जत शहर; पुढारी वृतसेवा : गावच्या पंचाकडे दाद मागूनही न्याय न मिळाल्याने वाळेखिंडी येथील तरुण शेतकर्याने जत दुय्यम निबंधक कार्यालय परिसरात दूरध्वनीच्या खांबावर चढून न्याय मागण्याच्या स्टंटची जत तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे.
वाळेखिंडी (ता. जत) येथील शेतकरी बापूसाहेब नारायण शिंदे यांनी त्यांच्या शेतात विंधन विहीर खोदली होती. या विंधन विहिरीला चांगले पाणी लागल्याने शिंदे यांच्या भावकीने या विंधन विहिरीवर असलेल्या विद्युत मोटारीसाठी चोरून आकडा टाकून वीज कनेक्शन घेतले.
परंतु वीज मंडळाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या निदर्शनास हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी सबंधितांवर गुन्हा दाखल करून चोरून वापरत असलेला विद्युत पुरवठा बंद केला. शिंदे यांनी आपल्या भावकीतील लोकांना कायदेशीर कनेक्शन घ्या व वीज वापरा असे सांगितले. परंतु भावकीतील लोकांनी त्यांचे काहीही ऐकले नाही. उलट त्यांनाच मारहाण केली. याविषयी बापूसाहेब यांनी गावच्या पंचाकडे दाद मागितली, परंतु पंचानीही त्यांचे ऐकले नाही. यानंतर त्यांनी जत पोलिसात दाद मागितली, परंतु पोलिसांनीही त्यांना कसलीही मदत केली नाही.
आज शुक्रवारी बापूसाहेब हे जत दुय्यम निबंधक कार्यालय परिसरात आले होते. परंतु बापूसाहेब व त्यांच्या भावकीत असलेल्या जमिनीचे वाटप प्रकरण हे जत तहसीलदार यांच्याकडे असल्याने व त्यांच्या भावकीतील लोक हे या परिसरात दिसत नसल्याने बापूसाहेब यांच्या रागाचा पारा चढला. ते झटपट जत दुय्यम निबंधक कार्यालय परिसरात असलेल्या दूरध्वनीच्या खांबावर चढले व जोरजोरात मला न्याय पाहिजे म्हणून ओरडू लागले.
शिंदे हे दूरध्वनीच्या खांबावर चढून वर टोकापर्यंत पोहोचल्याने या परिसरात बघ्यांची मोठी गर्दी वाढली. यावेळी जत नगरपरिषदेचे नगरसेवक प्रकाश माने व अन्य लोकांनी त्याला समजावून खाली उतरायला भाग पाडले. त्यानंतर शिंदे यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचला व न्याय पाहिजे, अशी मागणी केली.