शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते मा.आ.भाई गणपतराव देशमुख यांचा पार्थिव देह अंत्यदर्शनासाठी सांगोला शेतकरी सह. सूतगिरणी येथे दुपारी ठेवण्यात आला. यावेळी अंत्यदर्शनासाठी राजकीय लोकप्रतिनिधी सह सर्वसामान्य कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेकापचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे शुक्रवारी (दि. ३०) रात्री साडे साडेनऊ वाजण्याच्या सुमारास निधन झाले. सोलापुरातील खासगी रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मृत्यूसमयी ते ९४ वर्षाचे होते.
माजी आमदार भाई गणपतराव देशमुख गणपतराव देशमुख हे विधानसभेवर एकाच मतदारसंघातून सर्वाधिक वेळा निवडून आले होते. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून ११ वेळा ते निवडून आले होते.
२००९च्या निवडणुकीत विजय मिळवून, करुणानिधी यांच्या पाठोपाठ दहाव्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकणारे देशमुख हे देशातले दुसरे आमदार ठरले होते. अत्यंत साधी राहणी असलेल्या गणपतरावांनी तब्बल ५४ वर्षे सांगोल्याचे प्रतिनिधित्व केले होते.
गणपतराव देशमुख यांनी अनेक वर्षे शेकापचे नेतृत्व केलं. पुलोदच्या सरकारमध्ये ते मंत्रीही होते.
शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास त्यांचे पार्थिव सोलापूरहून सांगोल्याला आणण्यात येणार आहे. त्यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी दोन तास अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. यानंतर त्यांच्या निवासस्थानापासून त्यांची अंत्ययात्रा निघून सांगोला सूत मिलमधील मैदानात जाईल. अखेर त्यांच्यावर सूत मिलमधील मैदानात अंत्यसंस्कार करण्यात येईल, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.
भाई गणपतराव देशमुख यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघात 1962 ते 2014 या कालावधीत 13 वेळा निवडणूक लढवली व 11 वेळा ते निवडणुकीत निवडून आले 1962 व 1967 च्या निवडणुकीत ते विजयी झाले. परंतु, 1972 च्या निवडणुकीत मात्र ते काँग्रेसचे काकासाहेब साळुंखे यांच्याकडून 1955 मतांनी पराभूत झाले.
त्यानंतर काकासाहेब साळुंखे यांच्या निधनानंतर। 1974 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत ते पुन्हा विजयी झाले 1978 , 1980 1985 ,1990च्या निवडणुकीत त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांवर मात केली 1995 च्या निवडणुकीत मात्र काँग्रेसचे शहाजीबापू पाटील यांच्याकडून 195 मतांनी पराभूत झाले 1999, 2004, 2009व 2014 च्या निवडणुकीत त्यांनी विजयश्री प्राप्त केली होती.
राजकारणातील भीष्माचार्य यांना श्रमिकांचा लाल सलाम !
मला गणपतराव देशमुख यांच्या सोबत 1978 आणि 2004 साली विधानसभेच्या सभागृहात काम करण्याची संधी मिळाली. तब्बल 11 वेळा आमदार म्हणून जनतेची सेवा बजावलेले देशमुख सांगोलाच्या माळरानावर महिलांसाठी सूत गिरणी उभारून स्वावलंबी व समर्थ बनवणारे प्रजाहितदक्ष व निष्कलंक नेते होते. आपली प्रतिभाशक्ती व प्रगल्भतेने सत्ताधारी यांच्यावर अंकुश ठेवणे आणि विरोधकांना कोंडीत पकडणे याचे उत्तम कौशल्य असणारे उत्कृष्ट विधानसभापटू गणपतराव देशमुख यांच्या निधनाने उभा महाराष्ट्र पोरका झाला. विधानसभा शिष्टाचार काटेकोर पणे पालन करणारे जाणकार आणि मार्क्सवादारावर पकड असणारे मुत्सद्दी महाराष्ट्राच्या राजकारणातील भीष्माचार्य ज्येष्ठ नेते यांना श्रमिकांचा लाल सलाम ! कॉ.नरसय्या आडम (मास्तर) माजी आमदार, सोलापूर.
गणपतराव देशमुख यांनी ११ वेळेस विधानसभा जिंकल्यामुळे वर्ल्ड गिनीज बुकमध्ये त्यांच्या कारकिर्दीची नोंद झाली आहे. तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री कै एम करूणानिधी हे १० वेळेस विजयी झाले होते. २०१२ मध्ये आमदार म्हणून विधानसभेतील त्यांच्या सहभागास ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल विधानसभा सभागृहात राज्य सरकारने त्यांचा यथोचित गौरव केला. हा सत्कार माझा नसून तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचा सत्कार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले होते.