Latest

कोल्हापूर : डीजेचा जोर अन् जीवाला घोर

Arun Patil

कोल्हापूर ; सतीश सरीकर : यंदाचा गणेशोत्सव निर्बंधमुक्‍त झाल्याने तरुणाईच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. गेले चार दिवस कोल्हापूरकरांना त्याची प्रचिती येत आहे. साऊंड सिस्टीम म्हणजेच डीजेने तरुणाईला अक्षरशः वेड लावले आहे. कानठळ्या बसवून छातीचे ठोके वाढविणार्‍या डीजेचा त्रास सामान्यांना सहन करावा लागत आहे. ध्वनिप्रदूषणाचा चिमुकली बाळं आणि ज्येष्ठ नागरिकांवर गंभीर दुष्परिणाम होत आहे. 'डीजेचा जोर अन् जीवाला घोर' अशी अवस्था कोल्हापूरकरांची झाली आहे. परिणामी, साऊंड सिस्टीमच्या आवाजाला मर्यादेचा लगाम घालायलाच हवा, अशी चर्चा शहरवासीयांत सुरू आहे.

उंची सेंटिमीटरमध्ये आणि वजन किलोग्रॅममध्ये मोजतात. त्यानुसार आवाज डेसिबलमध्ये मोजला जातो. साधारणतः 80 डेसिबलच्या पुढे आवाजाची क्षमता गेल्यास नागरिकांना त्याचा त्रास जाणवू लागतो. तुम्ही कितीवेळ हा आवाज ऐकता त्यावर त्याच्या त्रासाची तीव्रता वाढते. कानाच्या पडद्याला इजा आणि केशतंतू निकामी होऊ शकतात. छातीत धडधड आणि रक्‍तदाब वाढून प्रसंगी चक्‍करही येऊ शकते. कोल्हापुरात गणेशोत्सवात सध्या लावण्यात येणारी साऊंड सिस्टीम 100 डेसिबलच्या पुढे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी काही मंडळांच्या सिस्टीमचा आ?वाज 120 ते 140 डेसिबलपर्यंतही गेल्याचे सांगण्यात येत आहे. अशाप्रकारे मंडळांनी अनंत चतुदर्शीची 'झलक' दाखविली आहे. त्या दिवशीच्या मिरवणुकीत साऊंड सिस्टीमचा आवाज काय होईल, याचा मिरवणूक मार्गावरील कुटुंबीयांनी आतापासूनच 'धसका' घेतला आहे.

मोठ्या साऊंड सिस्टीमच्या आवाजाने 2015 मध्ये महाद्वार रोडवर एका इमारतीची गॅलरी कोसळली होती. त्यातील एका जखमीला काही दिवसांनंतर जीव गमवावा लागला होता. त्यामुळे गणेशोत्सवातील आनंद द्विगुणित झाला पाहिजे; पण इतरांना त्रास होऊ नये, याचीही दक्षता घेतली पाहिजे. पोलिसांनीही कानावर हात ठेवत बघ्याची भूमिका घेतल्याचे चित्र आहे. परिणामी, सामान्य नागरिकांना 'तोंड दाबून बुक्क्यांचा मार' अशी अवस्था झाली आहे. मंडळांनी तारतम्य बाळगून सण साजरा करावा, अशी अपेक्षा व्यक्‍त केली जात आहे. पोलिसांनीही काही अतिउत्साही कार्यकर्त्यांवर नियंत्रण आणण्यासाठी प्रसंगी 'कणखर' भूमिका घेण्याची आवश्यकता आहे.

स्वयंशिस्त पाळा : बलकवडे

साऊंड सिस्टीमच्या आवाजाची मर्यादा ओलांडणार्‍यांवर पोलिस कारवाई होईलच; परंतु मंडळाच्या कार्यकर्त्यांनीही सद्सद्विवेकबुद्धीने गणेशोत्सव उत्साहात साजरा करावा. उत्सव साजरा करणारे आणि बघायला जाणारे सर्वजण कोल्हापूरकरच आहेत. आपल्याच लोकांना त्रास होईल अशा वाद्यांचा वापर करू नये. काही समाजकंटक कार्यकर्त्यांमुळे महिला, मुली, ज्येष्ठ नागरिक आदी गणेशोत्सव आणि देखावे पाहण्यापासून वंचित राहू नयेत, याची काळजी मंडळांनी घ्यावी. आपण सर्वजण कोल्हापूरकरच आहोत याचे भान ठेवून स्वयंशिस्त पाळावी. पारंपरिक वाद्यांचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा पोलिसप्रमुख शैलेश बलकवडे यांनी केले आहे.

तरुणाईवर रंगीबेरंगी लाईट अन् गणेशमूर्ती अंधारात

कोल्हापूर शहरात गेल्या चार दिवसांपासून गणेशमूर्ती प्रतिष्ठापनेसाठी नेताना मिरवणुका निघत आहेत. बहुतांश मिरवणुका रात्रीच्या वेळी जात आहेत. राजारामपुरीत गणेश चतुर्थीदिवशी भव्य मिरवणूक काढण्यात आली. हजारो तरुण बेधुंद होऊन साऊंड सिस्टीमच्या गाण्यावर थिरकत होती. रंगीबेरंगी लाईटचे झोत आभाळात झेपावत होते. त्यावेळी गणेशमूर्ती मात्र अंधारात होत्या. जल्‍लोष साजर्‍या करणार्‍या तरुणाई लाईटने उजळून निघत होती; मात्र गणेशमूर्ती अंधारात होती.

कानाचे बाह्यकर्ण, मध्यकर्ण आणि अंतर्कर्ण असे तीन भाग असतात. बाह्य आणि मध्यकर्णाच्या मध्ये कानाचा पडदा असतो. मोठ्या आवाजाने त्याला छिद्र पडू शकते. मध्यकर्णात तीन हाडांची साखळी असते. मोठ्या आवाजाने हाडांची साखळी सुटू शकते. तसेच धोका पोहचून ऐकू येण्याची क्षमती कमी होते. अंतर्कर्णातील केशतंतू मोठ्या आवाजाने कायमचे निकामी होऊ शकतात. त्यामुळे आयुष्यभराचा बहिरेपणा मोठ्या साऊंड सिस्टीमच्या जास्त डेसिबलमुळे येऊ शकतो.
– डॉ. अजित लोकरे, विभागप्रमुख, कान, नाक, घसा विभाग, सीपीआर

मिरवणुकीत तरुण मंडळांकडून वापरल्या जाणार्‍या लेसर लाईटमुळे डोळे दीपणे, डोळे लाल होणे, डोळ्यांतून पाणी येणे आदी दुष्परिणाम होतात. तसेच काही रुग्णांच्या डोळ्यांच्या नेत्रपटलाचा मध्यभाग (मॅक्युला) येथे रक्‍तस्त्राव होऊन द‍ृष्टी जाण्याचा धोकासुद्धा संभवतो. ठरावीक वेळेपेक्षा जास्त लेसर लाईटस् पाहिल्यानंतर 24 ते 48 तास डोळे दीपणे व लाल होणे हे त्रास होतात.
– डॉ. महेश दळवी, नेत्ररोगतज्ज्ञ

साऊंड सिस्टीमचा मोठा आवाज असेल आणि त्याच्या जवळून वाहन नेले, तर आपल्याला त्याची तीव्रता कळू शकेल. तीच स्थितीत इमारतींच्या बाबतीतही आहे. कोल्हापूर महाद्वार रोडसह इतरत्र अनेक धोकादायक इमारती आहेत. साऊंड सिस्टीमच्या 100 डेसिबलपेक्षा अधिक आवाजामुळे धोकादायक इमारती कोसळू शकतात. त्यातून जीवितहानी होऊ शकते.
– अजय कोराणे, अध्यक्ष, असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट अँड इंजिनिअर्स

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT