Latest

कोव्हिड-19 : ‘लॉकडाऊन’मधून बाहेर पडताना..!

Arun Patil

कोव्हिड-19 चा संसर्ग कमी होत निघाल्याने महाराष्ट्र सरकारने शाळा आणि धार्मिक स्थळे खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि, अनेकांकडून तिसर्‍या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. वास्तविक सिरो सर्व्हेची आकडेवारी आणि झालेले लसीकरण पाहता बहुसंख्य लोकांमध्ये प्रतिकारशक्ती विकसित झालेली आहे. या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर तिसरी लाट येण्याची शक्यता अतिधूसर बनली आहे.

कोव्हिड-19 च्या प्रसारकाळात दीर्घकाळ बंद राहिलेल्या शाळा आणि इतर सार्वजनिक जागा सुरू करण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय गरजेचा होता. ऑगस्ट महिन्यामध्ये जेव्हा महाराष्ट्रातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या टास्क फोर्सने शाळा सुरू करण्यास विरोध दर्शवला होता, तेव्हाच जनआरोग्य अभियानामार्फत पत्रक काढून ही भूमिका अशास्त्रीय असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. गेल्या जवळपास दोन वर्षांपासून शाळा बंद ठेवल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान होण्याबरोबरच शारीरिक व मानसिक आरोग्य बिघडले आहे.

अंगणवाड्या, शाळा बंद केल्याने तिथे मिळणारा शिजवलेला पूरक आहार बंद झाला आहे. घरी कोरडा शिधा दिला जात असला तरी तो मुलांच्या वाट्याला येईलच याची हमी नसते. त्यामुळे गरीब स्तरातील मुलांमधील कुपोषण वाढलेले दिसून आले आहे. या वाढीव कुपोषणामुळे त्यांच्यात क्षयरोगाचे प्रमाण वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शाळा सुरू केलेल्या त्यांना व कुटुंबीयांना होणारा कोव्हिड-19 चा धोका याच्याशी या सर्व नुकसानीची तुलना करायला हवी.

आयसीएमआरने केलेल्या चौथ्या 'सिरो सर्व्हे'च्या जुलैअखेरीस प्रसिद्ध झालेल्या निष्कर्षातून भारतामध्ये सरासरी 67 टक्के जनतेमध्ये कोव्हिड-19 ची लागण होऊन गेली असल्याचे स्पष्ट झाले होते. म्हणजेच या लोकांच्या रक्तामध्ये अँटिबॉडीज तयार झाल्या होत्या. तसेच सहा वर्षांवरील मुलांमध्येही लागणीचे प्रमाण जवळपास तेवढेच आहे. याचाच अर्थ शाळा बंद ठेवूनही शालेय वयोगटातील लागणीचे प्रमाण प्रौढ लोकांइतकेच आहे.

कोव्हिड लागणीचे मुलांमध्ये प्रमाण प्रौढ लोकांइतकेच असले आणि 0 ते 14 वयोगटातील मुलांचे प्रमाण एकूण लोकसंख्येतील प्रमाण 26 टक्के असले तरी सरकारी आकडेवारीनुसार कोव्हिड-19 ने दगावलेल्या मुलांचे प्रमाण एकूण कोव्हिड मृत्यूंच्या 0.5 टक्केही नाही. आपला अनुभवही या आकडेवारीशी जुळतो. बहुसंख्य मुलांना कोव्हिड लागणीमुळे कोणताही त्रास होत नाही, लक्षणे दिसत नाहीत. गंभीर कोव्हिड आजाराचे प्रमाणही त्यांच्यात अत्यंत कमी आहे; तर कोव्हिड मृत्यूचे प्रमाणही नगण्य आहे.

