गुरुकृपेविण नाही आत्मज्ञान
वाउगा तो शीण साधनांचा॥
सहज-साधन गुरुकृपा जाण
जिवाचे कल्याण तेणे होय॥
– स्वामी स्वरूपानंद
प्रत्येक मनुष्याला आपल्या जीवनात अत्यंतिक सुख प्राप्त व्हावे, आपण पूर्ण समाधानी व्हावे, ही प्रामाणिक इच्छा असते; मात्र ज्या सुखाचा शोध तो घेत असतो ते प्राप्त करण्याचा उचित मार्ग त्याला सापडलेला नसतो किंवा ज्या सुख-समाधानासाठी तो अविरत परिश्रम करीत असतो, ते सुख-समाधान म्हणजे नेमके काय? ते कोणापासून मिळेल, याचे उत्तर त्याने शोधलेले नसते. तो भांबावतो, अगतिक होतो, त्याची अस्वस्थता संपत नाही. तो पुन्हा पुन्हा आपल्याला हव्या असणार्या कल्पनेतल्या सुख-समाधानाच्या प्राप्तीसाठी नव्या नव्या युक्त्या शोधत राहतो. ही फजिती कशी संपेल? कोणाच्या मार्गदर्शनाने जीवनाची वाटचाल करावी? काय प्राप्ती झाली असता जीवनाची अपूर्णता संपून जाईल, याचा विचार भारतीय संस्कृतीत, तत्त्वज्ञानामध्ये अनेक अंगांनी केला गेला आहे. पुनःपुन्हा निरीक्षण, परीक्षण करून, अनुभव घेऊन काही सिद्धांत प्रस्थापित केले आहेत. ते सिद्धांत आजही शंभर टक्के खरे आहेत.
संत ज्ञानदेवांपासून स्वामी स्वरूपानंदांपर्यंत सर्व संतांनी अत्यंतिक समाधानाच्या प्राप्तीसाठी सद्गुरू भेटले पाहिजेत. त्यांनी पूर्ण कृपा केली पाहिजे व साधकाने सद्गुरुपासना केली पाहिजे, तरच त्याची भवभ्रांती संपून जाऊन त्याला अखंड जागृती येईल व आत्मज्ञान होऊन (झाल्यावरच) तो कृतार्थ होईल, असे सांगितले आहे. 'सद्गुरुपासना' ही प्राचीन वेदउपनिषद काळापासून चालत आलेली आत्मज्ञान प्राप्तीची एकमेव गुरुकिल्ली आहे.
ज्ञानदेव म्हणतात, 'जाणतेनी गुरु भजिजे॥ गुरुसत्तेला जाणा, मग उपासना करा किंवा गुरुसत्तेला सतत जाणणे, शोधणे हीच सर्व सुखप्राप्तीची साधना-उपासना आहे. संत नामदेवांचा एक अभंग आहे, आयुष्यभर वेदाध्ययन करीत राहाल, तर वैदिक व्हाल. गायन करीत बसाल, तर गुणिजन व्हाल, पुराणे सांगत राहाल, तर पुराणिक बनाल, उत्तम यज्ञ-यागादी कामे करीत राहाल, तर कर्मठ व्हाल. अशा प्रयत्नांनी तो जनार्दन भेटेलच असे नाही. तो भेटावा अशी इच्छा असेल, तर परमार्थातले वर्म हाती आले पाहिजे. 'गुरुविण वर्म हाता नये' हेच परमार्थातील वर्म आहे. संत नामदेव विसोबा खेचरांना शरण गेले, तेव्हाच त्यांना कृपादृष्टीचा लाभ झाला आणि निजसुखाची प्राप्ती झाली. आत्मज्ञानाने सर्वसुख लाभ होतो व आत्मज्ञान फक्त गुरुकृपेनेच होते, हे परमार्थीचे वर्म साधकाला साधनेआधी उमजले पाहिजे.
अज्ञानग्रस्त जीव केवळ जगण्यासाठीच धडपडत असतो. देहसुख म्हणजेच इंद्रियांद्वारा मिळवावयाचे सुख. त्यातच आनंद आहे एवढेच त्याला कळत असते. खरे तर, विषयसुखे त्याची वंचना करीत असतात. जेवढी वंचना अधिक तेवढा हव्यास अधिक अशी त्याची फजिती चाललेली असते. वासना, इच्छा, प्रलोभने सतत वाढत असतात. अशा माणसाला तृप्ती, शांती, समाधान कधीही प्राप्त होत नाही. 'मी' म्हणजे देह, मला जे जे हवे ते ते मी मिळवीनच, हा त्याचा अहंकार सतत वाढत जातो. 'सुख पाहता जवापाडे दुःख पर्वताएवढे॥' हे ध्यानात आले, तरी त्याची जड मूढता सरत नाही.
सद्गुरूंचे खरे शिवरूप ओळखून त्या निर्गुण-निराकार तत्त्वाच्या सगुण साकार तत्त्वावर निष्ठा ठेवता आली पाहिजे. अनन्य शरणागती पत्करून त्या तत्त्वाशी सामरस्य साधण्यासाठी केली जाते ती साधना-उपासना होय. सद्गुरू आनंदरूप, सुखरूप, संतोषरूप असतात. शिष्य आपल्या सेवाभावाने त्यांना अधिकाधिक प्रसन्न करीत असतो. सदगुरूंची प्रसन्नता कृपारूपाने त्याच्यावर वर्षाव करीत असते.
गुरूकृपा झाली की, विराटाच्या शोधाला प्रारंभ होतो. ती आनंदयात्रा असते. पूर्ण स्वातंत्र्यलाभ करून देणारी मुक्तियात्रा असते. गुरुदीक्षा-गुरुकृपा-गुरुदीक्षा ही अलौकिक घटना असते. सद्गुरू साधकाचे परमात्म्याशी नाते जोडून देतात. ओळख करून देतात. त्या घटनेने क्रांती घडते. घडावी अशी अपेक्षा असते.
– प्रा. म. अ. कुलकर्णी