पुणे : पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर-पुणे मेट्रो पुणे-कोल्हापूर आणि पुणे-सोलापूर ही शहरे मेट्रोने जोडण्याची घोषणा केंद्रीय भुपृष्ठ आणि जल वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी केली. पुणे-बंगळूर एक्स्प्रेस वे याच वर्षी बांधण्यास सुरुवात करीत असून, त्यासाठी 40 हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत. त्यालगत जुळे पुणे वसवावे, अशी सूचनाही ना. गडकरी यांनी केली.
सिंहगड रस्त्यावर बांधण्यात येणार्या उड्डाणपुलाचे भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते राजाराम पुलाजवळ झालेल्या कार्यक्रमात करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, सर्व आमदार या वेळी उपस्थित होते.
गडकरी म्हणाले, पुणे-बंगळूर द्रुतगती महामार्ग (एक्स्प्रेस वे) हा पूर्णपणे नवीन मार्ग आहे. पुण्यापासून कामाला सुरुवात होत असून फलटण, बेळगावच्या बाहेरून तो थेट बंगळूरला पोहोचेल. या कामाचा आराखडा तुम्हाला दाखवतो. रस्ते आम्ही बांधतो आणि राजकीय नेते लगतच्या जागा विकत घेतात. अजितदादा, तुम्ही यात पुढाकार घ्या. या रस्त्यालगत नवीन पुणे वसवा. मेट्रो, रस्त्याने ते पुण्याला जोडा. पुणे कंजस्टेड झाले आहे. गर्दी, वाहतुकीची कोंडी होत असल्याने मोठ्या शहरांचे विकेंद्रीकरण करण्याशिवाय पर्याय नाही. या कामात मी मदत करू शकतो. कारण पुणे हे वेगाने विकसित होणारे शहर म्हणून पुढे येत
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गाचे कामही सुरू होत असून त्यासाठी भूमिपूजनाचे दोन कार्यक्रम करावेत, त्याला मी येईन. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्याशी बोलून कार्यक्रम ठरवा, असे त्यांनी सुचविले. पालखी मार्गासाठी 12 हजार कोटी रुपये खर्च करण्यात येतील. सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूल दुमजली करता येईल. त्यासाठी खर्चही वाढणार नाही. त्याबाबत महापालिका आयुक्तांशी मी बोललो आहे. नागपूरला या पद्धतीने आम्ही कामे केली आहेत, असे गडकरी म्हणाले.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, पालखी मार्गासाठी भूसंपादनाचे काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच कामाला प्रारंभ होईल. महाराष्ट्रात भूसंपादनासाठी अन्य राज्याच्या तुलनेत अधिक खर्च येत आहे. एक एकर जागेसाठी 18 कोटी रुपये द्यावे लागले. त्यामुळे यातून व्यवहार्य मार्ग न काढल्यास मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागेल. यावेळी चंद्रकांत पाटील, बापट, डॉ. गोर्हे, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर यांचीही भाषणे झाली. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी गेल्या पाच वर्षांत पुण्यात केलेल्या विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला. स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी आभार मानले.
पुण्यात विकासकामांच्या निधीसाठी फ्लेक्स फंड गोळा केल्यास मोठी रक्कम जमा होईल, अशी सूचना खासदार गिरीश बापट यांनी करताच तेथे हशा पिकला. फ्लेक्सऐवजी त्यांच्याकडून निधी घ्या व त्यांची नावे त्या प्रकल्पातील विटांवर लिहा, असे त्यांनी सुचविले. त्यांच्या वक्तव्याचा धागा पकडीत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे म्हणाल्या, जास्तीत जास्त फ्लेक्स तुमचेच लागलेले असतात. त्यामुळे तुमच्याच खिशात हात घालावा लागेल.
रेल्वे मार्गावरील मेट्रोने पुण्याहून कोल्हापूर, सोलापूर, नगर, बारामती, लोणावळा ही शहरे जोडता येतील. ही आठ डब्यांची मेट्रो ताशी 140 किलोमीटर वेगाने धावेल. पुणे-कोल्हापूर आणि पुणे-सोलापूर हे अंतर अवघ्या तीन तासांत कापता येणार आहे. शंभर मेट्रो खरेदी करण्यासाठी नोंदविल्या असून त्या खासगी गुंतवणुकीच्या माध्यमातून चालविल्या जातील, असे गडकरी यांनी सांगितले.