कोल्हापूर : दैनिक ‘पुढारी’ व डॉ.डी.वाय.पाटील हॉस्पिटल यांच्या वतीने डॉक्टर्स डे निमित्त आयोजित व्याख्यानमालेचा रोपट्याला पाणी देऊन प्रारंभ करताना डॉ. मोहित गुप्ता. यावेळी उपस्थित विजय जाधव, सुनंदा बहेनजी, डॉ. राकेशकुमार मुदगल, डॉ. संदीप पाटील. (छाया : पप्पू अत्तार) 
Latest

कोल्हापूर : योग्य आहार, व्यायाम, आराम हेच आनंदी जीवनाचे खरे सूत्र

Arun Patil

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : सध्याची जीवनशैली हीच अनेक आजारांची जननी आहे. यामुळे या जीवनशैलीत परिवर्तन करणे आवश्यक आहे. योग्य आहार, व्यायाम आणि आराम या त्रिसूत्रीने जीनवशैलीत परिवर्तन होईल. आनंदी जीवनाची हीच त्रिसूत्री असल्याचे मत नवी दिल्ली येथील जगद्विख्यात हृदयरोग तज्ज्ञ व प्रसिद्ध वक्ते डॉ. मोहित गुप्ता यांनी शुक्रवारी व्यक्त केले. दैनिक 'पुढारी' आणि डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल यांच्या वतीने डॉक्टर्स डेनिमित्त आयोजित व्याख्यानमालेत 19 वे पुष्प डॉ. गुप्ता यांनी 'मन, हृदय व शरीर कसे निरोगी ठेवाल' या विषयांवर गुंफले.

मार्केट यार्ड येथील खचाखच भरलेल्या शाहू सांस्कृतिक सभागृहात डॉ. गुप्ता यांनी अत्यंत ओघवत्या शैलीत, विविध उदाहरणे देत प्रात्यक्षिकांसह उपस्थितांना मंत्रमुग्ध केलेच; पण त्याबरोबर निरोगी आणि समृद्ध जीवनशैलीसाठी साध्या आणि सोप्या टिप्सही दिल्या.

'आय एम बिझी…' आणि 'आय हॅव नो टाईम…' हे दोन व्हायरस घेऊनच आपण जगत आलो आहे. आपल्या दिनचर्येमध्ये हा 'बिझी' शब्द जितका जास्त आहे, तितका आपला ताण वाढतो हे विज्ञानानेच सांगितले आहे. यामुळे आजपासूनच त्यातून 'बी' डिलिट' करून टाका आणि जीवनातला 'ईजी'नेस तेवढा ठेवा. सुख आणि आनंद यामध्ये फरक आहेच. भौतिक गोष्टीने सुख मिळेल; पण आंतरिक आनंद मिळवण्यासाठी मन:शांतीच गरजेची आहे. शरीरापेक्षा मन अधिक शक्तिशाली असते, त्याला सशक्त बनवण्याची गरज असते.
शरीरासाठी वेळ द्या

समस्यांचे कारण तुम्हीच आहात आणि त्यावरील उपायही तुम्हीच आहात. एका क्षणाचा आनंद मिळवण्यासाठी आपण अनेक अडचणीही निर्माण करत असल्याचे सांगत डॉ. गुप्ता म्हणाले, सध्याच्या जीवनशैलीमुळे आजारपणाचे प्रमाण वाढत चालले आहे. दरवर्षी 60 लाख व्यक्ती जीव गमावत आहेत. मधुमेह, तणाव, लठ्ठपणा अशा आजाराने 60 टक्क्यांहून अधिक नागरिक त्रस्त आहेत. हृदयरोग असलेल्या 18 ते 35 वयोगटातील रुग्णांचे प्रमाण वाढत आहे.

कामाचा ताणतणाव, वैयक्तिक ताणतणाव, कौटुंबिक परिस्थिती, योग्य आहार, व्यायाम आणि आरामाचा अभाव यामुळे हे प्रमाण वाढतच चालले आहे. आपल्या जीवनशैलीत परिवर्तन करण्याची गरज आहे. शरीराबरोबर मनाचेही परिवर्तन आवश्यक आहे. धैर्य, संयम आणि नियमितता याच्या जोरावर हे परिवर्तन होईल, त्यासाठी सर्वांनी संकल्प केला पाहिजे. त्यानुसार स्वत:च्या शरीरासाठी वेळ दिला पाहिजे, कृती केली पाहिजे, परिवर्तनाचा प्रारंभ स्वत:पासून केला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

