कोल्हापूर, सुनील सकटे : राज्यात जल आणि औष्णिक वीजनिर्मितीस पर्याय म्हणून सुरू केलेल्या सौरऊर्जा योजनेतून जिल्ह्यात पाच महिन्यांत तब्बल दोन कोटी 82 लाख 63 हजार 976 युनिट वीजनिर्मिती केली आहे. महावितरणच्या नेट मीटरिंग योजनेस जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे.
नेट मीटरिंगसाठी जिल्ह्यात 2 हजार 214 ग्राहकांनी सौरऊर्जा उत्पादन सुरू केले आहे. या ग्राहकांकडून 42 हजार 596.92 किलोवॅटनिर्मिती शक्य आहे. या ग्राहकांनी एप्रिल 2022 मध्ये 64 लाख 1 हजार 650 युनिट वीजनिर्मिती केली आहे, तर मे महिन्यात 65 लाख 43 हजार 629 युनिट, जून महिन्यात 50 लाख 16 हजार 993 युनिट, जुलै महिन्यात 54 लाख 1 हजार 129 युनिट, तर ऑगस्ट महिन्यात 48 लाख 99 हजार 775 युनिट वीजनिर्मिती केली आहे.
सौरछताद्वारे वीजनिर्मितीच्या संधीचा लाभ घ्या
सौरऊर्जा हा एक अपारंपरिक व स्वच्छ ऊर्जेचा अक्षय्य स्रोत आहे. या स्रोताचा पुरेपूर वापर ऊर्जासमृद्ध होण्यासाठी मोलाचा ठरणार आहे. आपल्या घराच्या छतावर सौरसंच (सोलार रूफटॉप) उभारून वीजनिर्मितीची संधी उपलब्ध आहे. घरगुती, समूह गृहनिर्माण संस्था व निवासी कल्याणकारी संघटना ग्राहकांना केंद्र सरकारचे 40 टक्क्यांपर्यंत अनुदानही मिळते. या योजनेचा इच्छुक घरगुती ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे महावितरणचे आवाहन आहे.
या अनुदानित योजनेतून जिल्ह्यात 157 घरगुती ग्राहकांनी सोलर रूफटॉप यंत्रणा कार्यान्वित केली आहे. या ग्राहकांकडून 588 किलोवॅट वीजनिर्मिती करण्यात येते, तर 284 ग्राहकांची 833 किलोवॅट क्षमतेची यंत्रणा बसविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जा विभागाच्या सोलार रूफटॉप टप्पा 2 अंतर्गत घरगुती ग्राहकांना 1 ते 3 किलोवॅटपर्यंत (केडब्ल्यू) सौरछत संच/सोलार रूफटॉपकरिता 40 टक्के, तर पुढील 3 पेक्षा अधिक ते 10 किलोवॅटपर्यंत 20 टक्के अनुदान आहे. सामूहिक वापरासाठी 500 किलोवॅटपर्यंत मात्र प्रत्येक घरासाठी 10 किलोवॅट मर्यादेत समूह गृहनिर्माण संस्था व निवासी कल्याणकारी संघटना ग्राहकांना 20 टक्के अनुदान मिळणार आहे. सौरछत संच/सोलार रूफटॉप अनुदानासाठी प्रतिकिलोवॅटप्रमाणे संचाचे मूलभूत दर पुढीलप्रमाणे निश्चित केले आहेत. 1 ते 3 किलोवॅटसाठी 41,400 रुपये, 3 ते 10 किलोवॅटपर्यंत 39,600 रुपये; तर 10 ते 100 किलोवॅटसाठी 37,000 रुपये आणि 100 ते 500 किलोवॅटसाठी 35,886 रुपये दर आहेत. महावितरण नेट मीटरिंगद्वारे वर्षअखेर ग्राहकांकडून शिल्लक वीज विकत घेते. स्वयंनिर्मित वीज वापरामुळे वीज बिलात बचत होऊन सोलार रूफटॉपसाठी केलेला खर्च सुमारे 3 ते 5 वर्षांत निघू शकतो. या योजनेची संपूर्ण माहिती व ऑनलाईन अर्जाची सोय, मार्गदर्शक तत्त्वे, एजन्सी निवडसूची, शंका-समाधान आदी माहिती महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावरील https:// www.mahadiscom.in या लिंकवर उपलब्ध आहे.