Latest

कोल्हापूर : मुख्याधिकारी, कनिष्ठ अभियंत्यासह चौघेजण ‘एसीबी’च्या जाळ्यात

Arun Patil

शिरोळ, पुढारी वृत्तसेवा : घराचा बांधकाम परवाना मंजुरीसाठी एक लाख 75 हजार रुपयांच्या लाचेची रक्कम स्वीकारताना शिरोळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अभिजित मारुती हराळे (वय 33, मूळ गाव भिलवडी, जि. सांगली, सध्या रा. शिरोळ, जि. कोल्हापूर), कनिष्ठ अभियंता संकेत हणमंत हंगरगेकर (28, सध्या रा. जयसिंगपूर, ता. शिरोळ, मूळ गाव उस्मानाबाद), लिपिक सचिन तुकाराम सावंत (रा. शिरोळ) आणि अमित तानाजी संकपाळ (42, रा. शिरोळ) या चौघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली.

या घटनेमुळे शिरोळसह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. यातील तक्रारदार यांची नंदीवाले वसाहत रोड, लक्ष्मीनगर येथे आठ हजार स्क्वेअर फूट जागा आहे. या जागेवर बांधकामाची मंजुरी घेण्यासाठी त्यांनी नगर परिषदेत अर्ज दाखल केला होता. बांधकाम परवाना मिळवण्यासाठी ते पालिकेकडे वारंवार हेलपाटे मारत होते.

दरम्यान, संकेत हंगरगेकर व सचिन सावंत यांनी परवाना फाईल पुढे पाठविण्यासाठी तक्रारदारांकडे एक लाख रुपयांची मागणी केली होती. तसेच मुख्याधिकारी अभिजित हराळे यांनी या प्रस्तावाला अंतिम मंजुरी देण्यासाठी 75 हजार रुपयांची मागणी केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची खातरजमा करून सोमवारी सापळा रचला.

सोमवारी नगरपालिकेची विशेष सभा असल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक नगरपालिकेच्या परिसरात ठिकठिकाणी थांबले होते. सभा संपल्यानंतर तक्रारदारांनी बांधकाम अभियंता संकेत हंगरगेकर व पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित हराळे यांच्या दालनात जाऊन बांधकाम परवाना मंजुरीबाबत विचारपूस केली.

फाईल मंजुरीसाठी द्यायची रक्कम कोणाकडे द्यायची, हे विचारले असता मुख्याधिकारी हराळे व कनिष्ठ अभियंता हंगरगेकर यांनी लिपिक सचिन सावंत यांच्याकडे रक्कम द्यावी, असे सांगितले. सावंत यांनी ही रक्कम अमित संकपाळ यांच्याकडे देण्यास सांगितले. त्यानुसार तक्रारदारांनी संकपाळ यांच्याकडे ठरलेली एक लाख 75 हजार रुपये रक्कम दिली.

लाच स्वीकारल्याची खात्री होताच लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलिस उपअधीक्षक सरदार नाळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अमित संकपाळ, लिपिक सचिन सावंत, कनिष्ठ अभियंता संकेत हंगरगेकर व मुख्याधिकारी अभिजित हराळे यांना लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून ताब्यात घेतले. त्यांना अधिक चौकशीसाठी येथील शासकीय विश्रामगृहात नेण्यात आले. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत जबाब घेउन पंचनामा करून शिरोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिस निरीक्षक नितीन कुंभार, उपनिरीक्षक संजीव बंबरगेकर, हवालदार विकास माने, मयूर देसाई, विष्णू गुरव, कॉन्स्टेबल रुपेश माने यांचा या पथकात समावेश होता.

अर्थसंकल्प अन् कारवाईचा दणका

शिरोळ नगरपालिकेचा सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास अर्थसंकल्प सादर करण्यासाठी विशेष सभा झाली. सभा होताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून चौघांना अटक केली. घटना समजताच नगरपरिषद परिसरात गर्दी झाली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT