गहू पिकाची लागवड करताना बियाण्यापासून खते, पाणी व कीड व्यवस्थापन करणेही महत्त्वाचे ठरते.
खते व्यवस्थापन : बागायती गव्हाच्या पिकासाठी हेक्टरी 10 टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत द्यावे. बागायती गव्हाच्या वेळेवर पेरणीसाठी दर हेक्टरी 120 किलो नत्र, 60 किलो स्फुरद व 40 किलो पालाश द्यावे. निम्मे नत्र व संपूर्ण स्फुरद आणि पालाश पेरणीच्यावेळी व उरलेले निम्मे नत्र पेरणीनंतर 3 आठवड्यांनी खुरपणी झाल्यावर पहिल्या पाण्याच्या वेळी द्यावे. उशिरा केलेल्या पेरणीसाठी हे प्रमाण हेक्टरी 80 किलो नत्र, 40 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश इतके द्यावे. निम्मे नत्र व स्फुरद आणि पालाश पेरणीच्या वेळी व उरलेले निम्मे नत्र पेरणीनंतर 3 आठवड्यांनी द्यावे.
जिरायत गव्हासाठी पेरणीच्या वेळेस हेक्टरी 40 किलो नत्र आणि 20 किलो स्फुरद पेरून द्यावे. पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना 2 टक्के युरियाची फवारणी करावी. पश्चिम महाराष्ट्रातील मैदानी खोल काळ्या जमिनीवर गव्हाच्या उत्पादनाकरिता पेरणीपूर्वी प्रति हेक्टर 1 टन शेणखत देऊन गव्हाची पेरणी जोड ओळीत (15 ते 30 सें.मी.) करून प्रति हेक्टर 70:35 नत्र-स्फुरद किलो, युरिया-डीओपी ब्रिकेटमार्फत (2.7 ग्रॅम वजनाची ब्रिकेट) 15 सें.मी. अंतराच्या जोडओळीत प्रत्येकी 30 सें.मी. अंतरावर 10 सें.मी. खोल खोचावी.
पश्चिम महाराष्ट्राच्या मैदानी प्रदेशातील लोहाची कमतरता असणार्या जमिनीमध्ये गव्हाचे अधिक उत्पादन, आर्थिक फायदा व जमिनीतील लोहाची पातळी राखण्यासाठी शिफारशीत अन्नद्रव्यांसोबत (120:60:40 नत्र ः स्फुरद ः पालाश किलो प्रति हेक्टर अधिक 10 टन शेणखत प्रति हेक्टरी, मुरविलेले हिराकस 20 किलो प्रति हेक्टरी (100 किलो शेणखतात 15 दिवस मुरवून) जमिनीतून द्यावे. महाराष्ट्रातील बागायती क्षेत्रात गव्हाचे अधिक उत्पादन मिळविण्यासाठी शिफारशीत अन्नद्रव्यांची मात्रा देऊन 2 टक्के 19:19:19 नत्र : स्फुरद : पालाश या विद्राव्य खताची किंवा 2 टक्के डी.ए.पी. या खतांची पेरणीनंतर 55 आणि 70 दिवसांनंतर फवारणी करावी.
वेळेवर पेरणीसाठी 120:60:40, तसेच उशिरा पेरणीसाठी 90:60:40 नत्र ः स्फुरद ः पालाश कि./हे. द्यावे. विद्राव्य खत फवारणीसाठी 2 टक्के द्रावणाकरिता 200 ग्रॅम 19:19:19 किंवा डी.ए.पी.खते 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. पश्चिम महाराष्ट्रातील गव्हाचे उत्पादन लक्ष 45 चे 50 क्विंटल प्रतिहेक्टर साध्य करण्यासाठी जमिनीची सुपिकता कायम ठेवण्यासाठी व संतुलित अन्नद्रव्यांचा पुरवठा करण्यासाठी खालील शेणखतासोबत अथवा शेणखत विरहित उत्पादन उद्दिष्ट समीकरणांचा वापर करावा.
पाणी व्यवस्थापन : गव्हाची पेरणी शेत ओलवून वापसा आल्यावर करावी. पेरणीनंतर साधारणपणे दर 18 ते 21 दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. मध्यम ते भारी जमिनीत पीक तयार होण्यासाठी 4 ते 5 वेळा पाणी द्यावे लागते. पीक वाढीच्या ज्या महत्त्वाच्या अवस्था आहेत त्यावेळी पाणी देणे फायदेशीर ठरते.