मनालाही आरामाची गरज

डॉ. गुप्ता म्हणाले, शरीराप्रमाणे मनही साफ करता आले पाहिजे. मनाप्रमाणे भावना असते. त्यानुसारच व्यवहार होतो, कृती होते. त्यावर आपले भविष्य ठरते. मनाच्या विचारावर आपली जीवनशैलीही अवलंबून आहे. मन विचलित असले, दु:खी असले तर काम करण्याची इच्छा कमी होते. आजारी नसतानाही आजारी असल्यासारचे वाटते; पण शरीराला जखम असेल आणि आनंदाची बातमी मिळाली तर आपण आजारपण विसरून तो आनंद साजरा करतो. यामुळे शरीरापेक्षाही मन हे अधिक शक्तिशाली आहे. त्याकरिता योगा, मेडिटेशन नियमित करा. यामुळे मनाची सकारात्मकता वाढेल, त्यातून आपल्या जीवनशैलीला नवा आयाम मिळेल, सुंदर आणि समृद्ध अशा जीवनशैलीत परिवर्तन होईल, असा विश्वासही डॉ. गुप्ता यांनी व्यक्त केला. यानंतर उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे देत डॉ. गुप्ता यांनी शंकांचे निरसन केले.

मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला पाणी देत या व्याख्यानमालेला सुरुवात करण्यात आली. संयोजक डॉ. संदीप पाटील यांनी प्रास्ताविक आणि स्वागत केले. विक्रम रेपे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी दैनिक 'पुढारी'चे कार्यकारी संपादक विजय जाधव, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेशकुमार मुदगल, प्रजापिता ब—ह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाच्या सुनंदा बहन, सरव्यवस्थापक राजेंद्र मांडवकर आदी उपस्थित होते.

डॉ. गुप्ता यांच्या टिप्स

आहार : अयोग्य प्रकार, अयोग्य वेळ आणि अयोग्य पद्धतीचा आहार बंद करा. पिरॅमिडप्रमाणे आहार असू दे. सकाळी जादा, दुपारी कमी आणि रात्री त्याहीपेक्षा कमी. रात्री नऊ पूर्वी जेवण करा. फळे, सालाड जेवण्यापूर्वी सात-आठ मिनिटे आधी खा. पालेभाज्यांसह शाकाहारी आहारावर भर द्या. जादा मीठ असलेले पदार्थ टाळा, पॅकबंद ज्यूस टाळा. फळांचा रस काढा आणि लगेच घ्या. तेल ठराविक दिवसांनी बदलत राहा. एकदा तळण्यासाठी वापरलेले तेल पुन्हा त्यासाठी वापरू नका. त्याऐवजी भाजीसाठी वापरा.
लोणी, तूप याचा मर्यादित वापर करा. घरचे दही खा. रात्री चहा, कॉफी टाळा. धूम्रपान, तंबाखू खाणे सोडा.

व्यायाम : दररोज किमान तासभर चाला. वेळ नसेल तर जितके शक्य आहे तितके चाला, पण चाला. हळू चाला. जितका वेळ व्यायाम कराल, आयुष्यात तितकी वाढ होईल. योगा आणि मेडिटेशन करा. योगा आणि मेडिटेशनने मेंदूतील आनंदाचे हार्मोन्स वाढण्यास मदत होते. त्यातून निर्णय घेण्याची क्षमता वाढते. मनासाठी योगा, मेडिटेशन हा सर्वोत्तम व्यायाम आहे. यामुळे मनातील नकारात्मक विचार नाहीसे होतील. आयुष्य स्वर्गासारखे बनेल.

आराम : दररोज किमान 7 ते 8 तास झोप घ्या. लहान मुलांसाठी 8 ते 9 तास दररोज झोप पुरेशी. रात्री लवकर झोपा. झोपण्यापूर्वी 15-20 मिनिटे मोबाईल बघण्याचे टाळा. सकाळी उठल्यानंतरही काही वेळ मोबाईल बघू नका. त्याऐवजी योगा, मेडिटेशन करा. शरीराबरोबर मनालाही झोपेची गरज आहे. मनही थकलेले असते. त्यामुळे मनात राग, घृणा, स्पर्धा अशा बाबी असतात. त्या मेडिटेशनद्वारे बाहेर काढा. दुपारी झोप घेतली नाही तरी चालेल. घ्यायची असेल तर 10 ते 15 मिनिटे घ्या. शक्यतो त्या वेळेत मेडिटेशन करा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT