Latest

चौरंगी आहार आणि नवरात्र

Arun Patil

सजीवांच्या मूलभूत गरजांपैकी एक गरज म्हणजे आहार. आहाराचा आपल्या मन आणि बुद्धीवर परिणाम होतो, असा उल्लेख भगवद्गीतेमध्ये आहे. सात्त्विक, समतोल आहार सेवन करावा. असे आपण नेहमी ऐकतो. वजन नियंत्रित राहत नाही किंवा वजन कमी होतंय. चेहरा तजेलदार नाही वा मुरुमांंनी भरलेला आहे. उत्साह वाटत नाही. सतत चिडचिड होते. नाना तर्‍हेच्या प्रकृती आणि तितक्याच तक्रारी. या आणि अशा अनेक तक्रारींवर रामबाण उपाय प्रत्येकाच्या घरातच दडला आहे.

आपल्या देशात सणवार, व्रतवैकल्ये या दिवसांत शाकाहारी, सात्त्विक आहाराचे सेवन करण्यास सांगितले आहे. भारतासोबत इतर देशांनाही शाकाहारी आहाराचे महत्त्व पटले आहे. म्हणूनच 1 ऑक्टोबर रोजी जागतिक शाकाहारी दिवस साजरा केला जातो.
शाकाहारी जेवणात चौरस म्हणजेच चौरंगी आहाराचा समावेश असावा. चौरंगी म्हणजे चार पुढील रंग.

लाल : गाजर, टोमॅटो, लाल रंगाची फळभाज्या.
हिरवा : हिरव्या पालेभाज्या, फळे.
पिवळा : पिवळ्या रंगाची फळे, लिंबू, आवळा, चपाती, वरण, भाकरी.
पांढरा : कांदा, लसूण, मुळा, भात.

* अशा चार रंगांचा आहार नित्यनियमाने घ्यावा.

* शरीराच्या जडणघडणीसाठी आवश्यक असणारे प्रथिने.

* शरीरास कार्य करण्यास ऊर्जा पुरवणारे कर्बोदके आणि स्निग्ध पदार्थ.

* शरीराची प्रतिकारशक्ती तसेच चयापचयासाठी आवश्यक असणारी जीवनसत्त्वे.

* मलविसर्जन, शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवण्यासाठी आवश्यक पाणी.

* संतुलित आहाराने वरील पोषक घटकांची शरीरास कमतरता भासणार नाही.

स्रोत

कर्बोदके : चपाती, भाकरी, भात, बटाटे, भाज्या, ओट्स, फळे इत्यादी.

प्रथिने : दूध, दुधाचे पदार्थ, दही, पनीर, सर्व प्रकारच्या डाळी, राजमा, सोयाबीन.

व्हिटॅमिन्स : सर्व फळे, मोड आलेली कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या.

* खनिजद्रव्ये : कॅल्शियम, लोह, पोटॅशियम, सोडियम अशा खनिज द्रव्यांसाठी सुकामेवा, दूध, दुधाचे पदार्थ, आवश्यक तेवढे मीठ, कडधान्ये यांचे सेवन करावे.

* पाणी : दिवसभरात तीन ते चार लिटर पाणी प्यावे. शरीराचे तापमान समतोल ठेवण्यासाठी तसेच पचनक्रिया सुधारण्यासाठी, शरीराच्या भागांसाठी वंगण म्हणून पाणी लाभदायी ठरते. शिवाय नवरात्रीचे उपवास सुरू झाले आहेत. काही जण नऊ दिवस कडक उपवास करतात. परंतु त्यामुळे आरोग्य बिघडू शकते. नवरात्रीतील नऊ दिवस चौरस आहार घेणे शक्य होत नाही. परंतु आरोग्याकडे दुर्लक्ष करून उपवास करणे हेही चुकीचे ठरेल. आहारात पुढील बदल केल्याने नऊ दिवस उपवास करणे सोपे होईल आणि आरोग्यास जपता येईल.

* पचनास हलका आहार घ्यावा.

* फळांचा भरपूर वापर करावा. यामुळे भूक भागून ऊर्जा आणि व्हिटॅमिन्स मिळतील.

* पाण्याचे प्रमाण वाढविणे. यांत लिंबूपाणी, नारळपाणी, ताक यांचा समावेश करावा. जेणेकरून शरीरातील पाण्याची मात्रा अबाधित राहून थकवा जाणवणार नाही.

* साबुदाणा, बटाटे यामुळे शरीरास ऊर्जा मिळत राहील. परंतु साबुदाण्याचे सेवन अतिमात्रेत करू नये.

* गूळ शेंगदाणे, सुकामेवा, दूध, दही अशा पदार्थांमुळे खनिजे मिळत राहतील. शिवाय दूध हे पूर्णान्न असल्याने संतुलित आहाराची गरज भागत राहील. अशा आहाराच्या नियोजनामुळे नऊ दिवसांचे उपवास करता येऊ शकतात.

* शाकाहारी लोकांची रोगप्रतिकारकशक्ती कमी असते असे मानले जाते. परंतु आहार घटकांचे योग्य नियोजन, मात्रा, शिजवण्याची योग्य पद्धत, सेवनाची योग्य पध्दत यामुळे शाकाहारी लोक सुदृढ राहू शकतात.

आयुर्वेदात आचार्य सुश्रुत सांगतात –

आहार:प्रीणन:सदयो बलकृद्देहधारक:।

म्हणजेच योग्य सात्त्विक आहारातून संतुष्टी, शक्ती, बल, उत्साह, तेज यांची प्राप्ती होते. जागतिक शाकाहारी दिनासोबत या नवरात्रीत देखील सात्त्विक, संतुलित, चौरंगी आहाराचे सेवन करून आरोग्याची उपासना करू या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT