Latest

चीन : इलेक्ट्रॉनिक युद्धनीती

अमृता चौगुले

अमेरिकेतील 'सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक स्टडीज' या थिंक टँकच्या अहवालानुसार दक्षिण चीन समुद्रामध्ये चीनने इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरची क्षमता प्रचंड वाढवली आहे. चीन गेल्या अनेक वर्षांपासून यासाठी प्रयत्नशील होता. त्यातून आता ही प्रणाली पूर्ण सज्ज झाल्याचे हा अहवाल सांगतो. याचा जगावर आणि भारतावर काय परिणाम होईल आणि भारताने यासंदर्भात काय पावले उचलली पाहिजेत, याविषयी…
दक्षिण चीन समुद्र हा गेल्या काही वर्षांमध्ये आंतरराष्ट्रीय समुदायाच्या चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. या समुद्रातील बेटांवर चीनने लष्करी तळ विकसित केले आहेत. त्या जोरावर चीन याs समुद्रामध्ये अन्य देशांना नौकायनास मज्जावाची भाषा करू लागला आहे. दक्षिण चीन समुद्र हा सागरी व्यापाराच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. या भागात नैसर्गिक साधनसंपत्ती विपुल आहे. कदाचित म्हणूनच चीनकडून जवळपास सर्वच दक्षिण चीन समुद्राच्या भागावर सातत्याने दावा सांगण्यात येतो. चीनच्या या दाव्याला भारतासह मलेशिया, फिलीपाईन्स, ब्रुनेई, व्हिएतनाम आदी देशांनी सातत्याने विरोध केला आहे.

अमेरिकेतील 'सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक स्टडीज' या थिंक टँकने अलीकडेच एक धक्कादायक माहिती समोर आणली असून ती भारताची चिंता वाढवणारी आहे. या थिंक टँकने चीनबाबत एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार दक्षिण चीन समुद्रामध्ये चीनने इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरची क्षमता प्रचंड वाढवल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. चीन अनेक वर्षांपासून यासाठी प्रयत्नशील होता. त्यातून आता ही प्रणाली पूर्ण सज्ज झाल्याचे हा अहवाल सांगतो.

इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर म्हणजे काय, हे पाहूया! आपण रडारच्या मदतीने माहिती गोळा करत असतो. रेडिओसेटवर आपण बोलत असतो किंवा मोबाईलद्वारे आपले संदेशवहन सुरू असते. यासाठी इलेक्ट्रॉनिक लहरी किंवा तरंग तयार होत असतात. इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरमध्ये या लहरी किंवा तरंग मध्येच अडवून त्यातून नेमकी कोणती माहिती वहन केली जात आहे, याचा शोध घेतला जातो. याचाच अर्थ चीनने याबाबतची क्षमता विकसित केल्यामुळे दक्षिण चीन समुद्राच्या भागातून होणारे इलेक्ट्रॉनिक संदेशवहन, त्यातील माहिती, या समुद्री क्षेत्रातून जाणार्‍या व्यापारी जहाजांकडून केले जाणारे संदेशवहन, या हद्दीतून जाणार्‍या विमानांमार्फत होणारे संवाद-माहितीचे वहन या सर्वांविषयीची माहिती चीनला समजणार आहे. याखेरीज रडारद्वारे होणार्‍या माहितीचा उलगडाही चीनला होणार आहे. थोडक्यात, चीनला या नव्या प्रणालीमुळे दक्षिण चीन समुद्रातून मोठ्या प्रमाणावर गुप्तचर, खासगी माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

दक्षिण चीन समुद्र हा आंतरराष्ट्रीय जलमार्ग आहे. अनेक देशांची जहाजे या समुद्रातून जात असतात. यामध्ये व्यापारी जहाजांचे प्रमाण मोठे आहे. या जहाजांवरील लोकांकडून मोबाईलसारख्या विविध इलेक्ट्रॉनिक संसाधनांच्या साहाय्याने होणारी सर्व चर्चा, संदेशांची देवाणघेवाण याची इत्थंभूत माहिती चीनला होणार आहे. त्याचबरोबर या यंत्रणेमुळे चीनला या भागातून जाणार्‍या सर्व जहाजांवर लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. यामध्ये लढाऊ जहाजांचाही समावेश असेल, मग ते अमेरिकेचे लढाऊ जहाज असो वा युरोपचे वा भारताचे असो! याखेरीज सामरिक उद्देशाने जाणार्‍या पाणबुड्यांचीही माहिती चीनला मिळू शकणार आहे. या सर्वांमुळे गुप्तहेर माहिती जमवण्यामध्ये चीनची बाजू जबरदस्त भक्कम होणार आहे.

