रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचे उजवे हात म्हणून ओळखले जाणारे अलेक्झांडर दुगिन यांच्या मुलीची नुकतीच हत्या झाली. युक्रेन-रशिया युद्धाला सहा महिने पूर्ण झाले. युक्रेनवर हल्ल्याचा निर्णय रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी एकट्याने घेतला असे नाही. यामागे आणखी एक व्यक्ती आहे ती म्हणजे अलेक्झांडर दुगिन. 60 वर्षीय दुगिन हे पुतीन यांचे 'ब्रेन' मानले जातात. पुतीन यांचे उजवे हात म्हणून ओळखले जाणारे दुगिन यांच्या मुलीची नुकतीच हत्या झाली. हल्लेखोरांनी मोटारीत स्फोट घडवून आणला आणि दुगिन यांची कन्या दारिया हिचा जागीच मृत्यू झाला. या हल्ल्याचे खरे टार्गेट अॅलेक्झांडर दुगिन होते; परंतु चुकीने त्यांची कन्या बॉम्ब पेरलेल्या मोटारीत बसली.
अलेक्झांडर दुगिन कोण आहेत, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. त्यांचे पूर्ण नाव अलेक्सांद्र गेलीविच दुगिन आहे. त्यांना रशियाचे राजनैतिक सल्लागार, विश्लेषक, रणनीतीकार म्हणून ओळखले जाते. पश्चिम देशाने केलेल्या आरोपानुसार दुगिन हे फॅसिस्ट विचारसरणीचे आहेत. दुगिन यांना रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे प्रतीकात्मक रूप म्हणून मानले जाते. दुगिन यांनीच युक्रेनचा उल्लेख हा रशिया अंकीत राज्याचे प्रशासकीय क्षेत्र म्हणून उल्लेख केला होता. त्यांनी युक्रेनला नोवोरोसिया (नवीन रशिया) म्हणून नाव दिले. दुगिन यांनी अटलांटिसिज्मला आव्हान देण्यासाठी डब्लिन ते व्लादिव्होस्टोकपर्यंत रशियाच्या साम्राज्याची संकल्पना मांडली होती. अटलांटिज्म ही संकल्पना अमेरिकेच्या नेतृत्वाखालील नाटोच्या देशांसदर्भात वापरली जाते. त्यांनी युक्रेनच्या युद्धाची व्यूहरचना केली होती, असेही म्हटले जाते.
दुगिन यांचा जन्म मास्कोत सोव्हियत सैन्यात गुप्तचर असलेले कर्नल जनरल गेली अलेक्झेंड्रोव्हिच दुगिन यांच्या घरी झाला. त्यांची आई गॅलिना वैद्यकीय अधिकारी होत्या. दुगिन तीन वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांनी कुटुंब सोडले; परंतु कुटुंबाची परवड होणार नाही, याची त्यांनी खबरदारी घेतली. 1983 मध्ये अलेक्झांडर दुगिन यांच्या वर्तनामुळे त्यांच्या वडिलांची सीमा शुल्क विभागात बदली केली होती. 1979 मध्ये अलेक्झांडर यांनी मास्को एव्हिएशन इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश केला; परंतु त्यांची हकालपट्टी करण्यात आली. त्यानंंतर त्यांनी स्ट्रीट क्लीनर म्हणून काम सुरू केले. लेनीन ग्रंथालयात प्रवेश मिळवण्यासाठी आणि अभ्यास सुरू ठेवण्यासाठी वाचकाचे बनावट ओळखपत्र तयार केले. अर्थात, या बदल्यात त्यांनी रशियाची गुप्तचर यंत्रणा केजीबीसाठी काम सुरू केल्याचा दावा केला जातो.
दुगिन यांची पहिली पत्नी रशियाच्या कार्यकर्त्या एव्हगेनिया डेब्रियनस्काया होती. त्यांना एक मुलगा असून त्याचे नाव आर्थर आहे. 1980 च्या दशकात दुगिन हे असंतुष्ट आणि कम्युनिस्टविरोधी होते. रशियातील साम्यवादी आराखडा ढासळण्यापूर्वी दुगिन यांनी एक पत्रकार म्हणून काम केले. 1988 मध्ये ते आणि त्यांचे मित्र गेदर हे जेमल अल्ट्रानेशलिस्ट समूह पमायत (मेमोरी) मध्ये सामील झाले. त्यानंतर रशियात फॅसिस्टवादी विचाराचा जन्म झाला. त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि गेनेडी जुगानोव्हच्या नेतृत्वाखालील रशियन संघाच्या कम्युनिस्ट पक्षाला राजकीय कार्यक्रम तयार करण्यात मदत केली. याच वर्षी 3 मार्च रोजी अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने दुगिन यांच्या वाढत्या वर्चस्वामुळे जियोपालिटिका नावाच्या नियतकालिकेवर निर्बंध घातले.
याच अमेरिकी विभागाने दुगिन यांच्या मुलीवर बंधने घातली. ही कन्या युनायटेड वर्ल्ड इंटरनॅशनल नावाचे संकेतस्थळ चालवत होती आणि ती मुख्य संपादक म्हणून काम करत होती. अमेरिकेच्या ट्रेझरी विभागानुसार दरियाच्या संकेतस्थळाने यवगेनी प्रिगोझिनची मालकी असलेला लाकता प्रकल्प कार्यान्वित केला. याच प्रिगोझीनला 2016 च्या अमेरिकेतील निवडणुकीत रशियाच्या हस्तक्षेपाला जबाबदार धरले होते. अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने दुगिन यांचे नाव युक्रेन संकटाला जबाबदार असणार्या रशियन लोकांच्या यादीत टाकले. त्याचबरोबर दुगिन यांच्या युरेशियन यूथ युनियनला देखील टार्गेट करण्यात आले.
दुगिन यांना रशियाच्या राजकारणात कोणतेही अधिकृत पद नाही. तरीही अलेक्झांडर दुगिन यांना रशियाच्या राजकारणाचा प्रतीकात्मक चेहरा असे म्हटले जाते. अलेक्झांडर यांना पुतीन यांचे डोके किंवा 'पुतीन यांचे रासपुतीन' असेही म्हटले जाते. 60 वर्षीय दुगिन यांनी 30 पेक्षा अधिक पुस्तके लिहिली आहेत. त्यात 'फाऊंडेशन ऑफ जिओपॉलिटिक्स, द फोर्थ पॉलिथिटकल थेअरी' याचा समावेश आहे. ते 2009 ते 2014 या काळात मॉस्को स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये आंतरराष्ट्रीय संबंधाच्या समाजशास्त्र विभागाचे प्रमुख होते. 2014 मध्ये युक्रेन संघर्षाबाबत त्यांनी अनेक मतमतांतरे मांडली. याचा संपूर्ण रशियात विरोध झाला. त्यामुळे त्यांना विद्यापीठातून निलंबित करण्यात आले होते.