Latest

ब्रेकिंग : कोल्हापूर महापालिका प्रभाग जाहीर; आरक्षण निश्चित

Arun Patil

कोल्हापूर ; सतीश सरीकर : कोल्हापूर महापालिका प्रशासनाने मंगळवारी प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध केली. प्रभागनिहाय लोकसंख्याही जाहीर करण्यात आली आहे. शहरातील लोकसंख्येनुसार अनुसूचित जाती प्रवर्गासाठी (एस.सी.) 12 जागा तर अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी (एस.टी.) 1 जागा आरक्षित राहणार आहे. उर्वरित 79 जागा सर्वसाधारण प्रवर्गाासाठी असतील. एकूण लोकसंख्या, जातनिहाय लोकसंख्या पाहता सर्व आरक्षणे निश्चित झाली आहेत.

राज्य शासनाच्या आदेशानुसार महापालिकेची निवडणूक त्रिसदस्य प्रभाग रचना पद्धतीनुसार होत आहे. परिणामी 31 प्रभाग झाले आहेत. यात शहरातून 92 नगरसेवक निवडून द्यावे लागणार आहेत. प्रत्येकी 3 नगरसेवकांचे 30 प्रभाग व 2 नगरसेवकांचा एक प्रभाग असणार आहे. प्रत्येक प्रभागात आरक्षणासाठी अ, ब, क या क्रमाने अंतर्गत रचना असेल.

त्यानुसार आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. पहिलीच निवडणूक आहे, असे गृहीत धरून प्रभाग रचना व आरक्षण निश्चित करावे, असे आयोगाने स्पष्ट आदेश दिले आहेत. त्यानुसार महापालिका प्रशासन शहरातील लोकसंख्येनुसार आरक्षण काढणार आहे. संबंधित प्रवर्गाची लोकसंख्या गुणिले शंभर भागिले प्रभागाची लोकसंख्या या आधारावर टक्केवारी काढण्यात येणार आहे.

ही टक्केवारी उतरत्या क्रमाने घेतली जाणार आहे. त्यानुसार अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 12 प्रभाग निश्चित केले जाणार आहेत. तर अनुसूचित जाती प्रवर्गासाठी एक प्रभाग निश्चित होणार आहे. प्रभाग रचनेवरील सूचना व हरकतींच्या सुनावणीनंतर महापालिका प्रशासन निवडणूक आयोगाकडून आलेल्या तारखेला जाती प्रवर्गानुसार आरक्षण जाहीर करणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे लक्ष…

राज्य शासनाने ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोणत्याही निवडणुका घेऊ नयेत, असा ठराव विधिमंडळात केला आहे. सर्व राजकीय पक्षांनी त्यास मंजुरी दिली आहे. परंतु राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या महापालिकांत ओबीसी प्रवर्गासाठी प्रभाग राखीव ठेवू नयेत, ते सर्वसाधारण प्रवर्गासाठी अधिसूचित करावेत, असे आदेशात म्हटले आहे. त्यानुसार ओबीसी आरक्षण वगळून निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. परंतु ओबीसी आरक्षणाविषयी 8 फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगानेही कोल्हापूर महापालिकेला पत्र पाठवून आरक्षणाची प्रक्रिया वगळून निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी, असे आदेश दिले आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांत महिलांना 50 टक्के आरक्षण आहे. त्यानुसार महापालिकेत 92 पैकी 46 जागा महिलांसाठी आरक्षित असतील. त्यात अनुसूचित जाती 12 (पैकी 6 महिला), अनुसूचित जमाती – 1 (पुरुष व महिलासाठी खुला), सर्वसाधारण प्रवर्ग : 79 (पैकी 40 महिला). (कोल्हापूर महापालिका)

92 जागांसाठी आरक्षण असे..

अनुसूचित जाती प्रवर्ग प्रभाग क्र.
1, 4, 5, 7, 9, 13, 15, 18, 19, 21, 28, 30 (यातील प्रत्येकी एका जागेवर आरक्षण)

अनुसूचित जमाती प्रवर्ग प्रभाग क्र. 2 (यातील एका जागेवर आरक्षण)

सर्वसाधारण प्रवर्ग प्रभाग क्र.
3, 6, 8, 10, 11, 12, 14, 16, 17, 20, 22, 23, 24, 25, 26, 27, 29, 31

कोल्हापूर महापालिका : नवी प्रभाग रचना कुणाच्या पथ्यावर?

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर शहरातील नगरसेवकांची संख्या 81 वरून एकदम 92 होत आहे. कोल्हापूर महापालिका सभागृहात नवीन तब्बल 11 नगरसेवकांची भर पडणार आहे. प्रशासनाने प्रारूप प्रभाग रचना तयार केल्यानंतर गेले काही दिवस राजकीय पक्षांसह इच्छुकांतून प्रभागाविषयी तर्कवितर्क लढविले जात होते. अखेर प्रभाग रचना मंगळवारी प्रसिद्ध झाली. महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना स्वतंत्रपणे रणांगणात उतरणार आहेत. भाजप-ताराराणी यांची आघाडीही मैदानात असेल. परिणामी नवी प्रभाग रचना कुणाच्या पथ्यावर पडणार, या चर्चेला उधाण आले आहे.

कोल्हापूर महापालिका सभागृहाची मुदत 15 नोव्हेंबर 2020 ला संपली आहे. 16 नोव्हेंबरपासून आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे प्रशासकपदाचा कार्यभार आहे. डिसेंबर 2020 मध्ये कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिका प्रशासनाने एक सदस्य प्रभाग रचना पद्धतीने प्रक्रिया सुरू केली होती.

प्रभाग रचना प्रसिद्ध करून आरक्षणही जाहीर केले होते. पुन्हा कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्याचे आदेश आले. परिणामी निवडणूक प्रक्रिया थांबली. राज्य सरकारच्या निर्णयानुसार महापालिकेची निवडणूक पहिल्यांदाच त्रिसदस्य प्रभाग रचना पद्धतीनुसार होत आहे.

2015 मध्ये सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूक स्वतंत्रपणे लढविली होती. निवडणुकीत काँग्रेसने 30 व राष्ट्रवादीने 14 जागा जिंकल्या होत्या. भाजपने 15 व ताराराणी आघाडीने 18 जागा मिळविल्या होत्या. शिवसेनेला 4 जागांवर समाधान मानावे लागले होते. काँग्रेसने राष्ट्रवादीबरोबर आघाडी करून महापालिकेवर सत्तेचा झेंडा फडकविला होता. तसेच शिवसेनेला सत्तेत सामावून घेतले होते. अशाप्रकारे महाराष्ट्रात पहिल्यांदा कोल्हापूर महापालिकेत महाविकास आघाडी अस्तित्वात आली होती. दोन वर्षांपूर्वी राज्यातही हाच प्रयोग होऊन महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले.

कोल्हापूर जिल्ह्यातील काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली लढविण्यात आल्या. काँग्रेसचे नेते व पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता. परंतु शिवसेनेला विचारात घेतले जात नसल्याचा आक्षेप शिवसैनिकांतून व्यक्त केला जात होता.

शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगूनही काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांना गोकुळमध्ये स्वीकृत संचालक म्हणून घेतलेले नाही. नुकत्याच झालेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत तर काँग्रेस-राष्ट्रवादीने भाजपशी आघाडी केली. शिवसेनेने थेट विरोधात दंड थोपटले होते.

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांना रणांगणात उतरविण्यात येणार आहे. सद्य:स्थितीत महाविकास आघाडीत दुफळी माजल्याचे चित्र आहे. या सर्व राजकीय घटनांचे पडसाद महापालिका निवडणुकीत उमटणार हे स्पष्ट आहे.

गेले वर्षभर राजकीय पक्षांसह इच्छुकांचे महापालिका निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. अखेर निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. प्रभाग रचना अस्तित्वात आल्याने इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहेत.

अनेक माजी नगरसेवक व इच्छुकांनी थेट उमेदवारी जाहीर केली आहे. पक्षाच्या उमेदवारीची वाट न पाहता प्रचाराचा नारळ फोडून मतदारांच्या गाठीभेटीही सुरू केल्या आहेत. पक्षाची उमेदवारी मिळाली तर ठीक, अन्यथा अपक्ष म्हणून शड्डी ठोकला जात आहे. निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांनी रणशिंग फुंकले आहे. इच्छुकांपैकी अनेकजण नगरसेवकपदाचे स्वप्न पाहात आहेत. त्यातील अनेकांनी सोशल मीडियावर नारळ फोडून प्रचाराची सुरुवातही केली आहे.

कही खुशीं… कहीं गम…

महापालिका निवडणुकीसाठी पहिल्यांदाच त्रिसदस्य प्रभाग रचना अस्तित्वात आली आहे. अधिकार्‍यांसह शहरवासीयांनाही प्रभाग रचना नवी आहे. 92 नगरसेवकपदांचे 31 प्रभागांत विभाजन करावे लागल्याने प्रभाग मोठे झाले आहेत. भौगोलिक सीमा आणि प्रगणक गट याच्या आधारे प्रभाग रचना तयार करण्यात आली आहे. परिणामी काही प्रभागातील गल्ली, कॉलनी एक-दुसर्‍या प्रभागात गेल्या आहेत.

काही माजी नगरसेवक व इच्छुकांनी बांधलेल्या आडाख्यांना सुरूंग लागल्याने ते काळजीत आहेत; तर अनेकांना प्रभाग रचना हवी तशी झाल्याने लॉटरी लागल्याच्या आनंदात संबंधित आहेत. त्यांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. अशाप्रकारे प्रभाग रचनेविषयी कहीं खुशी… कहीं गम… असे वातावरण आहे. यात काही मातब्बरांना धक्का बसला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT