गडहिंग्लज; पुढारी वृत्तसेवा : गडहिंग्लज कारखाना : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या (गोडसाखर) गेल्या दहा पंधरा दिवसांच्या घडामोडींमध्ये प्रशासकावरुन राजकीय कुरघोड्या सुरु आहेत. अखेर प्रादेशिक सहसंचालक ए. व्ही. गाडे यांनी तीन जणांचे प्रशासक मंडळ कारखान्यावर नियुक्त केले आहे. सहकारी संस्थांचे विभागीय उपनिबंधक अरुण काकडे यांच्याकडे अध्यक्षपदाची तर जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे व जिल्हा विशेष लेखापरीक्षक किरणसिंह पाटील यांना सदस्यपदी नियुक्त केले आहे.
आज गडहिंग्लज कारखाना कार्यस्थळावर प्रशासक मंडळाने हजेरी लावली. याबाबतचे आदेश ३ फेब्रुवारी रोजी काढण्यात आले आहेत. गेल्या दहा दिवसांपासून प्रशासक मंडळाच्या नियुक्तीबाबत होणार्या घडामोडींना अखेर पूर्णविराम मिळाला आहे.
कारखान्यात एकूण १८ संचालकांपैकी १२ संचालकांनी अध्यक्ष अॅड. श्रीपतराव शिंदे यांच्यावर मनमानी कारभाराचा आरोप करीत राजीनामे दिले होते. यानंतर प्रादेशिक सहसंचालकांनी कारखाना प्रशासनाला प्रशासक मंडळ का नियुक्त करु नये, याबाबत खुलासा मागितला होता.
याप्रकरणी सहा संचालकांपैकी काहींनी म्हणणे मांडण्यासाठी वेळ मागितली होती, जेणेकरुन प्रशासक नियुक्ती काही कालावधीसाठी पुढे ढकलून न्यायालयीन पातळीवरुन यासाठी स्थगिती घेता येईल, असा अंदाज बांधला होता. मात्र प्रशासनाने आज अखेर प्रशासक नियुक्त कारखान्याची धुरा त्यांच्याकडे दिली आहे. प्रशासक नियुक्तीमुळे मात्र राजकीय घडामोडी वेगळ्या वळणावर जाणार आहेत.