बीजिंग, वृत्तसंस्था : राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या 'शून्य कोरोना' धोरणाविरुद्ध तसेच त्यांनी खुर्ची सोडावी म्हणून चीनच्या बीजिंगसह बहुतांश सर्वच शहरांमध्ये सुरू असलेली निदर्शने आता थंडावत आहेत. सरकारने निदर्शकांविरुद्ध कडक धोरण स्वीकारले असून, कुणालाही आता घराबाहेर पडण्यावर बंदी घालण्यात आली आहे. बहुतांश शहरांमध्ये प्रचंड पोलिस बंदोबस्त आहे. सर्वत्र पोलिसच पोलिस दिसत आहेत. जमावबंदी लागू केली आहे.
तीनपेक्षा जास्त लोक एकत्र दिसले की, पोलिस लाठीमार करतात. रस्त्यावर दिसेल त्याच्या फोनची तपासणी करतात. निदर्शकांमध्ये सरकारने आपले हेर सोडले असून, निदर्शक जमणार असलेल्या ठिकाणांवर आधीच पोलिस पोहोचत आहेत आणि पोहोचेल त्याला अटक करत आहेत.
टेलिग्राम आणि अन्य सोशल मीडियावरून निदर्शनांची स्थळे पोलिसांनी हेरल्याचे सांगण्यात येते. शांघायमध्ये निदर्शक मोर्चा काढणार होते, याबद्दल कळताच मोठाले बॅरियर्स वाटांमध्ये उभे करण्यात आले. झेंगझोऊमध्ये शेकडो निदर्शकांना पोलिसांनी अटक केली आहे
थंडी, सवलतींचाही परिणाम
घटत्या तापमानानेही सरकारला दिलासा दिला आहे. सर्वत्र थंडी वाढते आहे. शांघाय आणि नानजिंगमध्ये तर थंडी मी म्हणते आहे. या दोन्ही शहरांतून थंडीमुळे निदर्शने रद्द झाली. दुसरीकडे, कोरोना निर्बंधांमध्येही सरकारने काही सवलती दिल्याचाही परिणाम निदर्शने थंडावण्यावर झालेला आहे.