मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : कोळसा टंचाईमुळे महावितरणची त्रेधातिरपिट उडाली असून विविध औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांतील 13 संच बंद पडल्याने राज्याला होणार्या वीज पुरवठ्यापैकी तब्बल 3330 मेगावॅट विजेचा पुरवठा ठप्प झाला आहे. परिणामी राज्यात अनेक ठिकाणी अल्प वेळेसाठी अघोषित भारनियमन सुरू झाले आहे. दरम्यान, दीर्घ काळासाठीचे भारनियमन टाळण्याचा प्रयत्न सुरू आहे.
बाजारातून सुमारे अडीच हजार मेगावॅट विजेची खरेदी सुरू असून सणासुदीच्या दिवसांत भारनियमन होणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले. तातडीच्या वीजखरेदीसह जलविद्युत व अन्य स्रोतांकडून वीज पुरवठा उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
कोळसा खाणीच्या परिसरात सुरू असलेली अतिवृष्टी आता थांबल्यामुळे कोळसा उत्सखनन सुरू होण्याची राज्य सरकारला अपेक्षा आहे. असे झाले तर विजेचे हे संकट टळू शकणार आहे. देशभरात कोळसाटंचाई निर्माण झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून औष्णिक वीजनिर्मिती कमी होत आहे.
राज्यालाही त्याचा फटका बसला आहे. औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील बंद पडलेल्या 13 निर्मिती संचांमध्ये महानिर्मितीचे चंद्रपूर, भुसावळ व नाशिक प्रत्येकी 210 मेगावॅटचे तसेच पारस- 250 मेगावॅट आणि भुसावळ व चंद्रपूर येथील 500 मेगावॅटचा प्रत्येकी एक संच बंद झाला आहे. यासोबतच पोस्टल गुजरात पॉवर लिमिटेडचे 640 मेगावॅटचे चार संच आणि रतन इंडिया पॉवर लिमिटेडचे (अमरावती) 810 मेगावॅटचे तीन संच बंद आहेत. यामुळे महावितरणला औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांमधून कराराप्रमाणे मिळणार्या विजेमध्ये घट होत आहे.
विजेच्या मागणी व उपलब्धता यामधील सध्या 3330 मेगावॅटची तूट भरून काढण्यासाठी खुल्या बाजारातून (पॉवर एक्स्चेंज) वीज खरेदी सुरु आहे. देशभरात विजेची मागणी वाढल्यामुळे वीज खरेदीचे दर महाग होत आहे. खुल्या बाजारातून 700 मेगावॅट विजेची खरेदी 13 रुपये 60 पैसे प्रतियुनिट दराने करण्यात येत आहे.
तर आज सकाळी रियल टाईम व्यवहारातून 900 मेगावॅट विजेची 6 रुपये 23 पैसे प्रतियुनिट दराने खरेदी करण्यात आली. यासोबतच कोयना धरण तसेच इतर लघु जलविद्युत निर्मिती केंद्र आणि अपारंपरिक ऊर्जा स्रोतांद्वारे वीज उपलब्ध करण्यात येत आहे.
कोळसा टंचाईचे सावट गडद होत असतानाच राज्यात उष्मा वाढल्यामुळे विजेची मागणी देखील वाढली आहे. राज्यात (मुंबई वगळून) शनिवारी 17,289 मेगावॅट विजेची मागणीप्रमाणे महावितरणकडून पुरवठा करण्यात आला.
तर गेल्या 24 तासांमध्ये राज्याच्या काही भागात पाऊस झाल्यामुळे रविवारी विजेच्या मागणीत घट झाली, रविवारी सकाळी 11.30 वाजता राज्यात 18,200 मेगावॅट तर महावितरणच्या कार्यक्षेत्रात 15 हजार 800 मेगावॅट विजेची मागणी होती. विजेचे भारनियमन टाळण्यासाठी महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या आदेशानुसार कृषी वाहिन्यांवर दररोज आठ तास दिवसा किंवा रात्री चक्राकार पद्धतीने थ्री फेज वीजपुरवठा करण्यात येत आहे.