गुप्तहेर माहितीचा सर्वाधिक वापर लढाईच्या काळात होतो. दक्षिण चीन समुद्रात लढाई झाल्यास चीनच्या पाणबुड्या, लढाऊ जहाजे इतर देशांच्या पाणबुड्यांना अधिक क्षमतेने तोंड देऊ शकतील. दुसरे असे की, चीनने या सागरी क्षेत्रात इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरसाठी अत्यावश्यक रडार आणि सॅटेलाईट ट्रॅकिंग स्टेशन्स तयार केली आहेत. ही संसाधने वादग्रस्त भागात बसवली आहेत. म्हणजेच व्हिएतनाम, जपान, तैवान, फिलीपाईन्स या देशांबरोबर ज्या सागरी भागांवरून चीनचा वाद आहे, त्याच भागात चीनने ही स्टेशन्स कार्यान्वित केली आहेत.

चीनने दक्षिण चीन समुद्रात चालवलेली सामरिक सज्जता ही दुर्लक्षित करण्याजोगी नाही. आगामी काही महिन्यांत चीन तैवानवर हल्ला करण्याची दाट शक्यता आहे. कारण, चीन सातत्याने आणि उघडपपणाने तैवान स्वतंत्र देश नसून आमचाच भूभाग असल्याचा दावा करत आहे. तैवान हे स्वतंत्र बेट असून ते चीनपासून 100 ते 150 किलोमीटर समुद्रात आहे. त्यामुळेच चीनने अशी जहाजे दक्षिण चीन समुद्रात तैनात केली आहेत. त्यामुळेच चीन तैवानबाबत मोठे पाऊल उचलण्याच्या प्रयत्नात आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो.

याखेरीज ज्याला ग्रे झोन वॉरफेअर किंवा शांतता काळातील युद्धतयारी म्हटले जाते, त्याबाबत चीन अग्रेसर राहिला आहे. चीनने अनेक संहारक शस्त्रास्त्रे विकसित केली आहेत. ती नीट आहेत की नाहीत, त्यांच्या क्षमतेची चाचपणी चीन करत असतो. चीन दक्षिण चीन समुद्रात नेहमीच विविध शस्त्रास्त्रांच्या, युद्धसामग्रीच्या चाचण्या करत असतो. मागील काळात चीनने लेझर बीम डागल्यामुळे जहाजांची रडार खराब झाली होती. इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरअंतर्गत काही लोकांच्या बुद्धिमत्तेवर परिणाम केल्याची प्रकरणेही आहेत. अशा प्रकारचे अमानवी प्रयोग करण्याबाबत चीन नेहमीच आघाडीवर राहिला आहे.

भारतावर काय परिणाम?

चीनने ही क्षमता दक्षिण चीन समुद्रात विकसित केली असून हे सागरी क्षेत्र भारतापासून लांब असले, तरी तेथून येणार्‍या भारताच्या व्यापारी जहाजांची माहिती चीनला चोरता येणार आहे. फिलीपाईन्स, तैवान, जपानच्या बाजूला भारताच्या बोटी गेल्यास त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात चीनला यश मिळेल. दक्षिण पूर्व आशियातील देशांबरोबर युद्धाभ्यास करण्यासाठी भारतीय युद्धनौका जात असतात. त्यांची क्षमता किती आहे, कशी आहे, ती किती वेगाने जातात, त्यांची फायरिंगची क्षमता कशी आहे, याची माहिती चीनला मिळू शकणार आहे. शांतता काळात इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरच्या माध्यमातून जमवलेल्या या माहितीचा चीनकडून वापर केला जाऊ शकतो.

इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर दोन प्रकारचे असते. एक म्हणजे पॅसिव्ह. यामध्ये केवळ लक्ष किंवा देखरेख ठेवून माहिती जमवली जाते, तर अ‍ॅक्टिव्ह स्थितीमध्ये जहाजे, बोटी, विमाने यांमधील संदेशवहन यंत्रणा किंवा संपूर्ण प्रणाली बंद पाडली जाऊ शकते. जहाजाचे रडार खराब करणे, इलेक्ट्रॉनिक अ‍ॅम्ब्युशन बंद पाडणे, विमानांची कम्युनिकेशन सिस्टिम्स बंद पाडणे अशा प्रकारे इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरची यंत्रणा काम करते. चीनच्या या युद्ध पद्धतीकडे बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे आहे. भारतानेसुद्धा अशा प्रकारची क्षमता विकसित करणे, ही काळाची गरज आहे.

– ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि.)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT