मुंबई : आयपीएलमध्ये अनेक खेळाडूंच्या नावावर विविध विक्रमांची नोंद आहे. मात्र, आयपीएलमध्ये जलद शतक ठोकण्यार्या खेळाडूंच्या यादीत एकमेव भारतीय खेळाडूचे नाव आहे. या यादीत ख्रिस गेल अव्वल स्थानी आहे.
गेल हा आपल्या तडाखेबंद खेळामुळे जगभरात प्रसिद्ध आहे. आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक ठोकण्याचा विक्रमही गेलच्या नावावर आहे. आयपीएलच्या सहाव्या हंगामात पुणे वॉरियर्सविरुद्ध सामन्यात गेलने तुफानी खेळी केली होती. या सामन्यात त्याने केवळ 30 चेंडूंत 100 धावा केल्या होत्या. याच सामन्यात त्याने 66 चेंडूंत 175 धावा करण्याचा इतिहास रचला होता. या यादीत असलेला एकमेव भारतीय खेळाडू म्हणजे युसूफ पठाण. त्याने आयपीएलच्या तिसर्या हंगामात मुंबई इंडियन्स विरुद्ध 37 चेंडूंत शतक लगावले होते.
त्यावेळी राजस्थान संघाचा कर्णधार शेन वॉर्नने त्याच्या खेळीचे कौतुक केले होते. तसेच आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक ठोकणार्या खेळाडूंच्या यादीत तो दुसर्या क्रमांकावर आहे. आयपीएलच्या तेराव्या हंगामात ऑस्ट्रेलियाचा खेळाडू डेव्हिड मिलरने किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळताना आरसीबीविरुद्ध 38 चेंडूंत त्याचे शतक पूर्ण केले होते.
तसेच या सामन्यातील अठराव्या षटकात षटकार ठोकून त्याने किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघाला विजय मिळवून दिला होता. ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टिरक्षक फलंदाज अॅडम गिलख्रिस्ट याने आयपीएलच्या पहिल्याच सत्रात डेक्कन चार्जर्सकडून खेळताना मुंबई इंडियन्सविरुद्ध अवघ्या 42 चेंडूंत शतक चोपले होते. तसेच आरसीबीचा धोकादायक फलंदाज एबी डिविलियर्सने 2016 मध्ये गुजरात लायन्सविरुद्ध 43 चेंडूंत शतक झळकावताना डझनभर षटकार खेचले होते. सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज डेव्हिड वार्नर याने कोलकाताविरुद्ध 43 चेंडूंत शतक पूर्ण केले होते. या यादीत तो सहाव्या क्रमांकावर आहे.