शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांची तडकाफडकी बदली 
Latest

कोल्हापूर : पगार नसल्याने मनपा कर्मचाऱ्यांचा दिवाळीत शिमगा

अमृता चौगुले

कोल्हापूर; सतीश सरीकर : वर्षातील सर्वात मोठा मांगल्याचा सण असलेल्या दिवाळीसाठी अवघी करवीरनगरी सज्ज झाली आहे. खासगी, सरकारी कर्मचार्‍यांचे पगार आणि अनेकांच्या वार्षिक भिशी फुटल्याने खरेदीला उधाण आले आहे. परंतु, पगार झाला नसल्याने कोल्हापूर महानगरपालिका मधील सुमारे चार ते पाच हजार कर्मचार्‍यांच्या घरात ऐन 'दिवाळीत शिमगा' अशी अवस्था झाली आहे.

कोल्हापूर महानगरपालिका मधील तृतीयश्रेणी कर्मचार्‍यांच्या हातावर कुटुंबासह दिवाळी साजरी करण्यासाठी चार हजार रुपये अ‍ॅडव्हान्स टेकविण्यात आला आहे; पण या तुटपुंज्या रकमेत दिवाळी साजरी करायची कशी? असा उद्विग्न सवाल कर्मचार्‍यांतून उपस्थित केला जात आहे. महापालिका प्रशासन व कर्मचारी संघ यांच्याविषयी तीव— संताप व्यक्त केला जात आहे. बघ्याची भूमिका स्वीकारल्याने कर्मचारी संघाचे पदाधिकारी महापालिका प्रशासनाच्या बाजूने की, कर्मचार्‍यांच्या बाजूने, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कोल्हापूर महानगरपालिका मधील वेगवेगळे तब्बल 54 विभाग आहेत. यात घनकचरा विभाग, आरोग्य विभाग, पवडी, पाणीपुरवठा, स्मशानभूमीतील कर्मचारी यांच्यासह विविध विभागांचा त्यात समावेश आहे. महापालिका कर्मचार्‍यांना कोणत्याही तारखेला दिवाळी असली तरी पगार आणि अ‍ॅडव्हान्स (तसलमात) मिळत होता. परिणामी, वर्षभर रस्त्यावर झाडू मारणे, गटार काढणे, पाणी सोडणारे चावीवाले, शौचालय साफ करणार्‍या कर्मचार्‍यांच्या घरात दिवाळीचे चार दिवस अगदी आनंदात जात होते. परंतु, यंदा पहिल्यांदाच त्यात खंड पडला.

महापालिका कर्मचार्‍यांच्या घरात दिवाळीच्या खरेदीचे अन् फराळाचे सुखसमाधान कुठेच दिसत नसल्याचे चित्र आहे. महापालिका प्रशासनाने दिवाळी अ‍ॅडव्हान्स म्हणून चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यांना साडेबारा हजार, तर तृतीयश्रेणी व रोजंदार कर्मचार्‍यांना चार हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, गगनाला भिडलेल्या महागाईच्या काळात चार हजारांत कुटुंबीयांसह दिवाळी साजरी कशी होऊ शकते?

कर्मचारी संघाच्या पदाधिकार्‍यांचे 'हाताची घडी अन् तोंडावर बोट'!

2021 हे वर्ष उजाडले, त्याचवेळी दिवाळी किती तारखेला आहे, ते स्पष्ट झाले होते. महापालिका प्रशासनाने दिवाळी सणासाठी कर्मचार्‍यांना वेळेवर पगार मिळेल याची व्यवस्था करणे आवश्यक होते; पण त्यादृष्टीने प्रशासनाने काहीच पावले उचलली नाहीत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन व कर्मचारी संघात काही दिवसांपूर्वी बैठक झाली. त्यात कर्मचारी संघाने कोणत्याही स्थितीत कर्मचार्‍यांना पगार मिळावा, अशी आग्रही भूमिका घेणे गरजेचे होते. परंतु, तसे न करता कर्मचारी संघाने नरमाईची भूमिका स्वीकारली. ऐन दिवाळीसारख्या सणाला कर्मचार्‍यांच्या हातात पगार नाही, तरीही कर्मचारी संघाने हात झटकले आहेत. कर्मचारी संघाच्या पदाधिकार्‍यांनी 'हाताची घडी अन् तोंडावर बोट' असे धोरण स्वीकारल्याने कर्मचार्‍यांतून संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT