कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
कोरोनामुळे राज्यातील बंद असणारी चित्रपटगृहे दि. 22 ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने कोल्हापुरातील थिएटरचा पडदा दीड वर्षानंतर उघडणार आहे; पण महाराष्ट्रातील सिंगल स्क्रीन थिएटर सुरू करण्याबाबत मात्र संभ—म कायम आहे.
कोरोनामुळे केंद्र सरकारने राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे बंद केली होती.
कोरोनाचे निर्बंध शिथिल करताना अन्य व्यापार, उद्योग सुरू केले गेले; पण चित्रपटगृहे व नाट्यगृहे सुरू करण्याला परवानगी नव्हती. नाट्यगृह सुरू करण्याबाबत आंदोलन झाल्यानंतर राज्य शासनाने दि. 5 नोव्हेंबरपासून नाट्यगृह सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला; पण रंगकर्मींनी तत्काळ नाट्यगृह सुरू करण्याची मागणी केली.
यासाठी दि. 29 रोजी रंगकर्मींनी मंत्रालयासमोर कलाबाजार मांडण्याचा इशारा दिला होता. नाट्यगृह दि. 22 रोजी सुरू होणार असली, तरी अद्याप आंदोलन करणार का नाही, याबाबतचा निर्णय जाहीर केलेला नाही.
शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दि. 22 ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे व नाट्यगृहे सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला. राज्यातील मल्टिप्लेक्स सुरू होतील; पण सिंगल स्क्रीन थिएटर मालकांनी शासनाकडे काही मागण्या केल्या आहेत. या मागण्या मान्य झालेल्या नाहीत.
त्यामुळे महाराष्ट्रातील सिने एक्झिबीटर्स असोसिएशनने सिंगल स्क्रीन थिएटर सुरू करण्याबाबत कोणताच निर्णय घेतलेला नाही. असोसिएशनने कोरेाना काळातील शासनाचे कर, वीज बिले, स्थानिक कर माफ करण्याची मागणी केली आहे. थिएटर बंद होते, तर हे कर कशासाठी लागू केले आहेत, यात सूट द्यावी, अशी मागणी केली आहे. शासनाने या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय जाहीर केला, तरच थिएटर सुरू राहण्याची शक्यता आहे.
मल्टिप्लेक्स थिएटर सुरू होतील; पण सिंगल स्क्रीन थिएटर बंदच राहण्याची शक्यता आहे. थिएटर जागेवर अन्य व्यवसाय करण्याला परवानगी मिळावी, यासाठी राज्यातील अनेक थिएटर मालक न्यायालयात गेले आहेत. महाराष्ट्र वगळता अन्य राज्यांत कोरोना काळात करामध्ये सवलती देण्यात आल्या आहेत. चित्रपटगृहे सुरू करण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे; पण राज्य संघटनेची बैठक होऊन यात निर्णय होणार आहे, असे कोल्हापूर जिल्हा सिने एक्झिबिटर्स असोसिएशनचे अध्यक्ष सूर्यकांत पाटील-बुद्धिहाळकर यांनी सांगितले.