कोल्हापूर : पंचगंगा नदीपात्रात असा कचरा साचला आहे.  
Latest

कोल्हापूर : मरणासन्न पंचगंगेला वाचवणार कोण?

Arun Patil

कोल्हापूर ; आशिष शिंदे : सांडपाणी आणि कारखान्यांतील रासायनिक पाण्यासह प्रदूषणाची नेहमीची कारणे घेऊनच पंचगंगा वाहत आहे. 2 डिसेंबर 2021 रोजी पंचगंगेच्या पाण्याला मोठ्या प्रमाणात फेस आला होता. दोन महिने उलटले तरी याचे ठोस कारण प्रदूषण नियंत्रण मंडळाला मिळालेले नाही. याहून धक्‍कादायक बाब म्हणजे त्या दिवशी तेथील पाण्याची स्थिती उत्तम होती, त्यामध्ये कोणताही बदल झाला नसल्याचे एमपीसीबीच्या एका अहवालामध्ये सांगण्यात आले आहे.

पंचगंगा प्रदूषण नियंत्रणासाठी कोणतीही ठोस पावले उचलली जात नसल्याने नदीच्या पाण्यावर पिण्यासाठी अवलंबून असलेल्या जनतेचे आरोग्य बिघडत आहे. जलचर तडफडून मृत्युमुखी पडत आहेत. पंचगंगेच्या पाण्याला 2 डिसेंबर 2021 मोठ्या प्रमाणात फेस आला होता. यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने पाण्याचे नमुनेे घेण्यात आले होते.

याचा अहवाल दीड महिन्यानंतर आला. मात्र, अहवालानंतरही पाण्याला फेस का आला, याचे ठोस कारण समजू शकले नसल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांनी सांगितले. याउलट अहवालानुसार पाण्याचा पीएच, टीडीएस, टर्बाइडिटी उत्तम होती.

पंचगंगा घाटावरती दररोज मोठ्या प्रमाणात निर्माल्य, कचरा टाकला जात आहे. राजाराम बंधार्‍याजवळ पाण्याला हिरवा तवंग आला आहे. येथे सांडपाणी थेट नदीपात्रात सोडले जात आहे. यामुळे पाण्याला दुर्गंधी येत असल्याने नागरिकांमधून तीव— नाराजी व्यक्‍त होत आहे.

ऑक्सिजन का कमी झाला?

पंचगंगा नदीपात्रामध्ये 20 जानेवारी 2022 रोजी मोठ्या प्रमाणामध्ये मृत माशांचा खच पाहायला मिळाला होता. पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्यामुळे या माशांचा मृत्यू झाल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्राथमिक अहवालातून समोर आले होते. मात्र, पाण्यातील ऑक्सिजन का कमी झाला, याचे ठोस कारण अद्याप समजू शकले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT