कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : शिवाजी विद्यापीठाचा 58 वा दीक्षान्त समारंभ शनिवारी (दि.5 ) सकाळी 11 वाजता ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या समारंभास उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत विशेष अतिथी म्हणून तर ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. दिनकर एम. साळुंके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
कुलगुरू डॉ. शिर्के यांनी राष्ट्रपती सुवर्णपदक, कुलपती सुवर्णपदक प्राप्त स्नातकांच्या नावांची घोषणा केली. 2020-21 या शैक्षणिक वर्षात क्रीडा, बौद्धिक व कला क्षेत्र आणि एनसीसी, एनएसएस यामधील गुणवत्ता व व्यक्तिमत्त्व, शारीरिक आरोग्य, भाषा शुद्धता, सर्वसाधारण ज्ञान, वागणूक व नेतृत्व गुण यामध्ये आदर्श ठरल्याबद्दल विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अधिविभागात द्वितीय वर्षात शिकणार्या ऐश्वर्या आकाराम मोरे (मु.पो. वडरगे, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) या विद्यार्थिनीस शिवाजी विद्यापीठाचे राष्ट्रपती सुवर्णपदक जाहीर करण्यात आले. एम.ए. (हिंदी) परीक्षेत सर्वाधिक गुण मिळविल्याबद्दल सांगली येथील कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयाच्या स्वाती गुंडू
पाटील (मु.पो. दानोळी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) या विद्यार्थिनीस कुलपती सुवर्णपदक जाहीर झाले.
समारंभात 62 हजार 360 स्नातकांना पदवी प्रदान करण्यात येतील. यात विद्यार्थिनींची संख्या 32 हजार 520 (52.15 टक्के) आहे. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची संख्या 19 असून त्यात दोन पीएच.डी. धारक स्नातकांचा समावेश आहे. पीएच.डी.च्या 223 तर 116 पारिताषिके विद्यार्थ्यांना पोस्टाने पाठवली जातील. यावर्षी महाविद्यालयीन स्तरावरील पदवी प्रदान समारंभ होणार नाही. विद्यापीठाच्या 'शिव-वार्ता' यू ट्यूब वाहिनीवरून थेट प्रसारण केले जाईल. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक जी.आर. पळसे उपस्थित होते.
डॉ. दिनकर साळुंके आंतरराष्ट्रीय ख्यातीचे इम्युनॉलॉजिस्ट व स्ट्रक्चरल बायोलॉजिस्ट आहेत. सध्या इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनेटिक इंजिनिअरिंग अँड बायोटेक्नॉलॉजी, नवी दिल्ली येथे संस्थेचे संचालक आहेत.1988 मध्ये डॉ. साळुंके नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनोलॉजी, नवी दिल्ली येथे शास्त्रज्ञ म्हणून रूजू झाले. त्यांनी इम्युनॉलॉजीच्या क्षेत्रात मोठे संशोधन केले आहे. त्यांचे 130 शोधनिबंध प्रकाशित आहेत. विविध संसर्गांना शरीर कशाप्रकारे प्रतिकार करते, यावर त्यांचे संशोधनकार्य मूलभूत प्रकाश टाकणारे आहे. डॉ. साळुंके यांना राष्ट्रीय बायोसायन्स पुरस्कार, शांतिस्वरूप भटनागर पारितोषिक, रॅनबॅक्सी संशोधन पुरस्कार, जे.सी. बोस राष्ट्रीय फेलोशीप व जी.एन. रामचंद्रन सुवर्णपदक मिळाले आहे.