कोल्हापूर ; राजेंद्र जोशी : जिल्ह्यासह आजूबाजूच्या परिसरातील गोरगरीब रुग्णांसाठी महत्त्वाची सुविधा छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात (सीपीआर) उपलब्ध होत आहे. रोगनिदानाच्या क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे अत्याधुनिक डिजिटल रेडिओग्राफी एक्स-रे मशिन येत्या चार दिवसांमध्ये रुग्णसेवेत दाखल होत आहे. यामुळे रुग्णांचा अत्यंत सुस्पष्ट असा एक्स-रे या मशिनवर अल्पावधीत उपलब्ध होईल. शिवाय, हाडांची छोटी फ्रॅक्चर्स, छातीमध्ये झालेल्या कोरोना संसर्गाची सुरुवात यासाठी आता सिटी स्कॅन यंत्राची गरज हे यंत्र भागविणार आहे. दक्षिण महाराष्ट्र व कोकणातील हे पहिलेच यंत्र आहे.
कोरोना काळाच्या पहिल्या टप्प्यात राज्य शासनाने रोगनिदानासाठी एक्स-रे मशिन्सची आवश्यकता आहे का, अशी विचारणा राजर्षी शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाला केली होती. त्यानुसार महाविद्यालयाच्या रेडिओलॉजी विभागाने या अत्याधुनिक डिजिटल रेडिओग्राफी मशिनचा प्रस्ताव पाठविला. या प्रस्तावाला मंजुरी देऊन शासनाने सुमारे 1 कोटी 35 लाख रुपये किमतीचे अमेरिकन बनावटीचे हे यंत्र कोल्हापूरला पाठविले होते. रेडिओलॉजी विभागाचे प्रभारी प्रमुख डॉ. स्वेनिल शहा यांच्या मार्गदर्शनाखाली ते येत्या चार दिवसांमध्ये ते प्रत्यक्ष रुग्णसेवेसाठी उपलब्ध होऊ शकेल.
'केअर स्ट्रीम डीआरएक्स' या कंपनीचे हे यंत्र 1000 मिली अॅम्पिअर क्षमतेचे म्हणजेच सध्या उपलब्ध यंत्रांच्या दुप्पट क्षमतेचे आहे. या यंत्राद्वारे रुग्णाचा एक्स-रे घेताना रुग्णाला निरनिराळ्या स्थितीमध्ये वळविण्याची गरज भासत नाही. त्याऐवजी यंत्रच फिरत असल्याने स्थिर स्थितीमध्ये रुग्णाच्या कोणत्याही भागाचा एक्स-रे घेता येऊ शकतो. तसेच स्ट्रेचरवरून खाली न उतरविता रुग्णाचा एक्स-रे घेता येणे शक्य झाले आहे. रुग्णालयात दररोज एक्स-रेसाठी येणार्या रुग्णांची संख्या 500 ते 600 च्या घरात आहे.
सध्या सीपीआर रुग्णालयात उपलब्ध असलेल्या यंत्रामध्ये रुग्णाचा एक्स-रे काढताना कॅसेटस्चा वापर केला जातो. त्याची फिल्म डेव्हलप होऊन संगणकावर उमटण्यासाठी किमान 4 ते 5 मिनिटांचा कालावधी लागतो. यामुळे रुग्णांना प्रतीक्षेसाठी रांगेत उभे राहावे लागते. या नव्या यंत्रामध्ये सेमी कंडक्टरवर आधारित एक्स-रे प्लेटचा वापर केल्यामुळे रुग्णाचा एक्स-रे काढता क्षणीच त्याचे चित्र संगणकावर उपलब्ध होते.
यामुळे दोन एक्स-रेमधील 5 मिनिटांचा कालावधी कमी होईल. शिवाय पूर्वीपेक्षा अत्यंत सुस्पष्ट एक्स-रे चित्र उपलब्ध होत असल्याने अचूक रोगनिदानासाठी त्याचा मोठा उपयोग होणार आहे.