लॉकडाऊन काळात भारतातील गेमिंग उद्योग व्यवसायाची उलाढाल 10 हजार 100 कोटींवर जाऊन पोहोचली. 40 हजार लोकांना थेट रोजगार मिळाला. आणखी दोन लाख रोजगार दोन वर्षांत मिळतील.
भारतात दूरसंचार व माहिती-तंत्रज्ञानाचा विकास अभूतपूर्व अशा पद्धतीने झाला आहे. त्यामुळे देशात अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट, गेमिंग अँड कॉमिक (एव्हीजीसी) हे एक उदयोन्मुख क्षेत्र असून, त्यामध्ये भारतीय उद्योजकांना प्रचंड वाव आहे, असे उद्गार दीड वर्षापूर्वी तत्कालीन केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सीआयआय बिग पिक्चर शिखर परिषदेत काढले होते. या क्षेत्रातील भारतीय तज्ज्ञ जगातील आघाडीच्या चित्रपट निर्मात्यांना साह्यभूत ठरत आहेत आणि केंद्र सरकारही आयआयटी मुंबईच्या सहकार्याने एक एक्सलन्स सेंटर स्थापन करत आहे.
तेथे एव्हीजीसीचे अभ्यासक्रम उपलब्ध असतील. ही गोष्ट स्वागतार्ह आहे. हे केंद्र लवकरात लवकर प्रत्यक्षात येईल, असे प्रयत्न सरकारने केले पाहिजेत. भारतात गेमिंग उद्योग प्रचंड वेगाने वाढत आहे. चीननंतर या क्षेत्रात आपले दुसरे स्थान असून, एकूण उलाढाल तेरा हजार कोटी रुपयांची आहे.
आणखी तीन वर्षांत ही उलाढाल साठ हजार कोटी रुपयांवर जाईल, असा अंदाज आहे. एखाद्या छोट्या देशाची जेवढी अर्थव्यवस्था नसेल, तेवढी उलाढाल या गेमिंग उद्योगात होऊ शकते. दररोज गेम्स लाखोंनी डाऊनलोड होत असून त्यामुळे नामवंत कंपन्या या क्षेत्रात उतरल्या आहेत. बड्या कंपन्यांनी त्यांचे मोबाईल आणि लॅपटॉपही खास गेमिंगसाठी तयार केले आहेत. शिवाय गेमिंगसाठी लागणार्या विशेष उपकरणांनाही मागणी असते.
जगातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या चीनने ऑनलाईन गेम खेळण्यावर निर्बंध आणले आहेत. अठरा वर्षांखालील मुलांना सप्ताहातून तीन तास इतकाच वेळ गेम खेळता येईल. कोव्हिडच्या काळात भारतात सर्वजण घरी बसून होते. त्यामुळे 2020-21 या काळात भारतातील गेमिंग व्यवसाय 28 टक्क्यांनी वाढून, त्याची उलाढाल 1.3 अब्ज अमेरिकन डॉलर्सवर (10,100 कोटी) जाऊन पोहोचली, अशी माहिती फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीने (फिक्की) दिली आहे.
टाळेबंदीच्या काळात जनता इतकी निराशाग्रस्त झाली होती की, अनेकांना काय करावे, हे सुचत नव्हते. अशावेळी ऑनलाईन गेम्सने त्यांना आधार दिला. मायक्रोसॉप्टच्या गेमिंगपासूनच्या उत्पन्नात मार्च 2021 अखेरीस संपलेल्या तिमाहीत 50 टक्क्यांची वाढ झाली. त्यांच्या एक्सबॉक्स सिरीज एक्स व एस या गेमिंग मालिकांना चिक्कार प्रतिसाद मिळाला.
भारतात केवळ महानगरांतच हा व्यवसाय फोफावतो आहे, असे नाही, तर टीयर तीनमध्ये मोडणार्या तीस शहरांमध्येदेखील गेमिंगच्या धंद्यात 170 टक्क्यांची वाढ झाली आहे. अनेकजण केवळ करमणूक, वेळ घालवणे आणि लोकांशी कनेक्ट होणे, याकरिता हे खेळ खेळतात. परंतु, बरेचजण नोकर्या नसल्यामुळे पैसे मिळवण्यासाठीही गेमिंगमध्ये बुडालेले असतात. ऑस्ट्रेलिया, फिलिपाईन्स, दक्षिण कोरिया यासारख्या विविध देशांमधील लोकांसमवेत ऑनलाईन गेम्स खेळून पैसे कमावणारे लोक आहेत.
अर्थात, आजही हा काही पूर्णवेळचा जॉब आणि उत्पन्नाचे साधन होऊ शकत नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. सुमारे वीस वर्षांपूर्वी भारतात हा उद्योग मूळ धरायला लागला. कॉलेजांमधून त्याच्या स्पर्धा होऊ लागल्या. सॅमसंग, वनप्लस आणि शिओमी यासारख्या टेक कंपन्यांनी या उद्योगाला चालना दिली. त्या गेमर्सना पुरस्कृत करू लागल्या. आयआयटी खरगपूरतर्फे गेमिंगच्या देशव्यापी स्पर्धा होऊ लागल्या आणि अडीच-अडीच लाखांची बक्षिसे देण्यात येऊ लागली.
अलीकडच्या काळात 9.33 अब्ज इतक्या प्रचंड प्रमाणात गेम्सचे डाऊनलोड होत असून, या उद्योगात 40 हजार लोकांना थेट रोजगार मिळाला आहे. येत्या दोन वर्षांत या उद्योगात दोन लाखांना रोजगार मिळेल, अशी आशा आहे. उज्ज्वल भवितव्य असलेल्या या उद्योगाकडे वाढत्या प्रमाणात तरुण-तरुणींचे लक्ष जाईल, असे दिसते. अर्थात, या उद्योगाला जुगाराचेही एक अंग असून, त्याचे व्यसन जडता कामा नये. रोजगार देणारे क्षेत्र म्हणूनच त्याकडे आपण पाहिलेे पाहिजे.
– अर्थशास्त्री