* मुकुटमुळे फुटण्याची अवस्था : पेरणीनंतर 18 ते 21 दिवस
* कांडी धरण्याची अवस्था : पेरणीनंतर 40 ते 45 दिवस
* फुलोरा आणि चीक भरण्याची अवस्था : पेरणीनंतर 60 ते 65 दिवस.
* दाणे भरण्याची अवस्था : पेरणीनंतर 80 ते 85 दिवस पाणीपुरवठा अपुरा असल्यास काही ठराविक वेळेलाच पाणी देणे शक्य असेल तर पाण्याच्या पाळ्या पुढीलप्रमाणे द्याव्यात.
* गहू पिकास एकच पाणी देणे शक्य असल्यास ते 40 ते 42 दिवसांनी द्यावे.
* गहू पिकास पेरणीनंतर दोन पाणी देणे शक्य असल्यास, पहिले पाणी 20 ते 22, दुसरे पाणी 40 ते 42 व तिसरे पाणी 60 ते 65 दिवसांनी द्यावे.
अपुरा पाणीपुरवठा परिस्थितीत एक किंवा दोन पाणी देणे शक्य आहे त्या क्षेत्रात पंचवटी (एनआयडीडब्ल्यू-15) किंवा नेत्रावती (एनआयए डब्ल्यू-1415) गव्हाच्या वाणांचा वापर करावा. गव्हास एकच पाणी दिले तर पुरेशा पाण्यापासून आलेल्या उत्पादनाच्या तुलनेत 41 टक्के घट येते व दोन पाणी दिले तर उत्पादनात 20 टक्के घट येते.
पीक संरक्षण
तांबेरा : विद्यापीठाने विकसित केलेल्या तांबेरा प्रतिबंधक वाणांचीच पेरणीसाठी निवड करावी. तांबेरा प्रतिबंधक उपाय म्हणून गव्हाची पेरणी वेळेवर करावी. पिकास पाणी जरूरी पुरतेच व बेताचे द्यावे. तांबेरा दिसू लागताच मॅन्कोझेब हे बुरशीनाशके 1.5 किलो 500 लिटर पाण्यातून फवारावे. जरूरी भासल्यास दुसरी फवारणी पहिल्या फवारणीनंतर 15 दिवसांनी करावी.
करपा : गव्हावर करपा रोगाचा देखील प्रादुर्भाव दिसून येतो. करपा रोगाचे नियंत्रण करण्यासाठी रोगाचे लक्षणे दिसू लागताच मॅन्कोझेब (0.2 टक्के) या बुरशीनाशकाच्या मिश्रणाच्या दोन फवारण्या 15 दिवसांच्या अंतराने कराव्यात.
काजळी किंवा काणी : बीज प्रक्रिया कार्बेनन्डाझिम 1 ग्रॅम किंवा थायरम 3 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात करावी. उभ्या पिकातल्या रोगट ओंब्या काळजीपूर्वक काढून नष्ट कराव्यात. काणीग्रस्त रोगट झाडे दिसताच ती नष्ट करावी.
मावा व तुडतुडे : थायामिथोक्झाम 1 ग्रॅम किंवा अॅसिटामिप्रीड 5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून 10-15 दिवसांच्या अंतराने दोन वेळा फवारावे. जैविक उपायांमध्ये व्हर्टिसिलियम लेकॅनी किंवा मेटारायझियम प्रत्येकी 50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून 10-15 दिवसांच्या अंतराने दोन वेळा फवारावे.
काढणी व उत्पादन : बागायती गव्हाची वेळेवर लागवड केल्यास एकरी 18-20 क्विंटल, बागायती गव्हाची उशिरा लागवड केल्यास एकरी 14-16 क्विंटल व जिरायत लागवड केल्यास एकरी 4.8-6 क्विंटल उत्पादन मिळते.
कापणी व मळणी : पीक तयार होताच वेळेवर कापणी करावी. कापणीस उशीर झाल्यास एन आय-5439 व त्र्यंबक (एनआयएडब्ल्यू301) या गव्हाच्या वाणाचे दाणे शेतात झडू शकतात. म्हणून पीक पक्व होण्याच्या 2-3 दिवस. अगोदर कापणी करावी. कापणीच्यावेळी दाण्यातील ओलाव्याचे प्रमाण 15 टक्के असावे. गव्हाची मळणी, यंत्राच्या सहाय्याने करावी किंवा गव्हाची कापण व मळणी कंबाईन हार्वेस्टर मशीनने करावी. (उत्तरार्ध)