कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : प्रतिस्पर्धी संघावर गोल मारण्यासाठी खेळाडूंमध्ये सुरू असणारी चढाओढ, गोलक्षेत्रातील खोलवर चढायागणिक फुटबॉलप्रेमींमध्ये सुरू असणारी घालमेल, गोल मारल्यानंतरच्या आनंदोत्सवात टाळ्या-शिट्ट्यांसह जयघोष असे उत्साही वातावरण पुन्हा एकदा छत्रपती शाहू स्टेडियममध्ये पाहायला मिळाले. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे तब्बल दोन वर्षांनंतर गुरुवारी सामने सर्वांसाठी पाहण्यास खुले करण्यात आले. याचा लाभ शेकडो आबालवृद्ध फुटबॉलप्रेमींनी आवर्जून घेतला.
फुटबॉल हंगाम काही दिवसांपूर्वीच सुरू झाला. दरम्यान, राज्य सरकारने कोल्हापूरसह 14 जिल्हे निर्बंधमुक्त केले आहेत. यामुळे क्रीडा क्षेत्रही पूर्ण क्षमतेने सुरू झाल्याने फुटबॉल सामनेही सर्वांना पाहण्यास खुले करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. फुटबॉल हंगाम काही दिवसांपूर्वी विनाप्रेक्षक सुरू करण्यात आला होता. फुटबॉलप्रेमींना सामने घरबसल्या मोबाईलवर पाहता यावे यासाठी ऑनलाईन प्रक्षेपण करण्यात आले होते.
मात्र प्रत्यक्ष सामने पाहता येत नसल्याने फुटबॉलप्रेमी अक्षरश: बेचैन होते. लहान मुले तर स्टेडियमच्या सभोवती असणार्या लहान-लहान झरोक्यातून सामने पाहण्यासाठी कसरत करताना दिसत होते. अखेर प्रशासनाच्या सूचनेनुसार कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनने (केएसए) फुटबॉल सामने पाहण्यास खुले करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे तमाम फुटबॉलप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोरोना नियमांचे पालन
प्रशासनाच्या सुरक्षिततेच्या आवाहनानुसार मास्क व सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब सक्तीचा आहे. सामने पाहायला येणार्या फुटबॉलप्रेमींनी मास्क व सोशल डिस्टन्सिंगचा वापर करून सर्वांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन 'केएसए'चे सचिव माणिक मंडलिक यांनी पत्रकाद्वारे केले आहे.