Latest

अग्रलेख : चीनची मुजोरी

अमृता चौगुले

भारत आणि चीनच्या सीमेलगतच्या युद्धसद़ृश परिस्थितीत भारताने कोणत्याही क्षणी युद्धाला सामोरे जाण्याची तयारी ठेवण्याचे आदेश संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी दिले आहेत. 'चिफ ऑफ दी आर्मी स्टाफ'च्या बैठकीत संरक्षणमंत्र्यांनी हे सूतोेवाच केल्याने त्याचे महत्त्व अधिक आहे. जनरल बिपिन रावत, हवाई दलाचे प्रमुख व्ही. आर. चौधरी यांच्यासह हवाई दलाचे अत्यंत महत्त्वाच्या अधिकार्‍यांसोबत झालेल्या बैठकीत राजनाथसिंह यांनी युद्धाला सामोरे जाण्याची एकप्रकारे घोषणाच केली आहे. लष्करप्रमुख एम. एन. नरवणे यांंनीही यापूर्वीच युद्धाला सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तविली होती. त्यामुळे भारत आणि चीनच्या सीमेलगत काय परिस्थिती आहे हे अधोरेखित होते. भारताच्या सीमेलगत चीन आणि पाकिस्तानच्या कुरापती सातत्याने सुरूच असतात. त्यातल्या त्यात सध्या तरी भारत आणि चीनमधील तणाव वाढतच आहे. चीन आणि अमेरिकेतही बेबनाव आहेच. चीन आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला दबदबा निर्माण करू पाहात आहे. आर्थिक, राजकीय आणि लष्करी पातळीवरील चीनच्या हालचाली हेेच सूचित करीत आहेत. भारतीय सीमेलगत लष्करी हालचाली करणार्‍या चीनने अमेरिकन युद्धनौका नष्ट करण्याचादेखील सराव सुरू केला आहे. चीनच्या वाळवंटी भागात अमेरिकन युद्धनौकांची प्रतिरूपे तयार करून हा सराव केला जात असल्याचे अमेरिकेनेच स्पष्ट केले आहे. त्यामुळे चीनच्या सर्वांगीण धोरणावर भारताने लक्ष केंद्रित केले आहे. चीन भारतासमोर तर मुजोरी करतोच; पण यासोबतच आंतरराष्ट्रीय स्तरावरही दांडगाई करण्यास मागेपुढे पाहात नाही. हेच ओळखून भारताने अफगाणिस्तानमधील भूमी दहशतवादाचे सुरक्षित नंदनवन बनू नये यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली. त्यासंदर्भात परवाच नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीत रशिया आणि इराणसह तजाकिस्तान, तुर्कमेनिस्तान, कझाकिस्तान आदी देशांची उपस्थिती राहिली. या देशांनी अफगाणिस्तानचे सार्वभौमत्व व तेथील अखंडता अबाधित राहावी ही भूमिका घेतली. बैठकीवर अघोषित बहिष्कार घालून चीनने आपले मनसुबे जाहीर केले. विशेष म्हणजे अफगाणिस्तानच्या प्रश्नावर पाकिस्तानने बोलावलेल्या बैठकीबाबत चीन अनुकूल आहे. यातूनच चीनच्या भारतीय सीमेबाबतची कूटनीती दिसून येतेे. एक तर 1962 पासून कब्जा केलेल्या भारताच्या भूमीवर चीन आजही तंबू ठोकून आहे. नुसताच तंबू ठोकून नाही तर तेथील लष्करी साम्राज्यात तो सातत्याने वाढ करत आहे. अरुणाचल प्रदेशातील अशाच एका बळकावलेल्या सुबनगिरी गावात चीनने पायाभूत सुविधा उभारण्यास सुरुवात केली आहे. हे गाव तर 1959 पासून चीनने बळकावले आहे.

सीमेलगतच्या गावांमध्ये पायाभूत सुविधा उभारण्याचा कायदा करून काही दिवसही उलटलेले नाहीत. लगेचच चीन आपले इरादे स्पष्ट करून भारताला कोंडीत पकडण्यासाठी युद्धसद़ृश परिस्थिती निर्माण करीत आहे. अर्थात, भारतीय लष्कर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारताची भूमिका लक्षात घेऊन चीन तातडीने युद्ध करेल असे वाटत नाही, असे अभ्यासकांचे मत आहे. चीन एकामागून एक डाव टाकतोय हे मात्र नक्की. या डावांना शह देण्याची भारताचीही तयारी आहे. चीन युद्धसद़ृश परिस्थिती निर्माण करणार असेल तर आपणही युद्धाला सामोरे जाण्यास सज्ज आहोत, हे भारताने ठणकावून सांगायलाच हवे. संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी नेमके तेच केले आहे. हा संदेश चीनपर्यंत गेलाच असणार. एका बाजूने भारतीय सीमेलगत लष्कराच्या हालचाली सुरू ठेवायच्या आणि दुसरीकडे पाकिस्तानलाही हवी ती लष्करी मदत करायची चीनची चाल जगजाहीर आहे. भारत आणि अमेरिकेसोबत बिघडलेल्या संबंधाच्या पार्श्वभूमीवर चीन दोन्ही देशांबाबत डावपेच खेळत आहे. अशातच अफगाणिस्तानमधील बदल हा चीनला फायद्याचा ठरू शकेल का यावर विचार सुरू झाला. प्रत्यक्षात भारताने अफगाणिस्तानमधील बदलानंतर पावले उचलण्यास सुरुवात केल्यामुळे चीन बावचळला आहे. राजकीय, आर्थिक, लष्करी पातळीवर भारतासोबत बिघडलेले संबंध आणि दुसरीकडे अमेरिकेलाही युद्धसज्जतेचा इशारा देणारा चीन आता सर्व बाजूंनी एकाकी पडण्याची चिन्हे आहेत. अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य परतल्यानंतर रशियाने भारतासह त्या भूमीत दहशतवाद आणि अमली पदार्थांची बाजारपेठ उभी राहू नये यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यात इतरही देश सहभागी होत आहेत. याच परिस्थितीत अमेरिका
आणि चीनमध्येही तणाव आहेच. अशा स्थितीत सर्वांत आधी भारताला कोंडीत पकडण्यासाठी चीन सीमेलगत खेळ खेळतोय. चीनचा हा खेळ दोन्ही देशांच्या मुळावर घाव घालू शकतो. कारण, युद्ध किती काळ चालेल, कोण जिंकेल आणि हरेल याहीपेक्षा युद्ध झालेच तर ते चीनलाही परवडणारे नाही हे चीन ओळखून आहे. भारताला फक्त त्याला त्याची जाणीव करून द्यायची आहे. भारताच्या सीमेलगत चीन आपली शक्ती पणाला लावत आहे. आर्थिकद़ृष्ट्या गुंतवणूक करत आहे. भारताला या सुविधा उभ्या करण्यास उशीर झाला असे काहींचे म्हणणे आहे. त्याबाबत जरूर विचार होत राहील; पण चीन सीमेलगत करत असलेल्या कुरापती आणि लष्करी सज्जतेबाबत भारतही तितकाच खंबीर आहे. एकेकाळी हिंदी-चिनी भाई-भाईचा नारा प्रसिद्ध होता. त्याचा मोठा अनुभव भारताच्या पाठीशी आहेच. आता तर चीन उघडपणे पाकिस्तानला मदत करून आणि स्वतःही भारतासोबत संघर्षाच्या पवित्र्यात आहे. आता डाव उघड आहे आणि रणांगणही खुले आहे. चीनला कोणत्या वाटेने जायचे हा चीनचा विषय नाहीच, त्याला योग्य वाटेवर आणायचे हा भारताचा विषय आहे. भारत त्यासाठी सज्ज आहे, हेच अलीकडच्या हालचालींवरून स्पष्ट होते. चीनची ही खुमखुमी ठेचायची वेळ तर आली नाही ना? हा प्रश्न राजनाथसिंह यांच्या 'लष्करी सज्जते'च्या आदेशावरून निर्माण होतो, त्याचे योग्य उत्तर भारत योग्यवेळी देईलच.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT