ठाणे ; पुढारी वृत्तसेवा : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाला लवकरच परवानगी देण्यात येईल, अशी ग्वाही ज्योतिरादित्य शिंदे यांनी केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांना दिला.
राणे यांनी शिंदे यांची मंगळवारी त्यांच्या दालनात भेट घेतली. यावेळी केंद्रीय हवाई मंत्रालयाची तातडीने परवानगी मिळावी, अशी विनंती केली. यावेळी विमानतळाचे उद्घाटन 1 महिन्यात करण्याचा निर्णय घेण्यात आला.
केंद्रीय मंत्रालयात अडलेला प्रश्न मार्गी लावण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी हवाई उड्डाण खात्याचे मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची राणे यांनी त्यांच्या दालनात भेट घेतली. या विमानतळाचे काम पूर्ण झाले असूनही एक वर्ष हा विमानतळ रखडला आहे.
त्याची परवानगी तातडीने मिळावी, तसेच आपण उद्घाटनाला सिंधुदुर्गात यावे, असे निमंत्रण राणे यांनी सिंधिया यांना दिले. यापूर्वी या विमानतळाचे उद्घाटन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते ठरले होते. मात्र तांत्रिक अडचणीमुळे ते झाले नव्हते.
निमंत्रण पत्रिकेत राणे यांचेही नाव होते. मात्र, राणे यांनी आपण दोघांनी उद्घाटन करावे, असे सांगत पुन्हा चिमटा काढला आहे. त्यामुळे आता उद्घाटन कोण करणार आणि ठाकरे उपस्थित राहणार का याकडे लक्ष लागले आहे.
नारायण राणे राज्याचे उद्योगमंत्री असताना एमआयडीसी मार्फत हे विमानतळ उभारण्याचे काम मंजूर करण्यात आले होते. 2014 मध्ये युतीचे सरकार आले, त्यामुळे त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेले नारायण राणे विरोधी पक्षात गेले.
मात्र, आता राणे भाजपमध्ये आले आहे आणि केंद्रीय मंत्रिमंडळातही आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग विमानतळाचे ड्रिमस्वप्न पूर्ण करण्यासाठी कंबर कसली आहे. या विमानतळाचा शुभारंभ गणेशोत्सव काळात व्हावा यासाठी राणेंचे प्रयत्न आहेत. यासाठीच त्यांनी ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेतली आहे.
गणेशोत्सवाला आता एक महिना शिल्लक राहिला आहे. त्यामुळे परवानग्या तातडीने मिळणे आवश्यक आहे. म्हणून ही भेट झाल्याचे समजते. एक महिन्यात या विमानतळाचे उदघाटन करण्याचे या दोन्ही मंत्र्यांच्या बैठकीत निश्चित करण्यात आले.
चिपी विमानतळाची पायाभरणी मीच केली होती आणि या विमानतळाचे उद्घाटनही मीच करणार, असे नारायण राणे यांनी केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेतल्यानंतर सांगितले आहे.
एमआयडीसीकडून हा विमानतळ बांधला जात असून उद्योग खाते सुभाष देसाई यांच्याकडे आहे. त्यामुळे देसाई यांनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होईल, असे सांगितले होते. मात्र, राणे यांनी उद्घाटन आपणच करणार, असे सांगितल्याने भाजपविरुद्ध शिवसेना असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत.