दोनवडे/कसबा बीड : पुढारी वृत्तसेवा
पाडळी खुर्द (ता. करवीर) येथे गुरुवारी सकाळी 7.30 च्या सुमारास गवा निदर्शनास आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले.
बोंद्रेनगरकडे जाणार्या रस्त्यावर सूर्यवंशी यांच्या बंगल्याजवळ प्रथम हा गवा दिसला. नागरिकांनी हुसकावल्यानंतर तो उसाच्या शेतात गेला.
गव्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले. पाडळी खुर्द ते बोंद्रेनगर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये-जा असते. शिरोली, कसबा बीड, कोगे परिसरातील लोक याच मार्गावरून जातात. हा गवा बालिंगेच्या दिशेने गेला आहे.
करवीर तालुक्यातील कसबा बीड येथील प्रमुख मार्गावर बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास तरुणांना गवा दिसला. येथील ऋषीकेश भोपळे, संदेश मगदूम व अक्षय खांडेकर हे बुधवारी कोल्हापूरहून गावाकडे जात होते. महे-कसबा बीड पुलाच्या दरम्यान त्यांना गवा दिसला.
गवा कोगे गावाच्या दिशेने गेल्याचे तरुणांनी सांगितले. परिसरात गवा आल्याचे समजल्याने ग्रामस्थ व शेतकर्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.