थांचा पाठिंबा मिळत आहे.
बालगोपाल तालीम मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र कुरणे, कला दिग्दर्शक संघ मुंबईचे अध्यक्ष उल्हास नांद्रे, महिला ग्रुप मरगाई गल्ली, अॅडव्हेंचर प्रोडक्शन हाऊस, मुंबई एकी ग्रुप या व इतर मान्यवर संस्थांनी आंदोलनाच्या ठिकाणी येऊन जाहीर पाठिंबा असल्याबाबतचे पत्र उपाध्यक्ष धनाजी यमकर यांच्याकडे दिले. 'जयप्रभा स्टुडिओ वाचलाच पाहिजे', 'कलेचा वारसा जपलाच पाहिजे', 'हम सब एक है' अशा विविध घोषणा देण्यात आल्या. यावेळी शरद चव्हाण, सतीश बिडकर, अर्जुन नलवडे, राहुल राजशेखर, मधुकर वाघे, राहुल चव्हाण, बाबा पार्टे, अशोक पोवार आदींसह कलाकार-तंत्रज्ञ उपस्थित होते.