Latest

‘गुगल’वर वाढला ‘ट्विटर’ बंद करण्याबाबतचा सर्च

Arun Patil

वॉशिंग्टन : जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन असलेल्या 'गुगल'वर सध्या 'ट्विटर'शी संबंधित सर्च वाढला आहे. हा सर्च आहे 'ट्विटर अकाऊंट कसे बंद करायचे?' याचा! टेस्ला कंपनीचे मालक एलन मस्क यांनी ट्विटरवर मालकी मिळवल्यानंतर लगेचच ट्विटरच्या उच्चपदस्थ अधिकार्‍यांना आणि संचालक मंडळाला काढून टाकले. इतकेच नाही तर आता जगभरातील 50 टक्के कर्मचार्‍यांनाही कामावरून काढून टाकण्यात येणार आहे. तसेच यापुढे ट्विटरवरील ब्लू टिकसाठी वापरकर्त्यांना 8 डॉलर्स म्हणजेच जवळपास 650 रुपये भरावे लागणार आहेत. अशा परिस्थितीत अनेक ट्विटर यूजर्सनी आपले अकाऊंट बंद केले आहे. तर काहीजण ते लवकरच बंद करणार आहेत.

ट्विटरमधून अनेक कर्मचार्‍यांची हकालपट्टी होण्याच्या पार्श्वभूमीवर येथील कर्मचार्‍यांवरील कामाचा ताण अनेकपटींनी वाढलेला पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून लोक गुगलवर 'ट्विटर अकाऊंट कसे डिलिट करावे?' याबाबत सर्च करत आहेत.जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती आणि टेस्ला कंपनीचे मालक एलन मस्क यांनी 44 डॉलर्समध्ये ट्विटर कंपनी विकत घेतली.

एप्रिलमध्ये यासंबंधी घोषणा करण्यात आली होती. यानंतर 27 ऑक्टोबरला अधिकृतरीत्या ट्विटरचा ताबा मिळवताच मस्क यांनी सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह व्यवस्थापनातील काही वरिष्ठ अधिकार्‍यांना बाहेरचा रस्ता दाखवला. यामध्ये कायदा विभागाचे प्रमुख विजया गड्डे, मुख्य वित्तीय अधिकारी नेड सेगल यांचाही समावेश आहे.

त्यानंतर आता जवळपास साडेतीन हजार कर्मचार्‍यांच्या नोकरीवरही गदा येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.काही वृत्तसंस्थांनी दिलेल्या अहवालानुसार, एलन मस्क यांनी ट्विटरवर ताबा मिळवल्यानंतर गुगलवर 'ट्विटर अकाऊंट कसे डिलिट करावे?' याच्या सर्चमध्ये 500 टक्क्यांनी वाढ झाली आहे. व्हीपीएन ओव्हरव्ह्यूने खुलासा केला आहे की हे आकडे 24 ते 31 ऑक्टोबर या दिवसांमधील आहेत. इतकेच नाही तर गुगल ट्रेंडस्च्या आकडेवारीनुसार या कालावधीत 'ट्विटर बॉयकॉट'च्या सर्चमध्ये 4,800 टक्क्यांनी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT