राज्यातील आठ औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पांमध्ये केवळ दीड ते दोन दिवस पुरेल एवढाच कोळसा शिल्लक आहे. केंद्र सरकारने कोळशाचा पुरवठा केला नाही तर ऐन नवरात्रीत राज्य अंधारात बुडण्याची भीती निर्माण झाल्याचे वीज निर्मिती कंपनीतील खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.
औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पातून अखंडित वीज निर्मितीसाठी किमान पंधरा दिवस पुरेल एवढा कोळसा साठा असणे आवश्यक असते. महानिर्मिती कंपनी गेल्या दोन महिन्यांपासून कोळसा टंचाई चा सामना करीत आहे. आता हे संकट अधिक वाढले आहे. औष्णिक वीजनिर्मिती केंद्रे बंद पडून महाराष्ट्राला अभूतपूर्व वीज संकटाचा सामना करावा लागू शकतो.
महानिर्मितीच्या नाशिक, परळी, खापरखेडा, चंद्रपूर (दुर्गापूर), भुसावळ, पारस आणि कोराडी या सात वीज प्रकल्पांची एकूण वीजनिर्मिती क्षमता 7 हजार 700 मेगावॅट आहे. येथून एकूण क्षमतेच्या जवळपास 75 ते 80 टक्के एवढी वीजनिर्मिती केली जाते. त्यासाठी दररोज जवळपास 80 हजार मेट्रिक टन कोळसा लागतो. मात्र सध्या महानिर्मितीकडे केवळ एक-दीड दिवस पुरेल एवढाच कोळसा शिल्लकआहे.
राज्यातील खापरखेडा औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पात दीड दिवस पुरेल एवढा कोळसा शिल्लक आहे. तर कोराडीच्या प्रकल्पात तीन दिवस, परळीला एक दिवस, भुसावळ एक दिवस, नाशिक दीड दिवस, चंद्रपूर दोन दिवस, पारसला एक दिवस पुरेल एवढाच कोळसा शिल्लक आहे.
वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड, एसईसीएल आणि एमसीएलकडून दररोज 70-80 हजार मेट्रिक टन कोळसा पुरवला जात आहे. रोज मिळणार्या कोळशातून रोज वीज निर्मिती करणे हे दिवसेंदिवस कठीण होत आहे.
या ऊर्जा केंद्रांना दररोज 30 रॅक कोळशाचा पुरवठा आवश्यक असतो. पण कोल इंडियाकडून राज्याला गेल्या आठवड्यात केवळ 16 ते 17 रॅक कोळशाचा पुरवठा केला गेला. कोळसा खाण क्षेत्रात झालेल्या पावसाने उत्पादन घटले आणि पुरवठाही घटला. आता पाऊस कमी झाल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून राज्याला 21 रॅक कोळसा मिळत आहे. राज्याला आणखी 8 रॅक कोळसा मिळणे आवश्यक आहे.
राज्याला पुरेसा कोळसा पुरवठा करावा, यासाठी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी कोल इंडियाचे चेअरमन प्रमोद अग्रवाल यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी देशातील सर्व औष्णिक ऊर्जा निर्मिती केंद्रांना पुरेसा पुरवठा केला जाईल, अशी ग्वाही दिली. त्यामुळे राज्याला पुरेसा कोळसा पुरवठा होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्रात सध्या दोन दिवस पुरेल एवढाच कोळसा शिल्लक आहे. कोळशाचा पुरवठा न झाल्यास येथील औष्णिक वीज केंद्रातून होणारी वीजनिर्मिती ठप्प होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
परळी येथे 210 मेगावॅटचे तीन, 250 मेगावॅटचे तीन असे एकूण सहा संच आहेत. त्यापैकी 210 मेगावॅटचे तीन संच बंद आहेत. 250 मेगावॅट वीज निर्मिती क्षमता असलेल्या तीन संचांपैकी केवळ दोनच संच सध्या सुरू आहेत. एक संच वार्षिक देखभालीसाठी बंद आहे.
चालू असलेल्या दोन संचासाठी दररोज दहा हजार मेट्रिक टन कोळसा लागतो. दररोज साडेतीन हजार मेट्रिक टन क्षमता असलेल्या एक किंवा दोन रॅक (कोळसा वाहून आणणार्या मालवाहू रेल्वेगाड्या) येथे येत आहेत. त्यामुळे हा कोळसा वापरून शिल्लक असलेला कोळसा वापरावा लागत आहे. वीज केंद्राला दोन दिवस पुरेल एवढा कोळसा येथील केंद्राकडे शिल्लक आहे. कोळशाअभावी दोन्हीही वीज निर्मिती संच बंद पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.