Latest

क्रीडा : बुद्धिबळपटूंची मांदियाळी!

Arun Patil

मिलिंद ढमढेरे

ऑलिम्पियाड स्पर्धा खर्‍या अर्थाने बुद्धिबळपटूंची मांदियाळी ठरली. या स्पर्धेत भारताने खुल्या गटात आणि महिलांमध्येही ब्राँझपदक जिंकले. वैयक्तिक विभागात सात पदके पटकावीत आपला स्वतंत्र ठसा उमटविला. ही स्पर्धा भारतीय बुद्धिबळ क्षेत्रासाठी दिशादर्शक ठरणार आहे. भारतीय खेळाडूंना जागतिक स्तरावरील अनेक मोठ्या स्पर्धांची दारे खुली होणार आहेत.

बुद्धिबळात अनेक वेळा विश्वविजेतेपद मिळवणारे मॅग्नस कार्लसन, विश्वनाथन आनंद, अनिस गिरी, फॅबिआनो कारूआना, लेक्सी शिरोव्ह यांच्यासारख्या श्रेष्ठ खेळाडूंचे कौशल्य बघण्याची संधी फारच दुर्मीळ असते. चेन्नई येथे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेद्वारे चाहत्यांना ही संधी प्राप्त झाली. ही स्पर्धा खर्‍या अर्थाने बुद्धिबळपटूंची मांदियाळी ठरली.

घरच्या वातावरणात आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत भारताने खुल्या गटात ब्राँझपदकाची कमाई केली. महिलांमध्येही भारताने ब्राँझपदक जिंकले. या दोन सांघिक पदकांबरोबरच भारताने वैयक्तिक विभागात दोन सुवर्ण, एक रौप्य व चार ब्राँझ अशी सात पदकेही पटकावित खर्‍या अर्थाने या स्पर्धेत आपला स्वतंत्र ठसा उमटविला. सर्वोत्कृष्ट व शानदार संयोजन, देशांचा विक्रमी प्रतिसाद, शेवटपर्यंत चुरशीने झालेल्या लढती, चाहत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि अर्थातच भारताला मिळालेले घवघवीत यश हे लक्षात घेतले, तर ही स्पर्धा भारतीय बुद्धिबळ क्षेत्रासाठी दिशादर्शकच ठरणार आहे.

मुळातच बुद्धिबळाची ऑलिम्पिक स्पर्धा असते, हे अनेकांना माहीत नाही. सन 1924 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांमध्ये बुद्धिबळाचा समावेश करण्याबाबत बुद्धिबळ संघटक प्रयत्नशील होते; मात्र त्यावेळी हौशी व व्यावसायिक खेळाडू यांची स्वतंत्र विभागणी करणे शक्य नव्हते, हे लक्षात आल्यामुळे ऑलिम्पिक संघटकांनी बुद्धिबळाच्या समावेशाचा प्रस्ताव अमान्य केला. योगायोगाने त्याच वर्षी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संघटनेची स्थापना करण्यात आली आणि पहिल्याच वर्षी त्यांनी अनधिकृत बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेचे आयोजन केले. या स्पर्धेत मिळालेल्या चांगल्या प्रतिसादामुळे बुद्धिबळ संघटकांचा उत्साह वाढला आणि त्यांनी सन 1927 पासून अधिकृतरीत्या ऑलिम्पियाडचे आयोजन सुरू केले. ही स्पर्धा दर दोन वर्षांनी आयोजित केली जाते. सन 1957 पासून महिलांसाठी स्वतंत्ररीत्या या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे.

चेन्नई येथे आयोजित करण्यात आलेल्या 44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेचे संयोजन पद खरे तर रशियाकडे होते. सन 2019 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या जागतिक चषक स्पर्धेबरोबरच ही स्पर्धा घेण्यात येणार होती. ही स्पर्धा पुढे ढकलण्यात येऊन मॉस्को येथे सन 2020 मध्ये या स्पर्धेचे संयोजन केले जाणार होते; तथापि कोरोना महामारीच्या कारणास्तव ही स्पर्धा होऊ शकली नाही. त्यानंतर रशियाने युक्रेनविरुद्ध युद्ध पुकारल्यामुळे ही स्पर्धा अन्य देशात आयोजित करण्याचे ठरविले. आजपर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित करणार्‍या भारतीय बुद्धिबळ संघटकांनी ही स्पर्धा आयोजित करण्याची तयारी दाखवली आणि सुदैवाने आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने त्यास मान्यताही दिली, त्यामुळेच भारतात प्रथमच या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. संयोजनपद मिळाल्यानंतर ही स्पर्धा शानदार स्वरूपात आयोजित करण्याची जिद्द संयोजकांनी दाखविली. भारतामधील बुद्धिबळाचे माहेरघर समजल्या जाणार्‍या चेन्नई शहरातच ही स्पर्धा आयोजित करण्याचे निश्चित झाले. खुल्या गटात 184 देशांतील 1737 खेळाडूंचा, तर महिला गटात 160 देशांतील 937 खेळाडूंचा सहभाग हा विक्रमी प्रतिसाद भारतीय संयोजकांबाबत परदेशी खेळाडूंमध्ये असलेला विश्वास सार्थ ठरवणारा आहे.

बुद्धिमळमय चेन्नई

या स्पर्धेच्या निमित्ताने चेन्नई शहर अक्षरशः बुद्धिबळमय झाले होते. शहरातील रस्ते आणि कठडे काळ्या पांढर्‍या चौकोनांच्या साहाय्याने रंगवण्यात आले होते. विमानतळापासून स्पर्धकांच्या निवासापर्यंत अनेक ठिकाणी स्वागताचे फलक लावण्यात आले होते. प्रत्येक खेळाडूचे हार घालून स्वागत करण्यात आले. शहरात अनेक ठिकाणी मोठ्या आकाराचे बुद्धिबळपट आणि सोंगट्या ठेवण्यात आल्या होत्या. कोणालाही बुद्धिबळाचा आनंद घेता येईल, अशीच तेथे व्यवस्था करण्यात आली होती. स्पर्धेच्या ठिकाणी नामवंत खेळाडूंची छायाचित्रे असलेले फलक लावण्यात आले होते. परदेशी स्पर्धकांना त्यांच्या नेहमीच्या खाद्यपदार्थांचा आनंद घेण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. त्याचप्रमाणे स्पर्धकांसाठी फावल्या वेळात मनोरंजनाचे कार्यक्रम, स्मृतिचिन्हे व अन्य भेटवस्तूंचे प्रदर्शन, बुद्धिबळा विषयी वेगवेगळ्या भाषेतील पुस्तकांचे दालन अशा सोयीदेखील तेथे होत्या. एरवी क्रिकेटपटूंचे छायाचित्र, स्वाक्षरी घेण्यासाठी चाहत्यांमध्ये जशी चढाओढ बघावयास मिळते, तशीच चढाओढ स्पर्धेच्या ठिकाणा जवळ आणि खेळाडूंच्या निवासापाशी पाहावयास मिळाली. खर्‍या अर्थाने परदेशी खेळाडूंबरोबरच भारतीय खेळाडूही 'सेलिब्रेटी' झाले होते.

अष्टपैलू विश्वनाथन आनंद

आनंद हा भारतामधील बुद्धिबळाचा युगकर्ता मानला जातो. पाचवेळा विश्वविजेतेपद मिळवणारा आनंद अजूनही आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करीत असतो. बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेचे आयोजन त्याच्या शहरात म्हणजेच चेन्नई येथे करण्यामध्ये त्याचाही सिंहाचा वाटा आहे. भारतीय खेळाडूंसाठी तो वेळोवेळी सल्लागार म्हणूनही सहकार्य करीत असतो. त्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा म्हणजे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघावर उपाध्यक्ष म्हणून झालेली त्याची निवड. आनंद हा क्रीडा क्षेत्रातील सेलिब्रेटी मानला गेला असला, तरीही अजूनही त्याचे पाय जमिनीवरच आहेत. ऑलिम्पियाड स्पर्धेच्या वेळी त्याने नवोदित खेळाडूंना मार्गदर्शन केले व त्यांच्यासमवेत छायाचित्रे काढण्याची संधी दिली. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाच्या उपाध्यक्षपदी त्याच्या नियुक्तीचा भारताच्या युवा खेळाडूंना खूप फायदा होणार आहे. अनेक जागतिक स्पर्धांचे आयोजनपदही भारताकडे येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा जर परदेशात झाली असती, तर भारताला पुरुष व महिला गटात प्रत्येकी फक्त एकच संघ पाठविता आला असता. यजमानपद भारताकडे असल्यामुळे भारताला दोन्ही गटात प्रत्येकी तीन संघांना उतरवण्याची संधी मिळाली आणि त्याचा पुरेपूर फायदा भारताच्या युवा खेळाडूंना मिळाला. महिला गटात भारताचे सुवर्णपदक हुकले. शेवटच्या फेरीत भारत 'अ' संघाला अमेरिकेविरुद्ध 1-3 असा पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे त्यांना ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले. अर्थात भारतीय संघाच्या द़ृष्टीने ही कामगिरीदेखील कौतुकास्पदच आहे. भारतीय संघाच्या या विजयात या संघाचे प्रशिक्षक व पुण्याचे ग्रँडमास्टर अभिजित कुंटे यांच्या कुशल मार्गदर्शनाचा महत्त्वाचा वाटा आहे. तीन महिने म्हणून जास्त काळ या संघातील खेळाडूंनी सराव केला होता. भारताच्या या संघातील खेळाडू आर. वैशाली व तानिया सचदेव या दोघींनीही वैयक्तिक विभागात ब्राँझपदक जिंकले. भारताच्या 'ब' आणि 'क' संघांनी अनुक्रमे आठवे व अकरावे स्थान घेत उल्लेखनीय संपादन केले. भारताच्या 'ब' संघातील खेळाडू दिव्या देशमुख हिने ब्राँझपदकावर नाव कोरले. यंदा महिलांच्या राष्ट्रीय स्पर्धेत अजिंक्यपद मिळवणार्‍या या महाराष्ट्राच्या खेळाडूकडून खूप मोठ्या अपेक्षा मानल्या जात आहेत. ऑलिम्पियाडमध्ये तिच्याबरोबरच ईशा करवडे, सौम्या स्वामीनाथन या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी अनेक अनपेक्षित निकाल नोंदवले.

