Latest

कोल्हापूरसह साडेतीन शक्तिपीठे जोडणार नागपूर-गोवा महामार्ग

Arun Patil

ठाणे, श्रद्धा शेवाळे : बहुचर्चित नागपूर-मुंबई समृद्धी या देशातील सर्वाधिक लांब आणि अतिजलद महामार्गानंतर नागपूर ते गोवा हा प्रवास 11 तासांत करणारा नवा शक्तिपीठ महामार्ग रस्ते विकास महामंडळ बांधणार आहे. यामध्ये कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजा भवानी, माहूरची रेणुका आणि नाशिक जिल्ह्यातील वणीची सप्तशृंगी अशा साडेतीन शक्तिपीठांना जोडणारा हा महामार्ग असणार आहे.

हा महामार्ग 760 किलोमीटरचा आहे. या महामार्गाला ग्रीन फील्ड सुपरफास्ट हायवे असे नाव देण्यात आले आहे. सध्या नागपूर ते गोवा हे अंतर एक हजार किलोमीटरपेक्षा जास्त आहे. नव्या महामार्गामुळे हे अंतर 760 किलोमीटर एवढे होणार आहे. राज्यात साडेतीन शक्तिपीठे असून सध्या समृद्धी महामार्ग नागपूर ते मुंबई असा आहे. यातील शिर्डीपर्यंतचे काम पूर्ण झाले आहे; तर शिर्डी ते मुंबई हे काम प्रगतिपथावर आहे. आता या महामार्गाला जोडूनच कोल्हापूरमार्गे गोवा अशा शक्तिपीठ महामार्गाची रचना केली जाणार
आहे.

या ग्रीन फिल्ड द्रुतगती महामार्गाच्या उभारणीनंतर सेवाग्राम आश्रम, कारंजा लाड, माहूर येथील देवी, औंढा नागनाथ मंदिर, नांदेड गुरुद्वारा, परळी वैजनाथ, अंबाजोगाईची योगेश्वरी, लातूरचा सिद्धेश्वर, पंढरपूर, तुळजापूरची तुळजाभवानी, अक्कलकोट, मंगळवेढा, नरसोबाची वाडी, कोल्हापूरची अंबाबाई, कोकणातील कुणकेश्वर आणि पत्रादेवी ही धार्मिक पर्यटनस्थळे जोडली जाणार आहेत. त्यातून पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे.

महामार्ग 13 जिल्ह्यांतून जाणार

सध्या नागपूरहून गोव्याला जाण्यासाठी एक हजार किलोमीटरचेअंतर कापण्यासाठी 24 तास लागतात. नव्या महामार्गामुळे हे अंतर 11 तासांवर येणार आहे. त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भ अधिक जलद गतीने जोडला जाणार आहे. हा महामार्ग 13 जिल्ह्यांतून प्रस्तावित आहे. यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, रायगड, नाशिक आदींचा समावेश आहे. त्यासाठी 70 हजार कोटी खर्च अपेक्षित आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT