वारणावती : पुढारी वृत्तसेवा चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी कायम राहिली आहे. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांत 87 मिलीमीटर पावसाची पुन्हा येथे नोंद झाली आहे. गेल्या 10 दिवसांपासून येथे सलग अतिवृष्टी होत आहे. आज अखेर 1059 मिलीमीटर पावसाची येथे नोंद झाली आहे. धरणात दररोज दहा ते बारा हजार क्युसेक पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरणातील पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे.
धरणात 12 हजार 787 क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक मोठी असल्यामुळे 24 तासांत किमान एक ते दीड टीएमसी पाण्याची वाढ धरणात होत आहे. सध्या धरण 65.61 टक्के भरले आहे. उपयुक्त पाणीसाठा 15.69 टीएमसी असून त्याची टक्केवारी 57.00 आहे. पाणीपातळी सध्या 613.50 मीटर इतकी आहे. दरम्यान, वीजनिर्मिती केंद्रातून 875 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. मुसळधार पाऊस आणि वीजनिर्मिती केंद्रातून येणारा पाण्याचा प्रवाह यामुळे वारणा नदीची पाणीपातळी वाढली आहे.