कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : जुलै महिन्यात सातत्याने बरसणार्या पावसाने उघडीप दिल्यामुळे गणेश मूर्तींच्या कामास वेग आला आहे. यामुळे कुंभारवाड्यांमध्ये मूर्ती निर्मितीची रेलचेल दिवस-रात्र सुरू झाली आहे. दरम्यान, तालीम संस्था व तरुण मंडळांनीही सार्वजनिक गणेशोत्सवाची तयारी आतापासूनच सुरू केली आहे. पाऊस नसल्याने त्यांचा वेगही वाढला आहे.
कोरोनामुळे गेली दोन वर्षे इतर सण-उत्सवाप्रमाणेच गणेशोत्सवही साधेपणाने व प्रतीकात्मक पद्धतीने साजरा करण्यात आला. मात्र, यंदा कोरोनाचा कहर कमी झाल्याने निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होणार आहे. राज्य शासनानेही याला दुजोरा दिला आहे. यामुळे गणेश भक्तांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे.
उर्वरित दिवसांत रंगकामावरच भर
यंदाचा गणेशोत्सवाची सुरुवात दि. 31 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थीने होत आहे. याला सुमारे महिन्याभराचा कालावधी असला, तरी याची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. कुंभार बांधवांकडून प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे काम 80 टक्क्यांपर्यंत पूर्ण करण्यात आले आहे. शाडूच्या मूर्तींना वेळ लागत असल्याने तीही कामे उरकण्यावर भर आहे. पावसाने उघडीप दिल्याने आणि चटके बसणारे ऊन पडल्याने शाडूच्या मूर्तींचे कामे पूर्ण करण्यावर कुंभार बांधवांचा भर आहे. यासाठी कुंभार गल्ल्यांमध्ये अबालवृद्ध कामाला लागले आहेत. उर्वरित दिवसांत रंगकाम करावे लागणार असल्याने नव्याने येणार्या मूर्तींची ऑर्डर घेणे बंद करण्यात आल्याचे कुंभार व्यावसायिकांनी सांगितले.