द्रोणावलीची कमाल

खेळासाठी अनेक गोष्टींचा त्याग करण्याची वृत्ती भारताच्या अनेक खेळाडूंमध्ये पाहावयास मिळते. महिला संघातील खेळाडू द्रोणावली हरिका ही आठ महिन्यांची गर्भवती असूनही या स्पर्धेत उतरली होती. ही स्पर्धा चेन्नईतच होणार, असे कळल्यानंतर तिने तिच्या वैयक्तिक वैद्यकीय तज्ज्ञांकडून या स्पर्धेत खेळण्यासाठी परवानगी मिळवली. तिच्या जिद्दीला खरोखरच सलाम म्हटला पाहिजे कारण कधी कधी बुद्धिबळाचा डाव तीन-चार तासांपेक्षा जास्त वेळ चालतो. तरीदेखील तिने या स्पर्धेत नेहमीच्या शैलीने सफाईदारपणा दाखविला आणि भारताला ब्राँझपदक मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला. तिच्याबरोबरच संयोजकांचेही विशेष कौतुक केले पाहिजे. स्पर्धेच्या सभागृहाच्या बाहेरच त्यांनी सुसज्ज सुविधा असलेली रुग्णवाहिका आणि वैद्यकीय तज्ज्ञांचा ताफा ठेवला होता. एवढेच नव्हे, तर ज्या टेबलावर तिचा सामना होता, त्या टेबलाच्या बाजूंना जाड स्पंज चिकटवण्यात येत होता.

उदयोन्मुख खेळाडू डी. गुकेश ही भारतासाठी यंदाच्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडने दिलेली मोठी देणगी म्हणावी लागेल. भारताला तीन संघ उतरविता आले, त्यामुळेच गुकेश याला त्याचे कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली. त्याचा फायदा घेत त्याने वैयक्तिक विभागात सोनेरी कामगिरी केली. ही कामगिरी करताना त्याने फॅबिआनो कारूआना, लेक्सी शिरोव्ह, गॅब्रियल सर्गीसन यांच्यावर नोंदविलेले विजय बुद्धिबळ पंडितांना थक्क करणारे होते. त्याने या स्पर्धेत 2700 मानांकन गुणांचाही टप्पा ओलांडला. त्याने निहाल सरीन, आर.प्रज्ञानानंद आणि महाराष्ट्राचा रौनक साधवानी यांच्या साथीत भारताच्या 'ब' संघास ब्राँझपदक मिळवून दिले. वैयक्तिक विभागात निहाल याने सुवर्णपदक, तर प्रज्ञानानंद याने ब्राँझपदक पटकाविले. अर्जुन एरिगेसी याने रुपेरी यश संपादन केले. प्रज्ञानानंद याची बहीण वैशाली हिनेदेखील ब्राँझपदक जिंकले. भारताला यापूर्वी सन 2014 मध्ये तिसरे स्थान मिळाले होते. भारतीय संघाला पुरुष (खुला गट) व महिला या दोन्ही गटांमध्ये नेत्रदीपक कामगिरीबद्दल विशेष चषकही देण्यात आला. या स्पर्धेतील कौतुकास्पद कामगिरीमुळे भारतीय खेळाडूंना जागतिक स्तरावरील अनेक मोठ्या व प्रतिष्ठेच्या स्पर्धांची द्वारे खुली होणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT