आई होण्याची इच्छा प्रत्येकाला असते; मात्र आईपण येण्यापूर्वीचे गर्भारपण योग्य आणि निरोगी असावे. त्यात कोणतीही वैद्यकीय समस्या उद्भवू नये, यासाठी काही काळजी घेणे आवश्यक असते.
प्रत्येक बाईच्या आयुष्यात आई होण्याची ही एक आनंदाची पण तितकीच महत्त्वाची आणि गुंतागुंतीची घटना असते. निष्काळजीपणा केल्यास आई आणि बाळ दोघांच्या जीवाला धोका होऊ शकतो. सर्वप्रथम स्त्रीने वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. गर्भधारणा होऊ देण्याचा निर्णय घेण्यापूर्वी काही चाचण्या करून घ्यायला पाहिजेत. त्यामुळे आई किंवा बाळ या दोघांनाही आरोग्याची कोणतीही समस्या भेडसावणार नाही.
मुख्य चाचण्या : रुबेला आईजीजी, काांजिण्या-चिकनपॉक्स इम्युनिटी, एचआयव्ही, हेपेटायटिस बी इम्युनिटी, टीएसएच अर्थात थायरॉईड टेस्ट, एसटीडी (क्लॅमाइडिया सिफलिस), हिमोग्लोबीन टेस्ट, थॅलेसिमिया.
गर्भधारणा होण्यापूर्वी या चाचण्या केल्यास आपण पूर्णपणे तंदुरुस्त आहोत की नाही हे समजते. स्त्रीला काही समस्या असल्यास त्याचे निदान होऊन त्यावर वेळीच उपचार करता येतात आणि आजारापासून मुक्त होता येते. त्यामुळे बाळाला त्याचा त्रास होण्याची शक्यता कमी होते. त्यामुळे या सर्व चाचण्या फक्त स्त्रीच्या आरोग्यासाठी नव्हे, तर बाळाच्या आरोग्याच्या द़ृष्टीने महत्त्वाच्या, गरजेच्या आहेत. गर्भधारणेसंदर्भात कोणत्याही समस्या असल्यास या चाचण्यांमधून त्याचा खुलासा होऊ शकेल. त्यामुळे सावधानता बाळगता येईल.
लक्षात ठेवा : फोलिक अॅसिडच्या गोळ्या गर्भधारणेपूर्वी तीन – चार महिन्यांपासून घ्यायला सुरुवात करावी. गर्भाच्या वाढीच्या द़ृष्टीने ते खूप आवश्यक असते. समजा दुसर्यांदा गर्भवती राहणार असाल, तरीही डॉक्टरला सांगून चाचण्या अवश्य करून घ्या. पहिल्या गर्भारपणाच्या तुलनेत शरीरात काही बदल झालेले असू शकतात. त्याशिवाय पहिल्या गर्भारपणाच्या काळात प्रीमॅच्युअर प्रसूती किंवा बाळामध्ये काही दोष असेल किंवा आधी गर्भपात झालेला असल्यास चाचण्या करून घ्या. जर तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, अस्थमा, नैराश्य किंवा थायरॉईडसारखे त्रास असतील, तर त्याची तपासणी करून घ्यावी. त्याच्या अहवालानुसार डॉक्टरी सल्ल्याने औषधे घ्यावीत.
गर्भधारणेपूर्वी आपल्या आहारावर लक्ष द्यावे. काही गोष्टींचे पालन करावे लागते. धूम्रपान किंवा अल्कोहोलचे सेवन करत असाल, तर गर्भधारणेपूर्वी या दोन्ही गोष्टी बंद करणे चांगले. पोषक आहार घ्यावा. वजन जास्त असल्यास आहारातील सिम्पल कार्ब्स म्हणजे बटाटा, केळे, दही, मैदा, साखर, स्वीटनर, पांढरा तांदूळ, व्हाईट ब्रेड, सोडा किंवा सॉफ्ट ड्रिंक्स बंद करावेत. त्याऐवजी कॉम्प्लेक्स कार्ब्स म्हणजे पोळी, मल्टिग्रेन टोस्ट इत्यादींचा समावेश आहारात करावा. प्रथिनयुक्त पदार्थांचे योग्य सेवन करावे. त्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होईल आणि गर्भधारणा होण्यासही सोपे पडेल व होणारे बाळही आरोग्यपूर्ण असेल.
– डॉ. प्राजक्ता पाटील