शाळा सुरू केल्या नसतानाही मुलांमध्ये प्रौढ लोकांइतकीच लागण होत असेल तर मग शाळा बंद ठेवून होणारे मुलांचे शैक्षणिक, सामाजिक, मानसिक महाप्रचंड नुकसान लक्षात घेता आता यापुढे शाळा बंद ठेवणे सामाजिक आरोग्य विज्ञानाशी विसंगत ठरले असते. दुसरीकडे राज्यातच काही भागात योग्य काळजी घेऊन अनेक शाळा यापूर्वीच सुरू झाल्या असून त्यांचा अनुभवही नकारात्मक नाही, याचीही नोंद घ्यायला हवी. पुण्या-मुंबईमध्ये अलीकडे झालेल्या सिरो सर्व्हेमध्ये 80 टक्के लोकांच्या रक्तामध्ये अँटिबॉडीज सापडलेल्या आहेत. म्हणजेच 80 टक्के लोकांमध्ये प्रतिकारशक्ती तयार झालेली आहे.

असे असले तरी राज्यासह देशात सध्या कोव्हिडच्या तिसर्‍या लाटेची शक्यता चर्चिली जात आहे. मात्र कोव्हिड-19 ची दुसरी लाट अतिप्रचंड असूनही वर म्हटल्याप्रमाणे त्यात लहान मुलांमध्ये कोव्हिड-19 आजार, गंभीर आजार, मृत्यू यांचे प्रमाण अत्यंत कमी होते. आताही तिसरी लाट आली तरी ती दुसर्‍या लाटेसारखी मोठी नसेल. कारण दुसर्‍या लाटेच्या आधी फक्त 24 टक्के जनतेमध्ये कोव्हिड लागण झाल्याने कोव्हिड विरोधी प्रतिकारशक्ती आली होती; तर हे प्रमाण जून-जुलैमध्ये 67 टक्क्यांवर पोहोचले होते.

आता हा आकडा 70 टक्क्यांपेक्षा जास्त असेल. कारण आजार पसरतो कसा? तर प्रतिकारशक्ती नसलेल्या माणसाच्या शरीरामध्ये विषाणू शिरतात आणि तिथे त्यांची संख्या वाढते आणि तिथून ते पुढील व्यक्तीच्या शरीरात जातात. पण जेव्हा अशा बहुसंख्य व्यक्तींमध्ये रोगप्रतिकारक शक्ती तयार असेल तर त्यांच्या शरीरात विषाणूंची वाढ होणे, त्यांची नवी पिढी तयार होणे आणि दुसर्‍या लोकांना त्याची लागण होणे ही प्रक्रियाच थांबते. विषाणूचा प्रसार वेगाने होण्यासाठी किंवा लाट येण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती नसलेला मोठा समाज असणे गरजेचे असते. दुसर्‍या लाटेच्या सुरुवातीला अशी स्थिती होती. पण आता तशी स्थिती नाही.

आता लसीकरणामुळे आणि अनेक जणांना कोव्हिड-19 होऊन गेल्यामुळे वेगाने विषाणूसंसर्ग होण्याला मर्यादा येणार आहेत. त्यामुळे मोठी तिसरी लाट येण्याची शक्यता आता कमी आहे. लहान मुलांमध्ये कोव्हिडमुळे मल्टिसिस्टीम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम हा गंभीर आजार होऊ शकतो, हे खरे आहे; पण अशा मुलांचे प्रमाण अत्यंत कमी आहे. हा धोका टाळण्यासाठी लहानपणापासून होणारा मधुमेह, अतिरिक्त वजन, काही गंभीर आजार-आरोग्य प्रश्न असणार्‍या मुलांना सध्या शाळेत पाठवू नका, असे पालकांना सांगता येईल.

कितीही काळजी घेतली तरी शाळेत मुलांना लागण होण्याची शक्यता आहेच. या लागणीपासून त्यांना स्वतःला आजार होण्याची शक्यता नसली तरी त्यांच्यापासून घरातील ज्येष्ठ व्यक्तींना व मधुमेह इत्यादी घटक असलेल्यांना लागण होण्याची शक्यता आहे. पण आतापर्यंत अशा लोकांपैकी बहुसंख्य लोकांना लागण होऊन गेली आहे किंवा त्यांना प्राधान्याने लस मिळाली आहे. त्यामुळे हे कारणही शाळा बंद ठेवण्यास सयुक्तिक ठरणारे नाही.

काही जणांनी लहान मुलांची लस आल्यावर त्यांच्यामध्ये वेगाने लसीकरण करून मगच शाळा उघडाव्यात, असे मत मांडले होते. जागतिक आरोग्य संघटना किंवा भारतातील बालआरोग्य तज्ज्ञांची संघटना यांनी मुलांचे लसीकरण होणे, ही शाळा उघडण्याची पूर्वअट ठेवलेली नाही. आयसीएमआरचे प्रमुख बलराम भार्गव यांनी मध्यंतरी शिफारस केली होती की, पूर्वतयारी करून शाळा उघडायला प्राथमिक शाळांपासून सुरुवात करावी. लहान मुलांसाठीची लस येण्यास आणखी काही महिने आहेत. त्याचे पुरेशा प्रमाणात उत्पादन होऊन सर्व मुलांना दोन डोस देण्याचे काम पूर्ण करायला पुढचे काही महिने लागतील.

तोपर्यंत शाळा बंद ठेवणे संयुक्तिक ठरणारे नाही. विकसित देशांत शाळा सुरू करण्यापूर्वी मुलांचे लसीकरण ही पूर्वअट ठेवलेली नाही, हेही लक्षात घ्यायला हवे. इंग्लंडमध्ये लहान मुलांसाठी लस वापरायला परवानगी असूनही फक्त 12 ते 17 वयोगटातील विद्यार्थ्यांना ही लस दिली जात आहे. मुळात लहान मुलांना कोव्हिड-19 ची लस द्यावी की नाही याबाबतच तज्ज्ञांचे एकमत नाहीय. बहुसंख्य विकसित देशांनी लॉकडाऊनचे दिवस वगळता बहुतांश वेळा शाळा सुरू ठेवल्या आहेत.

शाळा चालवताना घ्यायच्या काळज्या याबद्दल तपशिलात मार्गदर्शिका निरनिराळ्या तज्ज्ञ संस्थांनी दिल्या आहेत. त्यामुळे सुयोग्य मापदंड पाळून आणि पूर्वतयारी करून अंगणवाड्या आणि शाळा लवकरात लवकर सुरू करणे आवश्यकच आहे. तसेच तेथील पूरक आहारही सुरू करायला हवा.

शाळा सुरू करताना, चालवताना घ्यावयाच्या काळजीबाबतच्या मार्गदर्शिका सार्वजनिक आरोग्यशास्त्राच्या आधारे बनवायला हव्यात. उदाहरणार्थ शाळा सुरू करताना सर्व शिक्षक व इतर कर्मचारी यांचे लसीकरण पूर्ण झालेले असले पाहिजे. शाळा निर्जंतुक करण्याची गरज नाही. कितीही काळजी घेतली तरी एरोसोल या मार्गाने लागण होऊन काही मुलांना कोव्हिड-19 आजार होण्याची शक्यता आहे; पण त्याचे खापर मुख्याध्यापकांवर वा एखाद्या शिक्षकावर फोडून त्यांच्यावर कारवाई करणे हे प्रकारही टाळले पाहिजेत.

आजची एकंदर स्थिती पाहता मोठ्या तिसर्‍या लाटेची शक्यता कमी असली तरी डेल्टा व्हेरियंट वेगाने पसरला किंवा तसा एखादा व्हेरियंट तयार झाला तर मात्र काळजी वाढू शकते. कारण या व्हेरियंटची प्रसारक्षमता अधिक आहे. अल्फा व्हेरियंटच्या ती दीडपट आहे. तसेच डेल्टा व्हेरियंटपासून सध्या दिल्या जाणार्‍या लसी 40 ते 50 टक्केच लोकांनाच संरक्षण देतात.

त्यामुळे तिसर्‍या लाटेची शक्यता राहणार आहे. कारण आज जरी रोगप्रतिकारशक्ती असलेले किंवा अँटिबॉडीज विकसित झालेल्यांची संख्या मोठी असली तरी ती नसलेल्या मोठ्या लोकसमूहात जर या व्हेरियंटचा शिरकाव झाला; तर त्याची ठिणगी इतकी प्रभावी आहे की, त्यामुळे भडका उडू शकतो. पण ही शक्यता फार कमी आहे.

वेल्लोर येथील ख्रिस्तियन मेडिकल कॉलेजच्या विषाणूतज्ज्ञ आणि साथरोगतज्ज्ञ गंगादीप कांग यांनीही तिसर्‍या लाटेची शक्यता कमी असल्याचे मत व्यक्त केले आहे. याखेरीज जयप्रकाश मुलिवल यांच्यासारखे विषाणूतज्ज्ञही सांगताहेत की, 80 टक्के लोकांमध्ये रोगप्रतिकार शक्ती विकसित होईल तेव्हा कोरोना पँडेमिक न राहता एंडॅमिक होईल; म्हणजेच ती साथ राहणार नाही. इतकेच नव्हे तर त्यांनी तिसरी लाट ही आता लोकचर्चेपुरतीच राहील, असेही म्हटले आहे. त्यांच्या आणि इतर तज्ज्ञांच्या मते, कोव्हिड-19 च्या महामारीमध्ये 80 टक्के पेक्षा जास्त जनतेमध्ये प्रतिकारशक्ती आली की हर्ड इम्युनिटी येऊन साथ संपू लागेल.

म्हणजेच उर्वरित 20 टक्के लोकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण झालेली नसली तरी त्यांना आपोआप संरक्षण मिळते. सारांश तिसर्‍या लाटेची भीती बाळगून दैनंदिन व्यवहार आणि व्यापार,उद्योग बंद ठेवून बसण्याची गरज आता संपली आहे. तरीही सर्व काही खुले झाल्यानंतर काही प्रमाणात बाधितांचा आकडा वाढू शकतो हे गृहित धरून उपाययोजनांच्या पातळीवर तयार राहणे यातच सुज्ञपणा आहे.

आज राज्यात आणि देशात लसीकरणही मोठ्या प्रमाणावर होत आहे. दुसरीकडे जेवढ्या लोकांना या विषाणूची बाधा होते तेवढ्या लोकांमध्ये रोगप्रतिकारशक्तीही तयार होते, हेदेखील लक्षात ठेवले पाहिजे. शेवटी विषाणूची लागण होणे हे एक प्रकारचे नॅचरल इम्युनायजेशनच असते. मात्र त्याची किंमत मोठी चुकवावी लागते.

भारतातील आकडेवारीनुसार, 10 लाख जणांना लागण झाल्यास त्यातील सुमारे 400 जणांचा मृत्यू झालेला आहे. याउलट 10 लाख जणांना लस टोचल्यास एकाला मृत्यू येतो. थोडक्यात नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती तयार होणे हे 'महागडे' आहे. पण शेवटी तो निसर्गचक्राचा एक भाग आहे. त्याचा फटका मोठा बसत असल्याने आपण लसीकरणाच्या माध्यमातून कृत्रिम मार्ग निवडतो, की ज्याची फार मोठी किंमत चुकवावी लागत नाही.

नैसर्गिक लागणीतून होणारी प्रतिकारशक्ती आणि लसीकरणातून तयार होणारी प्रतिकारशक्ती या सर्वांचा विचार करता तिसरी लाट येण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे 'कोव्हिडने मरायचे की उपाशी मरायचे', या लोकभावनांची दखल घेत दैनंदिन व्यवहार पूर्ववत करणेच इष्ट ठरणारे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT