इस्लामपूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘परिवार संवाद’ यात्रेच्या सभेत बोलताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील. व्यासपीठावर मंत्री धनंजय मुंढे, ना. जितेंद्र आव्हाड, रुपाली चाकणकर, आ. अमोल मेटकरी आदी.  
Latest

जयंत पाटील म्हणाले, राष्ट्रवादी राज्यात एक नंबरचा पक्ष बनवू

अमृता चौगुले

इस्लामपूर; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी दिलेली प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी पेलून राज्यात शंभरहून अधिक विधानसभेच्या निवडून आणू. राष्ट्रवादी पक्ष राज्यात सर्वात मोठा पक्ष बनवू; असा विश्‍वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांनी इस्लामपुरात व्यक्त केला. येथील जयंत पाटील खुल्या नाट्यगृहात आयोजित 'राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रे'च्या जाहीर सभेत ते बोलत होते.

ना. पाटील पुढे म्हणाले, 14 हजार किलोमीटरचा प्रवास करत महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात परिवार संवाद यात्रेद्वारे 34 जिल्ह्यातील, 353 तालुक्यातील लोकांपर्यंत आम्ही पोहोचलो. त्यांचे प्रश्‍न जाणून घेतले. राष्ट्रवादी पक्ष हा गोरगरिबांना उभा करणारा, सर्व जाती-धर्मांना बरोबर घेणारा पक्ष आहे. परिवार संवाद यात्रेमुळे सबंध राज्याच्या कानाकोपर्‍यात राष्ट्रवादीला बळकटी आली आहे

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले, देशातील धर्मांधता आपल्या देशाला पाकिस्तान, श्रीलंकेसारखे अराजकतेकडे नेत आहे. गॅस, पेट्रोल, डिझेल दरवाढीने, महागाईने सामान्य जनता होरपळत आहे. सध्या पुरंदरे, जेम्स लेन यांना पुढे आणून नवा ट्रॅप आणला जात आहे. महागाईने जनतेचे जगणे मुश्कील झाले आहे. आपली वाटचाल अशीच राहिली तर या देशाचा पाकिस्तान झाल्याशिवाय राहणार नाही. आपण चांगले विचार संपवायला निघालोय. नथुराम गोडसेच्या पिलावळीने दाभोळकर, पानसरे, गौरी लंकेश यांना संपविले. मात्र त्यांचे विचार कधी संपणार नाहीत.

आ. अमोल मेटकरी म्हणाले, खा. शरद पवार यांच्या हृदयात छत्रपती आहेत. भाजपला शाहू, फुले, आंबेडकर यांची इतकी अलर्जी का? भाजपवाल्यांनी आम्हाला धर्म शिकवू नये. शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याचा नागपुरात सूत्रधार आहे. तसेच सांगली जिल्ह्यातील आणखी दोन सूत्रधार आहेत. एस. टी. कर्मचार्‍यांचे गोळा केलेले पैसे येथेही आले नाहीत ना? ते ही पहावे लागेल.

रुपाली चाकणकर म्हणाल्या, ना. जयंत पाटील यांनी संवाद यात्रेतून महाराष्ट्रातील माणूस जोडत संघटना व कार्यकर्त्यांना सन्मान दिला. यावेळी मेहबूब शेख, रवींद्र वरपे, सुनील गव्हाणे, सक्षणा सलगर यांचीही भाषणे झाली. तालुकाध्यक्ष विजय पाटील यांनी प्रास्ताविक केले. शहराध्यक्ष शहाजी पाटील यांनी आभार मानले. यावेळी सदानंद गाडगीळ, संदीप तांबवेकर यांनी सूत्रसंचालन केले. माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, आ. मानसिंगराव नाईक, दिलीप पाटील, आ. अरुण लाड, सारंग पाटील , सुरेश पाटील, राजू जानकर, पी. आर. पाटील, शामराव पाटील, विनायक पाटील, वैभव शिंदे, अविनाश पाटील, अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक, बाळासाहेब पाटील, अ‍ॅड. चिमण डांगे, देवराज पाटील, खंडेराव जाधव, सुस्मिता जाधव, विजय पाटील, सुनीता देशमाने, भगवान पाटील, शरद लाड, शुभांगी पाटील उपस्थित होते.

भविष्यात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री : धनंजय मुंडे

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हा आमचा राजकारणाचा नव्हे, तर श्रद्धेचा विषय आहेत. छत्रपतींनी उभा केलेल्या रयतेच्या स्वराज्याला अभिप्रेत असणारे राजकारण शरद पवार करीत आहेत. त्यांनी अठरा पगड जातीतील कार्यकर्त्यांना संधी दिली. त्यांना जातीयवादी म्हणता? ना. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यातील प्रथम क्रमांकाचा पक्ष होईल. येत्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे 100 पेक्षा जास्त आमदार निवडून येऊन राज्याचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा होईल.

…तुमच्या ताकदीने, पाठिंब्याने मी राज्यभर फिरतोय!

गेली 35 वर्षे या तालुक्यातील जनतेने मला तळहातावरील फोडाप्रमाणे जपले आहे. पी. आर. दादा, शामराव आण्णा यांच्यासारखी म्हणजे सोन्यासारखी माणसे राजारामबापू यांनी मला दिली. त्यांच्या विश्‍वासामुळे ते काहीतरी गडबड करतील, असे पापही माझ्या मनात कधी आले नाही. संस्था सगळ्या एकदम उत्तम आहेत, असे जयंत पाटील म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT