नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींमध्ये स्थान मिळविलेले उद्योगपती गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांना गेल्या 24 तासांत मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. परिणामी, त्यांच्या संपत्तीत घट नोंदवली आहे.
अंबानींना 1.82 अब्ज डॉलरचा तोटा
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना 1.82 अब्ज डॉलरचे नुकसान सोसावे लागले आहे. यामुळे त्यांची संपत्ती घटून 99.3 अब्ज डॉलर इतकी झाली आहे. गेल्या दोन दिवसांत रिलायन्सच्या शेअरने मोठी उसळी घेतली होती. त्या बळावर मुकेश अंबानी पुन्हा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले. मात्र, त्यांच्या संपत्तीत पुन्हा घट झाली आहे. सध्या ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत आठव्या स्थानावर आहेत.
श्रीमंतांच्या यादीत अदानी नववे
जगातील पहिल्या 10 सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत समाविष्ट झालेले भारतातील दुसरे अब्जाधीश गौतम अदानी यांनी या वर्षाच्या सुरुवातीपासून जगभरातील अनेक श्रीमंतांना पाठीमागे टाकत मोठी कमाई केली. मात्र, गेल्या काही काळात त्यांची संपत्ती सातत्याने घटत आहे. एप्रिलमध्ये जगातील टॉप 10 श्रीमंतांच्या यादीत पाचव्या स्थानावर असलेले अदानी आता 9 व्या स्थानावर आहेत.