कोल्हापूर ; सतीश सरीकर : तब्बल 18 ते 20 हजार लोकसंख्येचा एकेक प्रभाग. त्यात 15 ते 16 हजार मतदार. या टोकापासून त्या टोकापर्यंत भला मोठा भाग. अशा पद्धतीने महापालिका निवडणुकीसाठी कोल्हापूर शहरात 31 प्रभाग तयार झाले आहेत. इच्छुक उमेदवारांना प्रभाग पालथा घालताना अक्षरशः नाकीनऊ येणार आहे. दोन-तीनवेळा निवडून आलेल्यांचे ठीक; पण अपक्ष उमेदवारांची दमछाक होणार आहे. त्रिसदस्य प्रभागाने प्रस्थापितांना बळ मिळणार असून, नवख्या उमेदवारांना घाम फुटणार आहे. पक्षीय राजकारणाला बळकटी येणार आहे.
राजकीय पक्षांसह इच्छुक उमेदवार गेले वर्षभर महापालिका निवडणुकीच्या प्रतीक्षेत होते. अखेर प्रभाग रचना प्रसिद्ध झाल्याने निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. राजकीय पक्षांसह इच्छुकांत धामधूम सुरू झाली आहे. कोणत्या भागातील मतदार आपले समर्थक किंवा इतर मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी काय करता येईल, याबाबत चाचपणी केली जात आहे.
मतदारांची गोळाबेरीज करून निवडून येण्यासाठी कोणती व्यूहरचना करावी लागेल, यासाठी प्रभाग रचनेची माहिती घेतली जात आहे. अनेकजण प्रभाग रचना आणि गल्ली, कॉलनी, मतदार यांचा अंदाज घेत आडाखे बांधत आहेत. प्रभागात सर्वत्र पोहोचण्यासाठी फिल्डिंग लावली जात आहे.
दोन-चारवेळा निवडून आलेले किंवा घराणेशाही निर्माण झालेल्या माजी नगरसेवक, माजी पदाधिकारी यांच्यासाठी मोठा प्रभाग सहजसोपा ठरणार आहे. कारण, यापूर्वी काहीवेळा प्रभाग फुटल्याने आजूबाजूच्या प्रभागात त्यांना मानणारा वर्ग किंवा त्यांचे नाव मतदारापर्यंत पोहोचलेले आहे. त्याच्या जीवावर त्यांना प्रचार करताना फारशी कसरत करावी लागणार नाही.
फक्त नव्याने तरुण मंडळे, तालीम संस्था, मतदारांना सांभाळावे लागणार आहे. परंतु; गेल्या पाच वर्षात ठराविक प्रभाग लक्ष्य करून नगरसेवकपदापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करणार्यांची पंचाईत झाली आहे. दोन-तीन हजार मतदारांनी निवडून येता येणार नाही हे कळून चुकले आहे. परिणामी अपक्ष व नगरसेवकपदाचे स्वप्न पाहणारी हौशी मंडळी आता निवडणुकीपासून लांब राहात आहेत.
कोल्हापूर शहरात यापूर्वी एक प्रभाग रचना पद्धतीने निवडणुका होत होत्या. दोन-चार गल्ल्या, दीड-दोन हजारांचे एकगठ्ठा मतदान किंवा चार तरुण मंडळे हाताशी धरली तरी निवडणूक सोपी जात होती. खर्चही कमी येत होता. 6 ते 8 हजार लोकसंख्या आणि त्यात सुमारे 5 ते 6 हजार मतदार असल्याने रुबाबही दांडगा होता. परंतु; आता अशाप्रकारे राजकारण करणार्या माजी नगरसेवकांची चांगलीच पंचाईत झाली आहे. पूर्वीच्या तुलनेत तिपटीने मोठ्या झालेल्या प्रभागात जनसंपर्क वाढविण्याबरोबरच खर्चही करावा लागणार आहे.