नवी दिल्ली, वृत्तसंस्था : अरुणाचल प्रदेशातील तवांगमध्ये भारतीय जवानांसोबत झालेल्या हिंसक धुमश्चक्रीनंतर चीनने ईशान्येकडील सीमेलगतच्या हवाई तळावरील हालचाली वाढविल्या आहेत. भारतीय जवानांकडून मार खाल्ल्यानंतर सीमेपासून अवघ्या 150 कि.मी. अंतरावर चीनने लढाऊ विमाने आणि ड्रोनची संख्या वाढविली आहे. मॅक्सार टेक्नोलॉजीच्या उपग्रहीय छायाचित्रांतून चीनचे हे कारस्थान उघड झाले आहे.
चीनने आपल्या बँगडा हवाई तळावर सोरिंग ड्रॅगन ड्रोन तैनात केले आहे. हे ड्रोन छायाचित्रात दिसते आहे. बँगडा हवाई तळ अरुणाचल सीमेपासून 150 कि.मी.वर आहे. ड्रॅगन ड्रोन तसेच युद्धविमानांची छायाचित्रे समोर येताच भारतीय हवाई दलही अधिक सक्रिय झाले आहे. चीनच्या सीमेवरील हालचाली वाढल्यानेच भारतीय हवाई दलानेही गुरुवार तसेच शुक्रवारच्या युद्धसरावांनतरही आपल्या सरावसदृश हालचाली कायम ठेवल्या आहेत.
याआधी 11 डिसेंबर रोजी अमेरिकेच्या वॉर झोन या संरक्षण क्षेत्राला वाहिलेल्या संकेत स्थळानेही उपग्रहीय छायाचित्रे जारी केली होती. तिबेटच्या शिगात्से पीस विमानतळावर चीनची 10 लढाऊ विमाने आणि 7 ड्रोन त्यात स्पष्ट दिसत होते. तिबेटच्या न्यिंगची, शिंगत्से आणि नागरी येथे चीनची 5 विमानतळे आहेत. भारत-नेपाळ सीमेपासून ती जवळही आहेत. चीनने गतवर्षी ल्हासा ते न्यिंगची बुलेट ट्रेन सेवा सुरू केली होती. तिचे रुळ अरुणाचलजवळूनच जातात.
सोरिंग ड्रोन का धोकादायक
ताज्या छायाचित्रात सोरिंग ड्रॅगन ड्रोनव्यतिरिक्त तात्पुरती विमान घरेही (शेल्टर हाऊस) दिसत आहेत. सोरिंग ड्रॅगन ड्रोन 2021 मध्ये चिनी हवाई दलात दाखल झाले होते. टेहळणी, हेरगिरी आणि हल्ले अशा तिहेरी उपयोगात ते आणले जाते. दहा तास हा ड्रोन सातत्याने उडू शकतो. हा ड्रोन क्रूझ क्षेपणास्त्र हल्ल्यासाठी डेटाही ट्रान्सफर करू शकतो. या तंत्रामुळे हा ड्रोन जमिनीवरील लक्ष्यावर अचूक मारा करू शकतो. भारताच्या भात्यात अद्याप या प्रवर्गातील एकही ड्रोन नाही.