पणजी : पुढारी वृत्तसेवा; पणजी- मडगाव मार्गावरील जुवारी पुलावरून खाली जुवारी नदीत कोसळलेल्या डस्टर कारचा शोध लावण्यात अग्निशामक दल व नौदलाला यश आले आहे. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. कार नदीत कोसळल्याची घटना काल दिनांक २७ रोजीच्या मध्यरात्री दीडच्या सुमारास घडली होती.
आज दुपारी एकच्या सुमारास तब्बल बारा तासानंतर सदर कार व कारमधील चार मृतदेह नौदलाच्या क्रेनद्वारे पाण्याबाहेर काढले गेले. या मृतांमध्ये एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींसह अन्य एक अशा चार जणांचा समावेश आहे. तीन पुरुष व महिला एक महिला यात असून मृतांची नावे प्राप्त झालीत. त्यानुसार आल्वीन आराजवो, हेन्री आराजवो, प्रिसीला क्रूज व ऑस्टीन फर्नांडिस अशी मृतांची नावे आहेत.
बारा तासांच्या अथक प्रयत्नानंतर कार व त्यातील मृतदेह बाहेर काढण्यात आले. दरम्यान, पुलाच्या मध्यभागी पोचल्यानंतर गाडीवरील ताबा गेल्यानंतर ब्रेक लावण्याच्या प्रयत्नात ही गाडी पुलाचा कठडा तोडून पुलाखाली पडली असावी, असे पोलिसांनी सांगितले. कारसह मृतदेह बाहेर काढल्यानंतर ते फेरीबोटीतून किनाऱ्यावर आणण्यात आले. पोलिसांनी पंचनामा केला व मृतदेह गोवा वैद्यकीय महाविद्यालय बांबोळी पुढील सोपस्कारासाठी पाठवण्यात आले आहेत.
हेही वाचा